भाऊसाहेब ढेबे यांची यशोगाथा
दैनिक लक्ष्मीपुत्र,कराड..28 ऑगस्ट 2016
भाऊसाहेब ढेबे (काका) यांची यशोगाथा अवश्य वाचा......
शेतमजुराने राबवला शेळीपालन प्रकल्प
कापिलच्या शेतकर्याचा बेरोजगारांसमोर आदर्श, प्रशासनाकडूनही प्रकल्पाचे कौतुक
वडिलोपार्जित हक्काची शेतजमिन मिळवण्यासाठी शाळकरी वयापासून झगडणार्या कपिलच्या शेतमजुराने संकटावर मात करत शेळीपालन प्रकल्प राबवला. या प्रकल्पाने कराडच्या शेतीक्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला असून सामान्य शेतकरी या भाऊसाहेब ढेबे यांच्यासह त्यांच्या शेतमजूर कुटुंबाने बरोजगार तरूणांसमोर आपल्या कष्टाने आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
कराडलगतच कापिल हे गाव असून या गावातील ढेबे कुटुंबिय वर्षानुवर्षे शेतात मजुरी करत स्वकर्तृत्वावर उभा राहण्यासाठी धडपतडत होते. वडिलोपार्जित शेतजमिन मिळवण्यासाठी त्यांचा लढा सुरू होता. भाऊसाहेब ढेबे यांनी त्यासाठी शाळकरी वयापासून प्रयत्न सुरू ठेवले होते. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून संघर्षमय परिस्थितीत कुटुंबाला उभा करण्यासाठी त्यांचा झगडा सुरू झाला. मजुरी करून जे कमवायचे ते कोर्टकचेरीच्या फेर्यात गमवायचे असा त्यांचा प्रत्येक दिवस होता. शेतकरी हा मनाने आणि विचारानेही खंबीर असतो. हे ढेबे कुटुंबाने दाखवून देत कष्टावर निष्ठा ठेवून पशुपालन, शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली. सुरूवातीला प्रचंड नुकसान, मान अपमान सहन करावे लागले. व्यवसाय बंद करावा आणि पुन्हा मजुरी करावी अशी मनस्थितीत भाऊसाहेब ढेबेंसह त्यांचे कुटुंबिय असताना या तरूणाने 2014 साली मोठ्या विश्वासाने शेळीपालन व्यवसायाची व्याप्ती वाढवली. कर्जासाठी बँका उभ्या करत नसतानाही त्यांनी व्यवसायात कष्ट सुरू केले. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील शेळीपालनाचे प्रकल्प त्यांनी पाहिले. जे चांगले वाटले ते कापिलच्या आपल्या प्रकल्पात राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सध्या शेळीपालनासाठी त्यांनी अद्ययावत 107 बाय 62 फुटांचे सुसज्ज शेड उभारले आहे. शेडशेजारील विहीरीचे पाणी आवश्यक तेथे पुरवले असून चारही बाजूनी पाच फुटांची सुरक्षा भिंत बांधली आहे. सदृढ शेळ्यांची पैदास करण्यासाठी मुबलक हिरवा व वाळलेला चारा, त्यांची शारिरिक देखभाल करून वेळोवेळी औषधोपचार केले जातात. सध्या त्यांच्याकडे शिरोही, उस्मानाबादी, बोर, सोजत, जमुनापारी, तोतापुरी, लहान नर व मादी अशा चारशे शेळ्या, बोकड आहेत. त्यांची विक्रीही आता सुरू झाली आहे. हजारांच्या आकड्यात कसाबसा सुरू केलेला व्यवसाय आता लाखांच्या आकड्याच्या व्यवहारापर्यंत आला आहे. येथून पुढेही या व्यवसायात मजल मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
भाऊसाहेब ढेबे म्हणाले, शेळीपालन हा व्यवसाय सुरू करण्यापुर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी चेष्टाही केली मात्र आज या व्यवसायातील यशस्वी पाऊल टाकले असून हे बेरोजगार म्हणून वावरत आहेत. त्यांनी कापीलचा कल्पवृक्ष प्रकल्प पाहावा. हा प्रकल्प उभा करताना आजोबा कै. बाळू रामा ढेबे यांचे आशिर्वाद व आई बाळुताई ढेबे, वडिल विठ्ठल ढेबे, भाऊ आनंदा व नारायण ढेबे यांच्यासह पत्नी वैशाली ढेबे यांची मोलाची साथ लाभली. संघर्षातुन वाट काढल्यास निश्चित यश मिळते असा दावा ढेबे यांनी केला आहे.
शेळ्यांची ऑनलाईन विक्री...!
