आपुलकी जपणारे आमदार



सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांचे व्यक्तिमत्व हे सामान्य लोकांना आपुलकी निर्माण करणारे आहे. राजकारण, समाजकारण करताना संयम हवा,  शांत स्वभाव असावा लागतो. हे दोन गुण आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहेत. राजकारणात दीर्घकाळ जनमानसावर प्रभाव असणारे व्यक्तिमत्व तसेच आपला माणूस म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. राजकारणामध्ये फारशी कटूता न ठेवता विरोधकांनाही आपलेसे करण्याची त्यांच्याकडे उत्तम कला आहे. राजकीय रागापोटी व द्वेषाचे राजकारण आमदार बाळासाहेब पाटील करीत नाहीत, कारण कराड उत्तर मतदारसंघ हा आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्व. पी.डी.पाटीलसाहेब यांचा मतदारसंघ आहे, ही भावना आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मनोमनी नेहमी असते. यामुळेच आमदार बाळासाहेब पाटील नेहमी बेरजेचे राजकारण करतात. प्रसंगी राजकारणात दोन पावले मागेही येतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य संधी आमदार बाळासाहेब पाटील यांना आतापर्यंत मिळाली आहे. कराड उत्तर मतदारसंघातील अनेक लोक आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचारावर प्रेम करतात. आमदारांचा गावोगावी लोक आदरयुक्त स्वागत व सत्कार करतात. लोक आपल्या अडीअडचणी आमदारांना सांगतात आणि लोकांच्या समस्या व प्रश्‍न ऐकून आमदार बाळासाहेब पाटील त्यावर शांतपणे विचार करुन मार्ग काढतात. आमदारांच्या गटातील कार्यकर्ते हे वैचारीक दृष्ट्या प्रगल्भ आहेत. आदरणीय स्व. पी.डी.पाटीलसाहेब यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना सहकार, राजकारण, समाजकारण याबाबत कानमंत्र दिला आहे. त्याच कानमंत्राच्या व वैचारिक परिपक्वतेच्या मार्गाने आमदारांची दमदार वाटचाल सुरु आहे. याचाच परिपाक म्हणजे गेले २० वर्ष कराड उत्तर मतदार संघाचे ते प्रतिनिधीत्व करीत आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांना कोणतेही पद सहज मिळाले नाही. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. संघर्ष करताना त्यांनी आपला संयम कधी सोडला नाही. महाराष्ट्रातील शांत व संयमी आमदार म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. नेता कसा असावा हे पहायचे असेल तर निःसंकोचपणे आणि कोणताही संकुचित राजकीय दृष्टीकोन न ठेवता आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले पाहिजे. राजकारण, समाजकारण व सहकार क्षेत्रात आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलेले काम उल्लेखनीय तर आहेच पण कौतुकास्पदही आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष, अनेक पाणीपुरवठा संस्थांचे मार्गदर्शक आणि आता जिल्हा मध्यवर्ती स्ाहकारी बँकेचे स्विकृत संचालक अशी महत्वपूर्ण जबाबदारी आमदार बाळासाहेब पाटील सांभाळत आहेत. विविध संस्थांमध्ये काम करीत असताना, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आमदार बाळासाहेब पाटील यांची असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे सकाळी ९ वाजल्यापासून भेटण्यास येत असतात आणि विशेष म्हणजे कामानिमित्त भेटायला आलेल्या प्रत्येकाचे गार्‍हाणे आमदार बाळासाहेब पाटील ऐकून घेतात आणि सदरचे प्रश्‍न मार्गी लावतात. अनेक पदे भूषवित असताना आमदार बाळासाहेब पाटील कधीही कोणत्याही सामान्य व्यक्तीचा अनादर करीत नाहीत. तर प्रत्येकाला आदरपूर्वक वागणूक देतात. यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विचारावर प्रेम करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून संचालक मंडळाला विश्वासात घेवून सह्याद्रिच्या शेतकरी ऊस उत्पादकांना महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ऊसाचा दर देण्याचा निर्णय आमदार बाळासाहेब पाटील यांनी धाडसाने घेतला आहे. सह्याद्रिच्या ऊस उत्पादक सभासदांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. या हेतूने एकतिशे रुपये प्रतिटन दर जाहिर केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली होती. कारण तीन हजाराहून अधिक दर देणारा सह्याद्रि हा पहिला कारखाना ठरला आहे. कराड उत्तर मतदारसंघ आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला नाव-गावानिशी ओळखणारे आणि प्रत्येकाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांनी ओळख निर्माण केली आहे. सध्या मोबाईलचा जमाना आहे. अनेकजण अनेकांचा फोन रिसिव्ह करीत नाहीत. मात्र, मुलखावेगळा संपर्क ठेवणारे म्हणजे आमदार बाळासाहेब पाटील म्हणावे लागतील. कोणाचाही केव्हाही फोन खणखणला तरी बोला मी आमदार बाळासाहेब पाटील बोलतोय’ म्हणून पुढच्याला प्रेमाची साद घालतात. अथवा एखाद्याचा मिसकॉल आला तरी पुन्हा फोन करुन कोणत्या कामासाठी फोन केला होता याची चौकशी करतात. यामुळेच आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल मतदार, सभासद व कार्यकर्त्यांना प्रचंड आपुलकी व प्रेम निर्माण झाले आहे. अनेक महत्वाच्या पदावर काम करीत असताना अतिरिक्त कामांचा ताण असतानाही न थकता अविरतपणे काम सुरुच असते. फारसे आमदार बाळासाहेब पाटील कोणावरही रागावत नाहीत. मग तो साधा कर्मचारी असला किंवा आर्थिक परिस्थितीने गरीब असला तरी सर्वांबद्दल त्यांच्या मनामध्ये समानता दिसून येते. माझा-तुझा असा भेदभाव करीत नाहीत. आपलाच आमदार, आपलाच चेअरमन, आपलाच नेता, आपलाच मित्र, आपलेच साहेब, आपलाच हितचिंतक आणि आपलाच माणूस अशी लोकांच्या मनामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांची स्वच्छ, पारदर्शक, आपलेपणाची, आदर्शवत प्रतिमा निर्माण झाली आहे.
    आमदार बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा आणि मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.