सहकार क्षेत्रामुळे कराड तालुका सुजलाम सुफलाम, अविनाश मोहिते हे कृष्णाकाठचे उमदे व हरहुन्नरी नेतृत्व पण स्वतःच्या अक्कल हुशारीवर राजकारण करण्यापेक्षा विघ्नसंतोषी तथाकथित सल्लागाराच्या सल्ल्याने करताहेत राजकारण


कराड तालुक्यात तीन सहकारी साखर कारखाना, एक खाजगी साखर कारखाना आहे. साखर कारखानदारीमुळे कराड तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे. आदरणीय स्व. पी. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले, माजी आमदार विलासकाका पाटील (उंडाळकर)यांनी कराड तालुक्यात सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. या सर्वांना मार्गदर्शन व सहकार्य केले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. केवळ सहकारी साखर कारखाने नव्हे तर दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायटी,सहकारी बँका, पतसंस्था, कुकुटपालन संस्था व शेतीपूरक अनेक संस्था कराड तालुक्यात कार्यरत आहेत.सहकार क्षेत्रामुळे कराड तालुक्यात अनेक रोजगाराचे स्रोत निर्माण झालेले आहेत. यामुळे या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न कधी सतावत नाही. दरम्यान सहकारी क्षेत्रातील गटबाजी व राजकारणाच्या ध्रुवीकरणामुळे काही वेळेला अनेक कामगारांवर हेतूपुरस्सर व राजकारणातील संकुचितपणामुळे अन्याय केला जातो.ही वस्तुस्थिती आहे हे कोणीही नाकारत नाही. आपल्या सोयीच्या राजकारणासाठी स्वताच्या मर्जीतील सेवकांची भरती करणे व विरोधकांच्या सेवकांना संस्थेबाहेर काढणे हे सत्तांतरानंतर प्रत्येक सहकारी संस्थेत होत असते.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर हे तालुक्यातील प्रमुख साखर कारखाने आहेत.सत्ताधार गटाविरोधात रान उठून सत्ता हस्तगत करण्यासाठी विरोधी गट सातत्याने प्रयत्न करीत असतो. हा खेळ केवळ कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रात दिसून येतो दरम्यान सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा आदरणीय पी. डी. पाटील यांच्यानंतर विद्यमान चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर कायम विश्चास आहे. रयत साखर कारखाना संक्रमण अवस्थेतून जात असून त्याला सावरण्यासाठी उदयसिंह पाटील यांनी प्रयत्न सुरू केला आहे.कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले हे काटकसरीने कारखाना चालवून कारखान्याची आर्थिक परिस्थिती भक्कम व सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जयवंत शुगरसाठी डॉ.अतुल भोसले नेहमी जागृत राहून अधिकाधिक उसाचे गाळप व्हावे यासाठी प्रयत्न करीत असतात.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते, यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होत असते. कारखान्याकडे नोंद झालेला ऊस नियोजनबद्धरित्या कॉम्प्युटराइज्ड नियोजनाने गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करीत असतात. यासाठी चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील कधीही यात हस्तक्षेप करीत नाहीत. प्रत्येकाचा ऊस नियोजनबद्धरीत्या गाळपास आला पाहिजे, यासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. इतकेच नव्हे तर सह्याद्री नेहमी ऊस दाराच्या बाबतीत राज्यात कायम अग्रस्थानी राहिला आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद ऊस उत्पादक सह्याद्री कारखान्यास ऊस घालण्याच्या प्रतीक्षेत असतात. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २०१८/१९ या गळीत हंगामामध्ये १७२ दिवसात १३१६९६३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून १६४८४५० क्विंटल साखरेच्या पोत्यांचे उत्पादन झाले आहे. एकूण एफ आर पी पैकी ८७ टक्के रक्कम हि ऊस उतापदकांच्या खात्यावर जमा केली आहे. आमदार बाळासाहेब पाटील हे नेहमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करीत असल्यामुळेच "सह्याद्री" कारखान्याच्यावतीने पुढील गळीत हंगामापासून प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरु होणार आहे.