शेळीपालन व्यवसायाची व्याप्ती वाढल्यावर भाऊसाहेब ढेबे यांनी कापीलच्या माळावर सुसज्ज यंत्रणा उभी करत घराजवळच शेळ्यांसाठी स्वतंत्र दवाखानाही तयार केला. तज्ञ डॉक्टरांच्याकडून शेळ्यांची देखभाल करत लसीकरण केले जाते. पैदासीसाठी शेळ्यांची विक्री करताना त्यांनी सोशल मिडीयासह ऑनलाईन विक्रीचा फंडाही आत्मसात केला. त्यांच्या चिकाटी वृत्तीचा आदर्श इतर शेतकर्यांनी घेण्याची गरज आहे.
शाळांच्या सहली भेट देतात हेच यश
कापीलच्या शेतमजुराने राबवलेला शेळीपालन प्रकल्प आता शेतीक्षेत्रात चर्चेचा विषय ठरला असून कराडसह आजुबाजूच्या तालुक्यातील शाळांच्या सहली या प्रकल्पास भेट देतात. शालेय विद्यार्थ्यांना शेळीपालन व्यवसायाची सविस्तर माहिती देणारे फलक त्यांनी लावले असून विशेष म्हणजे व्यसनमुक्तीचे फलक लावून समाजजागृती करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. व्यसनमुक्तीच्या फलकांमुळे ढेबे कुटुंबाच्या कर्तृत्वाबाबत शेतकर्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मुलाच्या कर्तृत्वाने आयुष्य पुन्हा उभारले
भाऊसाहेब ढेबे यांच्या आई बाळुताई ढेबे शेळीपालन प्रकल्पाविषयी बोलताना भावनिक झाल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रु त्यांना लपवता आले नाहीत. त्या म्हणाल्या, शेतात मजुरी करून आम्ही प्रत्येक दिवस जगवण्यासाठी धडपडत होतो. सामान्य शेतकरी भाऊसाहेबासह त्यांच्या दोन्ही भावडांनी जिद्दीने शेती व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पावले टाकली. आमच्या डोळ्यादेखत त्यांन आम्हाला मिळवून दिलेला सन्मान व समाजात तयार केलेली प्रतिष्ठा आमच्या जगण्याला बळ देणारी आहे.
हालाखीचे दिवस बसलेले
भाऊसाहेब ढेबे यांच्या पत्नी वैशाली ढेबे म्हणाल्या, ढेबे कुटुंबियांनी पहिल्यापासून कष्ट केले आहे. त्यांनी कोणतेच काम कमी न लेखता अत्यंत हालाखीत दिवस काढले. जगण्याच्या धडपडीत भाऊसाहेब ढेबे यांनी शिक्षण सोडून दिले. पण कर्तृत्व असेल तर माणूस काहीही करू शकतो. हे त्यांनी व्यवसायात यशस्वी होऊन दाखवून दिले. त्यांच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबातील सर्वानच मदतीचे पाठबळ दिले. यापुढेही आम्ही त्यांच्या सोबत राहून व्यवसायाला हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्यवसाय जास्तीत जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.
शेळीपालन व्यवसाय फायद्याचा
भाऊसाहेब ढेबे म्हणाले, शेळीपालन हा व्यवसाय आर्थिक उत्पन्न देणारा असून त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. पहिले काही वर्ष त्रास सहन करावा लागतोच पण नंतर व्यवस्थापन जुळले की यशस्वी भरारी कोणीही रोखू शकत नाही. सध्या आहे त्या परिस्थितीत स्वच्छतेला महत्व देऊन व्यवसाय करत असून अंदाज घेऊन व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. कोणतेही काम करताना नकारात्मकतेचा सामना करावा लागतोच पण कुटुंबाने ताकदीने दिलेल्या पाठबळामुळे यशस्वी झाले. ज्यांना मार्गदर्शन किंवा प्रकल्प पहायचा असेल त्यांनी 9960867444 या मोबाईलवर संपर्क साधावा.
बेरोजगारांनी आदर्श घ्यावा
भाऊसाहेब ढेबे यांचे वडिल विठ्ठल ढेबे म्हणाले, शेळीपालन व्यवसाय हा शेती पुरक असून त्यामध्ये कष्ट व झोकून देण्याची तयारी असायला हवी. भाऊसाहेब ढेबे यांच्या मदतीला सर्व कुटुंब धावले. ढेबे कुटुंबाने एकत्रितपणे शेळीपालन व्यवसायासाठी कष्ट केले. त्या कष्टाचेच फळ म्हणून आज हा प्रकल्प शेतीक्षेत्रातील नावाजलेला प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. भाऊसाहेबाला हे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण त्याने माघार न घेता पुढे पाठपुरावा सुरू ठेवला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा