शेतकरी कुंटुंबाला मदत हवी
महाराष्ट्रातील शेतक-यांना कर्ज माफी दयावी यासाठी विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. च॔द्रपुर ते पनवेल अशी संघर्ष यात्रा झाली. शेतमालाला हमी भाव नाही,शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह होणे कठीण झाले आहे,कर्जाचे हप्ते देणे शक्य नाही अशा बिकट परिस्थितीत शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतक-यांचा कैवारी कोण ? असाही प्रश्न विचारला जातोय,व्हा कोणीही कैवारी पण दुष्ट चक्रातून आम्हाला बाहेर काढा ही आर्त किंकाळी गंभीरपणे ऐका.मराठवाडा,विदर्भात शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.आता शेतकरी आत्महत्याचे लोण पश्चिम महाराष्ट्रात आले आहे. 3 एप्रिलला रात्री कराड तालुक्यातील दोन सख्या भावानी आत्महत्या केल्या. शेतकरी कुंटुंबातील या तरूण शेतकरी बंधूंनी आत्महत्या केल्या. सकाळी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात बराच वेळ अनेकांशी या आत्महत्या करणा-या शेतक-यांच्याबाबत विविध माहिती घेतली. शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. पोलीस व प्रशासनाच्यावतीने चौकशी केली जाणार आहे. बॅकांची कर्ज, त्याचा विनियोग, थकीत कर्जाची इंथभूत माहिती यथावकाश मिळेल. पोलिस व प्रशासन सदर आत्महत्या का झाल्या ? कर्जाचे पैसे मिळावेत म्हणून कोणी तगादा लावला, याचा शोध संबंधित तपास यंत्रणा घेतील पण कर्जाच्या कारणावरून विजय चव्हाण व जगन्नाथ चव्हाण यांनी आत्महत्या केली हे सत्य आहे.
आमदार बाळासाहेब पाटील संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते.कराडमधील शेतकरी आत्महत्येचे वृत्त कळताच आ.बाळासाहेब पाटील तात्काळ कराडला आले आणि वडगाव हवेली येथील विजय चव्हाण व जगन्नाथ चव्हाण या शेतकरी बंधूच्या वडगाव हवेली (ता.कराड) येथे जावून चव्हाण कुंटुंबाची भेट घेवून सांत्वन केले.तसेच चव्हाण बंधूनी घेतलेल्या कर्जाची माहिती जानून घेतली.आ.बाळासाहेब पाटील यांच्यासोबत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबियांच्या घरी गेल्यानंतर जी परिस्थिती पाहिली ती ह्रदयद्रावक आहे. विजय व जगन्नाथ चव्हाण यांची मुले लहान आहेत. घरातील दोन मुख्य कर्ते पुरूष नाहीत.कुंटुंबावर कर्जाचा बोजा आहे.यामुळे मुलांचे शिक्षण कसे होणार ? कर्जाचे काय होणार ? चव्हाण कुंटुंबियांना शासन काय मदत करणार ? हे प्रश्न आहेत. कराड तालुक्यातील संवेदनशिल लोकांनी पुढे येवून शेतकरी कुंटुंबियांना न्याय मिळावा यासाठी संयुक्तीक प्रयत्न केले पाहिजेत.आणि आर्थिक संकटातील कुंटुंबाला मदतीचा हात देवून मायेची व माणूसकीचे पांघरून दिले पाहिजे.कराड तालुका सर्वांगदृष्टया प्रगतीशिल आहे. संकटातील कुंटुंबाला सावरण्यासाठी आता समाजानेच पुढे आले पाहिजे.नविन पायंडा आणि नविन आदर्श निर्माण करून कष्टकरी शेतकरी वर्गाच्या पाठीशी समाज उभा राहतो हे देशाला व महाराष्ट्राला दाखवून दिले पाहिजे.
गोरख तावरे,कराड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा