आगंतुकपणे भेटले प्रा. आप्पासाहेब खोत


आगंतुकपणे आज माझ्यासमोर प्रा. आप्पासाहेब खोत उभा राहिले. आणि तुम्ही माझ्याच कुळातले दिसता असे म्हणाले. हो, मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. असे त्यांना सांगितले. आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. नेहमी प्रमाणे हॉटेल "लक्ष्मी" मध्ये काऊन्टरवर मी बसलो होतो. सुरुवातीला एक सदग्रस्त आले, आणि आपल्याकडे जेवण मिळते का ? अशी चौकशी केली. शाकाहारी राईसप्लेट मिळेल. असे मी त्यांना सांगितले. पुढे गाडी लावली आहे; आम्ही दोघे जण आहोत, आलोच जेवायला, असे म्हणते ते, सदग्रस्त गाडीकडे गेले. आणि ते "दोघे" येऊन हॉटेलमध्ये बसले. त्यांनी शाकाहारी जेवण केले. तृप्तपणे जेवण झाले, बिल देण्यासाठी कौंटरवर आले. त्यांनी बिलाचे पैसे दिले. आणि मी ते पैसे घेतले. एक नजर त्यांच्याकडे टाकली. तर क्षणभर मला ते सदग्रस्त ओळखीचे वाटले, पण मी काही बोललोच नाही. परंतु मी प्रेसनोट मोबाइलवर टाइप करत असताना त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही माझ्या कुळातले दिसता. तुमचे नाव काय ? असे त्यांनी मला विचारले, मी म्हणालो, गोरख तावरे. हे काय करताय ? मला आवर्जून विचारले. मी म्हणालो, बातमी टाइप करतोय.

न राहुल मीही प्रतिप्रश्न केला, आपले नाव काय ? कोणताही अभिनिवेश न करता ते म्हणाले, मी प्रा.आप्पासाहेब खोत. मी म्हणालो, तरी मला वाटलेच आपण प्रा.आप्पासाहेब खोत सारखे दिसता. पण ते विचारण्याचे धाडस केले नाही. असा माझा आणि कथाकथनकार प्रा.आप्पासाहेब खोत यांचा संवाद आज घडला. कथाकथनकार म्हणून प्रा.आप्पासाहेब खोत महाराष्ट्राला परिचित आहेत. साधी राहणीमान, साधा माणूस म्हणून आणि माणसं समजून घेण्याची त्यांची हातोडी मला भावली. प्रा. अप्पासाहेब खोत यांनी माझा मोबाईल नंबर मागून घेतला आणि त्यांचा मोबाइल नंबर मला दिला आहे. विचाराने मोठा असणारा माणूस खरच, मोठाच असतो. हे आज प्रा. आप्पासाहेब खोत यांचे व्यक्तिमत्त्व पाहून मला अनुभव आला. कोणताही मोठेपणाचा अभिनिवेश त्यांच्या मनामध्ये अथवा व्यक्तिमत्त्वात मला दिसला नाही. दिसला तो केवळ साधेपणा. मी तुम्हाला कुठे तरी पाहिले, अशी सुरुवात प्रा.अप्पासाहेब खोत यांनी माझ्याशी बोलताना केली. मी फ्लॅशबॅगला गेलो आणि मला आठवतं, पत्रकार संजय पाटील वारुंजीकर आणि मी एका ग्रामीण साहित्य संमेलनाला गेलो होतो. त्यावेळी प्रा.अप्पासाहेब खोत यांची भेट झाली होती आणि त्यांच्याशी बराचवेळ चर्चाही केली होती. याला साक्षीदार आहेत, पत्रकार संजय पाटील वारुंजीकर. असो.

प्रा. आप्पासाहेब खोत यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. गवनेर, महापूर, रानगंगा, माती आणि कागुद, काळवंड, मरणादारी, वापसा हे कथासंग्रह आहेत. पळसफुल, गावपांढर, गाव पंढरीच्या वाटेवर, फेसटी, घरपण, सावलीची सोबत या कादंबरी आणि अनवाणी पाय, आगामी - कुणब्यांची पोरं हे ललित गद्य असे लिखाण प्रा. अप्पासाहेब खोत यांनी केलेले आहे. माती आणि कागुद, रानगंगा या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासन व विविध संस्थांचे उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे अनेक पुरस्कार अप्पासाहेब खोत यांना प्राप्त झाले आहेत. ई.टी.व्ही. मराठी व महाराष्ट्रभर समाज प्रबोधनासाठी २००० च्या वरती कथाकथनाचे कार्यक्रम झालेले आहेत. ७ मान्यवरांनी संशोधन करून एम. फिल. केले आहे. कोल्हापूर - "घर आणि बंगला" रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड - "माती आणि कागुद" डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद- "गवळण", एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई -"गवनेर" या कथांचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे.

ग्रामीण भाषेत व ग्रामीण ढंगात प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या कथा ऐकने एक पर्वणीच आहे. प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या कथांना कोल्हापुरी भाषेचा साज आहे. कथाकथन करण्यासाठी प्रा. आप्पासाहेब खोत यांनी महाराष्ट्र पालथा घातला आहे. एकदा कथाकथन ऐकले की पुन्हा पुन्हा प्रा. अप्पासाहेब खोत यांचे कथाकथनातील कथा ऐकाव्यात असे वाटते. महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेच कथाकथन करणारे काही साहित्यिक आहेत. त्यांमध्ये प्रा. आप्पासाहेब खोत यांचा प्रथम क्रमांक लागतो. साहित्य सेवा करणे, महाराष्ट्रातील लोकांच्या चेहऱ्यावर कथाकथनाद्वारे हास्य निर्माण करणारे, सरळ, साधे, बोलके प्रा. आप्पासाहेब खोत यांची आज भेट झाली आणि आनंद द्विगुणीत झाला.

॥ गोरख तावरे ॥


ताक : विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत आपणास उपलब्ध हवे असतील तर निश्चित माझ्याशी संपर्क साधा. ( गोरख तावरे - 9326711721 / 9423502355 )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.