उत्कृष्ठ संसदपटू शंभूराज देसाई पुन्हा आमदार...!

उत्कृष्ठ संसदपटू शंभूराज देसाई पुन्हा आमदार...!


(गोरख तावरे)

कराडला लागून पाटण तालुका आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी विजयश्री मिळवला आहे.देसाई विरोधी पाटणकर हे या तालुक्यातील पारंपारीक विरोधक आहेत.विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव करून यापुर्वी शंभूराज देसाई  आमदार झाले होते.गतवेळी केवळ पाचशे मतानी पराभव झाल्यानंतर शंमूराज देसाई हे नाराज व नाउमेद न होता दुस-यादिवसापासून कामाला लागले होते याचमुळे किमान 18हजाराचे मताधिक्य मिळवून शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र व राष्ट्रवादीचे उमेदवार सत्यजीत उर्फ बच्चू पाटणकर यांना धुळ चारत दणदणीत यश मिळवले आहे.

गतवेळच्या आपल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून छाप पाडणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे विधिमंडळातही अनेक नेत्यांच्या कौतुकाचा विषय ठरले होते. त्यांच्या विधिमंडळातील कामकाजामुळे त्यावेळचे विरोधी नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभावित झाले होते. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी काँग्रेस आघाडीशी दोन हात करताना फडणवीसांना देसाईंची उणीव भासली होती. ती त्यांनी बोलूनही दाखवली होती. आता पाच वर्षांनी हे दोन्ही संसदपटू विधिमंडळात भेटणार आहेत.शिवसेनेचे अभ्यासू आमदार म्हणून शंभूराज देसाईंची ओळख निर्माण झाली आहे.सामान्य लोकांच्या समस्या सोडविणे,पाटण तालुक्याचा सर्वांगिण विकास करणे,शासनस्तरावरील जादा निधी मिळवून लोकांचे प्रश्न मार्गी लावणे यासाठी सर्वाधिक वेळ शंभूराज देसाई देत असतात.

शंभूराज देसाई यांनी 2004 ते 2009 या कालखंडात पाटणमधून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. विरोधी पक्षात असताना शंभूराज देसाई यांनी विधिमंडळात आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडली. लक्ष्यवेधी या आयुधाचा वापर करत पाटण तालुक्याच्या विकासाचे निर्णय घडवून आणले. केवळ तालुक्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक प्रश्नांवर देसाई सभागृहात पोटतिडकीने बोलत. देवेंद्र फडणवीस भाजपाचे आणि शंभूराज देसाई शिवसेनेचे. ही जोडी मग सभागृहात काँग्रेस आघाडीला  धारेवर धरत असत.आघाडीच्या मंत्र्यांना कोंडीत पकडून चूकीचे काम कराल तर आम्ही जाब विचारू हा धाक निर्माण करण्यात ही जोडगोळी यशस्वी झाली होती.

शंभूराज देसाई हे नवखे आमदार असताना अगदी अभ्यास करून विविध विषयांवर बोलत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. अर्थसंकल्प हा फडणवीस यांच्या आवडीचा विषय. या विषयावरही शंभूराज देसाई यांनी सभागृहात भाषणे केली होती. त्यामुळेच फडणवीस प्रभावित झाले होते. 2009 पासून सुरू झालेल्या नवीन विधानसभेत त्यांना अशाच एका क्षणी शंभूराज देसाई सभागृहात नसल्याची जाणीव झाली. त्यावेळी त्यांनी एसएमएस पाठवून ‘मित्रा विधिमंडळात तुझी आठवण येतेय, भेटू 2014 साली’ असा एसएमएस शंभूराज देसाईंना पाठवला होता. ही घटना 2011 सालची आहे. त्यानंतर आता झालेल्या विधानसभेत शंभूराज देसाई सुमारे 18 हजारांच्या आघाडीने विजयी होऊन विधिमंडळात दिमाखदार शिवसेनेचे आमदार म्हणून प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे शंभूराज देसाईंच्या अगोदर फडणवीस यांना विधिमंडळाचा उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला होता. तोच पुरस्कार शंभूराज देसाई यांना 2009 साली मिळाला होता.आता शंभूराज यांची दुसरी टर्म सुरू होत आहे.शिवसेनेचा वाघ,पाटणचा कर्ताकरविता,विकास कामांची जाण असणारा लोकप्रतिनिधी असे व्यक्तीमत्व असल्याने पाटणच्या मतदारांनी शंभूराज देसाई यांना भरभरून मत दिली आहेत.

देवेंद्र व शंभूराज ही अभ्यासू आमदारांची जोडी 2014 च्या विधानसभेत पुन्हा दिसणार आहे. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असणार आहेत. तर देसाई हे शिवसेनेचे अनुभवी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. फडणवीस आणि देसाईंच्या या मैत्रीने पाटण तालुक्याच्या विकासाचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागतील, असा आशावाद देसाई समर्थकांना आहे.विरोधात असतानाही पाटणच्या जनतेचे प्रश्न ,समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न जनता विसरली नाही याचमुळे शंभूराज देसाई यांना भक्कम पांठीबा देवून पाटणच्या जनतेने शंभूराज देसाईंना आमदार म्हणून निवडले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.