उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनात देशात "सह्याद्रि" अव्वल

कराड - पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकाराचे जाळे सकारात्मक दृष्टीने चांगले विणले गेले आहे. कराड तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकारी सोसायटी प्रत्येक गावात कार्यरत आहेत. दूध संस्था, पतसंस्था, सहकारी बँका आणि सहकारी साखर कारखाने कार्यक्षमपणे काम करताहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, व खाजगी जयवंत शुगर हे चार साखर कारखाने शेतकऱयांचा ऊस गाळप करून त्यांना अधिक चांगला दर देण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सन २०१७-१८ सालासाठी देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक "सह्याद्री"ला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून सह्याद्री कारखान्याची निर्मिती झाली आणि याची पूर्ण जबाबदारी स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांनी इमाने इतबारे सह्याद्री कारखान्याची निकोप वाढ केली आणि सह्याद्री कारखान्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला म्हणूनच सह्याद्री कारखाना देशपातळीवर व्यवस्थापनाबाबत प्रथम पारितोषिकाचा विजेता झाला आहे. सह्याद्रि साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील हे सह्याद्री कारखान्याचा कार्यभार करताना राजकारण विरहित शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करताहेत. कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी संचालकांना घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे साखर उत्पादन खर्चामध्ये काटकसर करण्यासाठी सातत्याने लक्ष देत आहेत. साखर उत्पादनामध्ये काटकसर करीत असताना ऊस उत्पादकांना त्यांंच्या ऊसास राज्यातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर दिलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर देऊनही सह्याद्री कारखान्याची सांपत्तिक स्थिती देशात पहिल्या क्रमांकाची आहे.

यापूर्वीही सह्याद्री कारखान्यास, नॅशनल फेडरेशनने ऑफ को.ऑप. शुगर फॅॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचेकडून देशपातळीवरील २०११-१२ सालासाठी प्रथम व सन २०१२-१३ सालासाठी द्वितीय क्रमांकाचे उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने आर्थिक व्यवस्थापनाबद्दल सन २०१५-१६ सालासाठी राज्यपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित केलेले आहे. तसेच उत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता व ऊस विकास पुरस्कारानेही यापुर्वी कारखान्याचा गौरव झालेला आहे. सह्याद्री कारखाना दरवर्षी कार्यक्षेत्रामध्ये ऊस वाढीबरोबरच जास्तीत जास्त हेक्टरी उत्पादन मिळण्यासाठी ऊस विकासाच्या योजना राबवून सभासद शेतकर्‍यांना रासायनिक, कंपोष्ट खत, जैविक खत, हिरवळीचे खत आदीचे वाटप करण्यात येते. सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकऱयांच्या शेतातील ऊसाचे हेक्टरी उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केल्यामुळे आणि ऊस विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असल्यामुळे सह्याद्री नेहमी अव्वल राहिला आहे.

सहकार क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होता कामा नये असे म्हटले जाते मात्र, अनेक सहकारी साखर कारखाने हे केवळ राजकारणासाठी वापरले जातात. शेतकरी हितापेक्षा स्वतःचे हित पाहून राजकीय पकड निर्माण करण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांचा वापर होत असतो. याला अपवाद म्हणजे सह्याद्री कारखाना आहे.शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले गेल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्री कारखाना देशपातळीवर नेहमी अव्वल राहिला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी घालून दिलेल्या आदर्श पायवाटेनेच सध्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील वाटचाल करीत आहेत. याचाच परिपाक म्हणजे सर्वाधिक उसाला दर देणे व देशांमध्ये अव्वल ठरले होय. नॅशनल फेडरेशनने कारखान्याचा शिल्ड व प्रशस्तीपत्रक देवून गौरव केला. शाबासकी दिली. तर सदरचा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी संचालक मंडळ व अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला आहे. सह्याद्रि कारखान्याच्या उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापनाबद्दल शेतकरी, सभासद कौतुक करीत आहेत.

# गोरख तावरे #

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.