शेतकरी जगला पाहिजे


महाराष्ट्रामध्ये शिवसेना,भारतीय जनता पार्टीचे युती सरकार राज्य करीत आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला लोक कंटाळले होते. यामुळे युती सरकारला लोकांनी काम करण्याची संधी दिली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होतच आहेत. हे सत्र थांबलेले नाही, तरीही शेतकऱ्यांचे
प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने युती सरकार कसोशीने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवले पाहिजेत, अशी भूमिका सरकारची आहे. पण शेती व शेतकरी यांचा कोणताही प्रश्न समोर आला की, यावर राजकारण होतच आहे. असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण झाले नाही पाहिजे. असे जरी वाटत असले तरी, प्रत्येक राजकीय पक्षाला असे वाटते की, आपणच शेतकऱ्यांचे तारणहार आहोत आणि हे दाखवण्याच्या दृष्टीने सर्वजण राजकारण करतात, हे दुर्दैव शेतकऱ्यांचे आहे. कारण त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यापेक्षा राजकारण करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये चांगलेच राजकारण गाजते व वाजते आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्राचा दौरा करून युती सरकार हे शेतकर्यांच्या विरोधातील सरकार आहे. अशी लोकभावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर शेतकऱ्यांबाबत आमची मनापासून मदत करण्याची भावना आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत असे युती सरकारने जाहीर केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा, युती सरकारने केली आणि ऑनलाइन पद्धतीने सर्व तपासणी करून कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक घटना उघड झाल्यानंतर युती सरकारने ऑनलाइन पद्धतीने तपासणी करूनच कर्जबाजारी शेतकऱ्याना मदत करण्याची भूमिका घेतली. याबाबतही बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांना शेतकरी कर्जमाफीचा फायदा होऊ नये, यासाठी "मी लाभार्थी" म्हणून युती सरकारने वर्तमानपत्र व न्यूज चानेलवर जाहिराती प्रसारित केले आहेत. या जाहिरातींमधील "मी लाभार्थी" कसा खोटारडा आहे. यांचे पितळ उघडे करण्याचे काम विरोधकांनी अवलंबविले आहे. श्रेयवाद व राजकीय फायदा मिळावा यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष करत असलेला खटाटोप हा निंदनीयच म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुदिन यावेत यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष काम करीत आहेत. मात्र हे काम आमचे पक्ष करतो, यासाठी सर्वजण खटाटोप करतात हे दुर्दैव आहे. श्रेय कोणीही घ्यावे पण शेतकऱ्यांना चागले दिवस यावेत इतकेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकरी वाचला पाहिजे, जगला पाहिजे, त्याची शेती सुजलाम - सुफलाम झाली पाहिजे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केला तर याला कोणाची काही हरकत नाही. मात्र प्रत्येकाचा हेतू स्वच्छ असला पाहिजे हीच अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.