सही करताना हाताला लकवा भरतोय का ?
सही करताना हाताला लकवा भरतोय का ?
स्वच्छ व सुंदर कराडला केवळ "सही"मुळे गालबोट लावण्याचा कृतघ्नपणा
कराड (लक्ष्मीपुत्र) :- पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेक फाईलींवर पृथ्वीराज चव्हाण सही करत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते, सही करताना हाताला लकवा भरतोय का ? वास्तविक अशीच परिस्थिती कराडच्या नगराध्यक्षांची झाली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक नगराध्यक्षा का सही करत नाहीत ? त्यामुळे त्यांना कोणता प्रश्न, कोणी विचारावा, असा प्रश्नच निर्माण झाला आहे.
केवळ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी घंटागाडी निविदा प्रक्रियेच्या फाईलवर सही न केल्यामुळे आज कराड शहरातील कचरा उचलला गेला नाही. तर याला केवळ नगराध्यक्षाच जबाबदार असल्याचे लोकभावना निर्माण झाली असून आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी आरोग्याचा प्रश्न भीषण होऊ नये, यासाठी आज सकाळपासून याबाबत सजगता दाखवली.
कराडमधील स्वच्छतेसाठी ठेकेदार नियुक्त केला जातो. पहिल्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेकेदाराने ठेका घेतला आहे. दरम्यान नवीन ठेक्याची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मंजुरीसाठी नगराध्यक्षांच्या सहीसाठी अहवाल गेला मात्र या अहवालावर नगराध्यक्षांनी सहीच केली नाही. सहा जुलै रोजी नगराध्यक्षांच्या टेबलवर सदरची फाइल पडून आहे. तसेच 30 जून रोजी जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने विनंती केल्यानंतर दहा दिवस जुन्या ठेकेदारांनी विनातक्रार कराड स्वच्छतेचे काम केले. यानंतर आता नवीन ठेकेदाराला काम देताना त्यांना वर्कऑर्डर देणे गरजेचे आहे. मात्र नगराध्यक्षांनी सही करून दिल्यानंतर सदरचा वर्क ऑर्डर देणे प्रशासनाला सहज शक्य आहे. मात्र नगराध्यक्षांनी या अहवालावर सहीच केली नसल्याने कराडच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी काम न करण्याचा निर्णय घेऊन आज कराडमधील कचरा उचलला नाही.
दररोज सकाळी कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या कराडकरांच्या प्रत्येक दारात येत असत. आज मात्र कचरा गोळा करणाऱ्या गाड्याआल्या नाहीत. तसेच "स्वच्छ व सुंदर कराड" होत असताना केवळ स्वच्छतेच्या कामाचा ठेका देताना "त्या" अहवालावर सही न करण्याचा कृतघ्नपणा नगराध्यक्षांनी दाखवल्याबद्दल कराडकरांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
कराड शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार ना नगराध्यक्षांना. ना कोणत्याही लोकप्रतिनिधींना. कारण प्रत्येकाची कर्तव्य व जबाबदारी ठरलेली असताना त्यात कसूर केला तर कराडकर जनता त्यांना माफ करणार नाही. याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. नगरपालिकेकडे असलेल्या १८ घंटागाड्यांसह ३ ट्रॅक्टरव्दारे कराड शहरातील कचरा गोळा केला जातो. दरम्यान सलग दोन वर्ष स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात अव्वलस्थानी राहिलेल्या कराड शहरातील आज कचरा उचलला गेला नाही. तोही केवळ नगराध्यक्षांनी या प्रक्रियेच्या अहवालावर सही न केल्यामुळे यासारखी दुसरी शोकांतिकाच असू शकत नाही.
"सही" का केली जात नाही : विजय वाटेगावकर
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर म्हणाले, कराडकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही. नगराध्यक्षा सही करताना का आढेवेढे घेतात, हेच समजेनासे झाले आहे. त्यांच्यामुळेच आज कर्मचाऱ्यांनी कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आणि काम न करण्याचा निर्णय घेतला हे दुर्दैवी बाब आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये : सौरभ पाटील
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याचबरोबर इतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढतोय.हे पाहता आम्ही कोणाच्याही अध्यात मध्यात न पडता. प्रसंगी लोकशाही आघाडीच्यावतीने आम्ही स्वतः घंटागाडी घेऊन कराडमधील कचरा गोळा करू. हे काम करणे आमच्यासाठी नवीन नाही. नागरिकांच्या हिताशी व आरोग्याशी कोणी खेळ खेळू नये अशी प्रतिक्रिया लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा