दारूबंदी - दारूमुक्तीचा नारा
दारूबंदी - दारूमुक्तीचा नारा
(गोरख तावरे)
कराड - महाराष्ट्राला संत परंपरेचा पुरातन वारसा आहे.भजन,किर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे काम उल्लेखनीय असून समाजप्रबोधनाची महत्वपुर्ण चळवळ चालविली जात आहे.आध्यात्माची कास धरावी पण अंधश्रध्दा नसावी यासाठी मार्मिक विवेचन संत परंपरेत आजही दिसून येत आहे.कराडचे ह.भ.प.बंडातात्या कराडकर हे नेहमी महाराष्ट्रातील अनेक अनिष्ठ रूढी,परंपराविरोधी रणसिंग फुंकतात.समाजजीवन सुस्थितीत राहावे,नागरीकांना व शेतक-यांना यातना होतील असे प्रकल्प महाराष्ट्रात नकोत अशी भूमिका घेवून जन आंदोलन उभारले जाते प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी बंडातात्या कराडकरांची असते.याचपार्श्वभूमिवर कराड तालुक्यात पुर्ण दारूबंदी आणि दारूमुक्तीचा नारा दिला आहे. याकरीता 10 हजार महिलांच्या मोर्च्याचे नियोजन केले जात आहे.यासाठी वारकरी संघाने पुढाकार घेतला आहे.
दारूच्या दुष्परिणामाचे विदारक चित्र एकच प्याला नाटकात राम गणेश गडकरी यांनी मांडले आहे.दरम्यान बदलत्या जीवन शैलीनुसार आता नाटकांचा प्रभाव समाजमनावर राहिला नाही.आधुनिक करमणुकीच्या स्पर्धेत दारू व तत्संबधी व्यसनाच्या परिणामाची दाहकता सांगितली जाते.सिगारेट ओढणे शरिरासाठी घातक आहे.यामुळे कर्करोग होवू शकतो असा इशारा सिगारेटच्या पाकीटावर दिला जातो मात्र याकडे दुर्लक्ष करून बिनधास्त धुर काढणा-यांची संख्या कमी झाली नाही.तर एका कुटुंबातील एका व्यक्तीच्या दारू व्यसनामुळे अख्खे कुटुंब उध्वस्त होत आहेत.मुक्तांगण सारखी संस्था व्यसनमुक्त समाज व्यवस्थेसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.यासाठी डाॅ.अनिल अवचट प्रयत्नांची शिकस्त करताहेत.
दारूमुळे शरिरावर , मनावर आणि विशेषःता समाजमनावर कोणते दुष्परिणाम होतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही.तरीही संपुर्ण कराड तालुका दारू बंदीसाठी बंडातात्या कराडकर यांनी आवाज उठविला आहे.कराड तालुका दारूमुक्त करून सामान्य लोकांचे जगणे सुखकारक, आरोग्यमय आणि आनंदमय व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. कराड ही भूमी साधू संतांची व लढाऊ शूरविरांची आहे या भूमिला कलंकीत केले जात आहे तेव्हा कराड तालुक्याचा वसा व वारसा कायम रहावा याकरिता कराड तालुका वारकरी संघाने पुढाकार घेतला आहे. दारू बंदीकरीता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे पहिली लढाई जिंकण्याच्या मार्गावर आहे. कराड तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून दारू बंदीचे ठराव जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.तेव्हा लवकरच ग्रामसभेचे ठराव,पाच लाख सह्यांच्या निवेदनासह दहा हजार महिलांचा मोर्च्या वारकरी संघ काढणार असल्याची माहिती वारकरी संघाचे प्रमुख मार्गदर्शक ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांनी दिली .
आज प्रत्येक गाव ,शहरात ठिकठिकाणी परमीटरूम व बिअरबार दुकाने थाटली आहेत.देशी दारूची बिनधास्त विक्री सुरू आहे.कोट्यावधीचा महसुल दारू विक्रीतून शासनाकडे जमा होतो.युवकांचा ओढा व्यसनाधिनतेकडे वाढला आहे.अशा परिस्थितीत समाजप्रबोधन चळवळ चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.समाजमनाची मशागत करून व्यसनाधिनतेचा दुष्परिणाम सांगून विक्री केली जात आहे.याबाबत शासनाचेच परस्परविरोधी आदेश निर्गमीत झालेले आहेत.दरम्यान महाभारतातील अर्जुनाप्रमाणे प्रत्येकाचे आदर्श जीवन असले पाहिजे त्याचबरोबर उत्तम आरोग्य असावे अशी तळमळ ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची आहे.कराड तालुका दारू मुक्तीचा नारा दिला गेला आहे.हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यात याचे अनुकरण होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा