मलकापूरच्या जनतेचा कौल कोणाला ? नगरपालिकेला कोण करतोय विरोध ?


मलकापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यानिमित्ताने आता राजकीय फड रंगू लागला आहे. अल्पावधीत विकास कामे करण्याची सर्व मर्यादा मलकापूर नगरपंचायतीने ओलांडल्या आहेत. माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या स्वप्नातील मलकापूर सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे करीत आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करणारे मनोहर शिंदे इतर वेळी सर्वांच्या बरोबर एक दिलाने कारभार करीत असतात. मलकापूर ग्रामपंचायतीचे मलकापूर नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यामध्ये उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

मलकापूर नगरपंचायतीचे मलकापूर नगरपालिकेत रूपांतर व्हावे यासाठी मनोहर शिंदे कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मलकापूर नगरपालिकेसाठी आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव, कागदपत्रांची पूर्तता केली गेली आहे. राज्य शासनाची मान्यताही मिळेल असे मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे. दरम्यान मलकापूर नगरपालिकेचे श्रेयवाद रंगतोय, असे सध्या दिसून येत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शासनाकडे मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा द्यावा. अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्यासंबंधाने काही लोक अडचण निर्माण करतात व राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मलकापूर शहराला ग्रामपंचायत असल्यापासून पृथ्वीराज चव्हाण या गावाचे विकासासाठी विविध प्रकारचा निधी देत आहेत. सर्व बाबतीत मलकापूर परिपूर्ण करून राज्यापुढे आदर्श शहर निर्माण करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण केंद्र सरकारचा व राज्य सरकारकडील विविध प्रकारचा निधी विकासकामांना देत आहेत. राज्यातील इतर शहरांना दिशा दाखवणारे काम मलकापूरकडून होत असून आता नगरपंचायतीची नगरपालिका होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगितलेले आहे. मलकापूरने नगरपालिका दर्जा मिळण्यासाठी जे निकष लागतात ते सर्व पूर्ण केले आहेत.

केवळ राजकीय लाभासाठी व राजकीय आकसापोटी याला छुप्यापद्धतीने विरोध होत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मलकापूर नगरपालिका झाल्यास मलकापूर ही राज्यातील सर्वात आर्थिकदृष्टय़ा सक्षम नगरपालिका होणार आहे. राज्यात व केंद्रात सध्या भाजपचे सरकार आहे यामुळे भारतीय जनता पार्टीचे डॉ. अतुल भोसले हे देखील मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. मग प्रश्न पडतो तो असा की, मलकापूर नगरपालिका निर्माण करण्यासाठी खोडा कोण घालत आहे ? मलकापूरच्या आड येऊन कोणाला काय मिळवायचे आहे ? जो कोणी हा नतद्रष्टपणा करतील, त्यांना मलकापूरची जनता स्वीकारतील काय ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

सध्या तरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय विधाने होत आहेत. असे मानण्यास वाव आहे. मलकापूरच्या आड येऊन कोणालाही राजकीय फायदा होणार नाही ! उलट मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी शासनस्तरावर एक होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये नागरिकांच्या समोर जे विकासाचे मुद्दे घेऊन जातील, त्यांना मलकापूरची जनता स्वीकारेल. माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या स्वप्नातील मलकापूर सत्यात उतरविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना मदत करणे, सहकार्याचा हात देणे आवश्यक आहे.

कारण कराड तालुक्यातील अनेक गावे अशी आहेत कि, त्या गावांमध्ये एकाच आडनावांचे अनेक कुटुंब आहेत. म्हणूनच शिंदे यांचे मलकापूर म्हणून पूर्वीची ओळख आहे. ती पुसली जाऊ नये. मलकापूर शहरात शिंदेंचे वर्चस्व होते व आहे. कराडला लागून मलकापूर असल्याने कराड मोठा भाऊ व मलकापूर छोटा भाऊ असे संबोधले जात आहे. मलकापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष मलकापूर नगरपंचायत आपल्या ताब्यात यावी, यासाठी प्रयत्न करतील. तर नगराध्यक्ष आपल्याच पक्षाचा व्हावा ! यासाठीही प्रयत्न करत राहतील. दरम्यान मलकापूरची जनता कसा ? व कोणाला कौल देतात ? हे येणाऱ्या काळामध्ये पाहावे लागेल.

गोरख तावरे,
कराड - 9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.