पत्रकारांचा वाटाडय़ा - गोरख तावरे

 



दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार व प्रसारमाध्यम साप्ताहिक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गोरख तावरे यांचा आज वाढदिवस. कराडमध्ये गेली 30 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करणारे गोरख तावरे हे दैनिक "सामना"च्या रोखठोक शैलीतील आहेत. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी "सामना"मध्ये पत्रकारितेस प्रारंभ केला. तत्पूर्वी स्थानिक दैनिकांतून ते पत्रकारिता करत होते. सामनाच्या माध्यमातून त्यांची पत्रकारिता बहरली. सामनात त्यांची वार्तापत्रे ही सातारा जिल्हय़ाच्या राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण करत असायची. लिहताना हयगय करायची नाही. नाठाळांच्या माथी हाणू काठी या उक्तीनुसार गोरख तावरेंनी पत्रकारितेत वाटचाल केली. आपले स्वत:चे दैनिक असावे, या इच्छेने त्यांनी  राजसत्य या साप्ताहिका ची  निर्मिती केली. या माध्यमातून कराड शहरासह जिल्हय़ातील वृत्त प्रसारित केले. याबरोबरच लक्ष्मीपूत्र हे दैनिक ही सुरू केले.  

छोटे, लहान वृत्तपत्र चालवताना गोरख तावरे यांना या वृत्तपत्रांच्या अडचणी लक्षात आल्या. साखळी, बडय़ा वृत्तपत्रांच्या ताकदीपुढे छोटय़ा वृत्तपत्रांचा निभाव लागत नाही, हे लक्षात आल्यानंतर या वृत्तपत्रांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय त्यांनी केला. यातून तावरे यांना राज्यस्तरावर काम करण्याचे दालन खुले झाले. छोटी वृत्तपत्रे, स्थानिक दैनिके, साप्ताहिके यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार संघटक म्हणून त्यांचा राज्यात लौकिक आहे. तावरे यांचा या कामांच्या निमित्ताने मुंबई, लखनऊ, दिल्लीपर्यंत प्रवास झालाय. प्रेस इन्फरमेशन ब्युरो, माहिती जनसंपर्क महासंचलनालय या शासनाच्या विभागाशी संपर्क साधून छोटय़ा वृत्तपत्रांच्या अडचणी सोडवण्यासाठी आग्रही राहणारे तावरे हे एकमेव पत्रकार आहेत. यासाठी अशा संपादकांना संघटित करत त्यांनी प्रसारमाध्यम साप्ताहिक पत्रकार परिषदेची स्थापना केली. या माध्यमातून शासनाशी लढा दिला. यात त्यांचे काम राज्यभर परिचित झाले. पत्रकारांच्या राज्यस्तरिय संघटनांमध्येही त्यांचा दबदबा आहे. तावरे कधी कराडात, कधी साताऱयात, कधी पुणे, मुंबईत असतात. पण काम मात्र छोटय़ा वृत्तपत्रांचेच असते. यासाठी स्वत:चे व्याप सांभाळत प्रचंड वेळ दिला आहे. हे सगळे करत असताना, राज्यभर फिरत असताना राज्यभरातील पत्रकारांचे प्रश्न, पत्रकार संघटनांचे प्रश्न, वृत्तपत्र व्यवसायाची प्रचंड माहिती, यातील नेटवर्क याचे सखोल ज्ञान त्यांना प्राप्त झाले.  

पत्रकारांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र सर्वसामान्यांच्या भल्याचा नेहमी विचार करणाऱया पत्रकारांनाच याची माहिती नसते. अशांसाठी गोरख तावरे हे मार्गदर्शक व नवोदित पत्रकारांचा वाटाडय़ा ठरले आहेत. मुंबईपासून दिल्लीपर्यंत  पत्रकाराला काहीही काम असले तर तावरेंकडून त्यास योग्य मार्गदर्शन मिळतेच. मात्र ही कामे सुकर करण्यासाठी तावरे बहुमोल मार्गदर्शन करतात. अधिस्वीकृती पत्रिकेसारखे पत्रकारांसाठी महत्वाचे असणारे उपक्रमांचा लाभ मिळण्यासाठी, नवीन दैनिकांची निर्मिती, साप्ताहिकांची निर्मिती, त्यासाठी शासकीय मदत अशा विविध पातळीवर ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. तावरे कराडात पण कामाचा पसारा राज्यभर अशी त्यांची ओळख आहे. मंत्रालयात गतीने काम उरकण्यासाठी तावरे बरोबर हवेत. त्यांच्या अशा चिकाटीतून अनेकांची कामे सुकर झाली आहेत.  

30 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करताना या क्षेत्रातील चढउतारांचा अनुभवाने त्यांना समृद्ध केलंय. हे ज्ञान त्यांनी नवोदित, तरूण, होतकरू तरूणांना देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. पत्रकारितेत डिजीटल साधनांचा वापर करून आपली लक्ष्मीपूत्र, राजसत्य ही दैनिके त्यांनी सर्वतोमुखी केली. कराडमध्ये काम करताना आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेबांशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्याकडून काही मार्गदर्शन मिळाले. ते आयुष्याच्या वाटचालीत, पत्रकारितेत मोलाचे ठरल्याची तावरे यांची भावना आहे. तशी ते बोलूनही दाखवतात. पत्रकारितेतील दांभिकपणावर त्यांनी सतत प्रहार केले आहेत. रोखठोक शैलीने लोक दुखावले तरी त्याची फिकीर ते करत नाहीत. पत्रकार ही अदृश्य शक्ती असते. या शक्तीने अदृश्य राहूनच काम करत राहिले पाहिजे, हे त्यांचे तत्व. यामुळेच तावरेंची प्रसिद्धी झाली नाही. किंबहुना ती व्हावी, असे त्यांना वाटत नाही. अलिकडे पत्रकारच जेव्हा बातमीचे विषय ठरतात, तेव्हा पत्रकारितेच्या घसरलेल्या दर्जाचे दर्शन होते. हे पथ्य तावरेंनी पाळले. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी ते मोठे ठरतात. अर्ध्या हळकुंडाने पिवळय़ा होणाऱयासाठी तावरेंची 30 वर्षांची तपश्चर्या दिशादर्शक आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त या लढाऊ संघटक व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.