युवकांचे ह्रदयसम्राट - राजेंद्रसिंह यादव

कराड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये गेले दोन तपे उत्कृष्ट काम करणारे त्याचबरोबर युवकांचे संघटन करुन बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणारे यशवंत विकास आघाडीचे संस्थापक, कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला मागोवा.
    कराड नगरपालिकेला एक ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेला साजेशे अनेक नेतृत्व कराडमध्ये निर्माण होत असतात. आपल्या वेगळया कार्यशैलीने कराडकरांच्या हृदयस्थानावर वेगळा ठसा उमटविणारे म्हणून राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे पाहिले जात आहे. राजेंद्र्रसिंह यादव (बाबा) हे उत्कृष्ट संघटक असल्याकारणाने कराड शहर आणि कराड तालुक्यातील अनेक युवकांशी त्यांचा ऋणानुबंध पक्का व घट्ट आहे. अनेक कामानिमित्त राजेंद्रसिंह यादव यांच्याकडे युवक येत असतात. ज्या आशा व अपेक्षेने युवक येतात त्यांची कामे राजेंद्रसिंह यादव तेवढ्याच आपुलकीने व प्रेमाने करतात. म्हणूनच ज्या-ज्या ठिकाणी राजेंद्रसिंह यादव जातात त्यांच्या चारही बाजूला युवकांचा गराडा नेहमी दिसून येत असतो. थोडेच व मोजकेच बोलणे अशा स्वभावाचे राजेंद्रसिंह यादव असल्यामुळे इतरांची गार्‍हाणी ते शांतपणे ऐकून घेतात आणि त्यावर योग्य तो तोडगा काढत असतात.
    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या मुशीत तयार झालेले राजेंद्रसिंह यादव सार्वजनिक जीवनात वावरताना कोणत्याही निर्णयासाठी घाई-गडबड करीत नाहीत. एखादा निर्णय घेताना स्वतः शांतपणे निर्णय घेतात आणि आपल्या बरोबरीच्या मित्रांशी विचारविनिमय करुन अंतिम निर्णयापर्यंत येतात. यशवंत विकास आघाडी ही गतकाळात निर्माण झाली आणि सुरुवातीच्या कराड नगरपालिका निवडणूकीत यशवंत विकास आघाडीने मिळविलेले यश सर्वाच्या भुवया उंचावणार्‍या ठरल्या. कराड नगरपालिका हा राजेंद्रसिंह यादव यांच्या जिव्हाळयाचा प्रश्‍न आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून आपण ज्या प्रभागातून निवडून येतो त्या प्रभागाव्यतिरिक्त संपूर्ण कराड शहराचा विकास करण्यासाठी राजेंद्र्रसिंह यादव यांची धडपड दिसून येत असते. कराड शहराच्या विकासासाठी राजेंद्र्रसिंह यादव यांचा खारीचा नव्हे तर महत्वपूर्ण वाटा आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
    राजेंद्रसिंह यादव समाजकारण व राजकारणात वावरत असताना त्यांनी केवळ कराडपुरताच आपला संपर्क ठेवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे मित्र आहेत. त्याचबरोबर विविध पक्षातील राजकीय लोकांशी त्यांचा स्नेहसंबंध स्नेहपूर्वक आहे. शाहीर आत्माराम यादव यांच्या कलेची परंपरा जोपासण्याचा वारसा राजेंद्रसिंह यादव यांनी आपुलकीने जपला आहे. प्रतिवर्षी भव्य प्रमाणात वाढदिवस साजरा करीत असताना हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांना निमंत्रण देवून अनेकांचा त्यांच्या हस्ते गौरव करीत असतात. वास्तविक मोठ-मोठे स्टारकास्ट व सेलिब्र्रिटी कराडला आणण्याचा व सार्वजनिक कार्यक्रम राबविणे यातून राजेंद्रसिंह यादव कलेची जोपासना करीत आहेत. हिरो चित्रपटाद्वारे स्टार म्हणून उदयास आलेले जॅकी श्रॉफ हे वाढदिवसानिमित्त १९ सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत. याबाबत जॅकी श्रॉफ यांनी सोशल मिडीयाद्वारे व्हिडीओ प्रसिध्द करुन ’मी कराडला येतोय’, असा संदेश दिला आहे.
    समाजकारण व राजकारण क्षेत्रामध्ये राजेंद्र्रसिंह यादव काम करीत असताना त्यांचे थोरले बंधू विजयसिंह यादव हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असतात. राजेंद्रसिंह व विजयसिंह म्हणजेच राम-लक्ष्मणाची जोडी असे म्हंटले जाते. राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव हे दोघे बंधू सार्वजनिक उपक्रम राबविताना विचार-विनिमय करुन समाजमनाला भावेल, समाजाला उपयुक्त असेल आणि समाजहितासाठी योग्य असेल याला अग्रक्रम देत असतात. गतकाळापासून रोजगार निर्मितीसाठी मेळावा घेतला जातो. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना नोकरी उपलब्ध करुन देण्याची संधी राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव हे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. गतवर्षी किमान ५०० युवकांना विविध नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली आहे. तर चालू वर्षी एक हजारपेक्षा जास्त नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. राजेंद्रसिंह यादव यांनी ज्या मान्यवर व्यक्तींशी त्यांचा व्यक्तिगत संबंध आला त्याचा उपयोग युवकांच्या कल्याणासाठी केला आहे व करीत आहेत. त्याचबरोबर समाजामधील गरीब, गरजू व  होतकरु लोकांना विविध प्रकारची मदत राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव सातत्याने करीत असतात. या दोन्ही बंधूंकडे दातृत्वाची भावना आहे. यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे अपेक्षेने येतात आणि हसतमुख व समाधानाने जातात.
    यशवंत विकास आघाडी निर्माण करुन राजेंद्रसिंह यादव यांनी कराड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये नवा आयाम निर्माण केला आहे कारण, आघाडी स्थापन झाल्यानंतर सुमारे एक महिन्यांच्या कालावधीत झालेल्या निवडणूकीमध्ये लोकशाही विकास आघाडीशी मैत्री करुन मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर निःस्सिम प्रेम असणारे यादव कुटूंबिय आहेत. म्हणूनच राजेंद्रसिंह यादव यांनी आपल्या आघाडीला यशवंत विकास आघाडी असे नाव दिले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये राजेंद्रसिंह यादव यांनी कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून अतिशय उत्कृष्ट व चांगले काम करुन लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत. तर सध्या यशवंत विकास आघाडीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. हे सर्व श्रेय राजेंद्रसिंह यादव यांनाच द्यावे लागेल.
    यशवंंत विकास आघाडीचे संस्थापक, कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष, युवा नेते राजेंद्रसिंह यादव (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त ’’दैनिक लक्ष्मीपुत्र’’च्यावतीने हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन!
-गोरख तावरे
अध्यक्ष, प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.