कृष्णा सहकारी साखर कारखाना नेहमी शेतकरी सभासदांचा हिताचा विचार करीत असल्यामुळे आणि चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देऊन सवलत देण्यात प्रयत्न गेल्या चार वर्षांत करीत असल्यामुळे विरोधी गटाची आता चुळबुळ सुरू झाली आहे.कृष्णा कारखान्याचा लौकीक वाढविण्याचा सर्वार्थाने डॉ. सुरेश भोसले यांनी प्रयत्न
केला हे नाकारता येणार नाही. साखरेच्या दरावर एफआरपी अवलंबून आहे. शेतकर्‍यांना पूर्ण एफआरपी देणे शक्य व्हावे यासाठी साखरेचा किमान दर 3300 रूपये असावा, अशी साखर कारखानादारांची मागणी आहे. सध्या सरकारने साखरेच्या किमान विक्रीचा दर स्थिर ठेवल्याने आणि इथेनॉल निर्मितीलाही सरकार प्रोत्साहन देत असल्याने काहीअंशी साखर कारखानदांना दिलासा मिळाला. याचा सर्वांगीण अभ्यास करून डॉ. सुरेश भोसले हे "कृष्णा" कार्यक्षेत्रातील शेतकऱयांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत. कृष्णा कारखान्याच्या गेल्या 4 वर्षाच्या देदीप्यमान कामगिरीचा आलेख कौतुकास्पद असाच असल्याचे मत ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कृष्णा कारखान्यांच्या सत्ताधाऱ्यांकडून सभासदाचा मतदानाचा अधिकार काढण्याचे कारस्थान असून
साडेचार हजार सभासदांना नोटीसा दिल्या असल्याची माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी आरोप केला आहे. अविनाश मोहिते हे सध्या कृष्णाचे संचालक असताना हा ठराव झाला कसा ? हा त्यांनीच खुलासा करणे आवश्यक आहे.वास्तविक एक वर्षांनंतर कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार असल्याने आतापासूनच आरोपांची राळ उठवण्याची सुरुवात झाली आहे.क्रियाशिल सभासदांना अक्रियाशिल सभासदत्वाबाबत नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अविनाश मोहिते यांनी दिली, मात्र ते संचालक मंडळात मंडळात असताना हे घडलचं कसे ? वास्तविक या मुद्याचे राजकारणासाठी वापर केला जात आहे हे यातून स्पष्ट होते.कारखान्याचे ४९ हजार सभासद असून, १३० गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे. अविनाश मोहिते हे कृष्णाकाठचे राजकारणातील एक उमदे व हरहुन्नरी नेतृत्व आहे. दरम्यान ते स्वतःच्या अक्कल हुशारीवर राजकारण करण्यापेक्षा विघ्नसंतोषी व साखरेला मिठाचा दर्जा मिळावा अशा मानसिकतेत असणार्या तथाकथित सल्लागाराच्या सल्ल्याने राजकारण करत असल्याची चर्चा सध्या कृष्णाकाठ परिसरात जोरदार पणे सुरू आहे.

एकंदरीत सह्याद्री कारखान्यांचा गाडा सुस्थितीत चालू आहे. हे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कृतीतून सिद्ध केली आहे.रयत कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी उदयसिंह पाटील प्रामाणिक प्रयत्न करताहेत हे दिसून येत आहे. जयवंत शुगरचे काम डॉ. अतुल भोसले व्यवस्थित करताहेत. दरम्यान "कृष्णा"चे रणकंदन व संघर्ष नेहमी चालू रहावा यासाठी कृष्णाकाठचे विघ्नसंतोषी प्रयत्न करताहेत. एकंदरीत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शेतकरी सभासदांना सत्तास्थानी कोण आहे ? यापेक्षा आपल्या उसाला अधिकचा दर कोण देतो ? यांच्याशी मतलब असल्याने सत्तेसाठी हपापलेल्यांना नेहमी सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सभासद करीत आहेत.

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.