मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विठ्ठल रूपाने मस्तकावर हात

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासनाने नुकताच आदेश पारीत केला आहे. भोसले कुटुंबीयांनी सहकार व वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेले काम हे नेत्रदीपक व कौतुकास्पद आहे. कै.जयवंतराव भोसले यांचा सहकाराचे शिल्पकार म्हणून सन्मान करण्यात आला आहे. तर य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले हे विद्यमान कारखान्याचा कार्यभार सांभाळत आहेत. डॉ. अतुल भोसले यांना सामाजिक, राजकिय, शैक्षणिक कार्याचा वसा व वारसा आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी मागील वर्षी डॉ. अतुल भोसले यांची निवड झाली. गेल्या वर्षभरात विठ्ठल भक्तांना मंदिर समितीच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अशी, मला मिळालेला बहुमान समस्त वारकरी संप्रदायाचा आणि कराडवासीयांचा असून, या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार अाहेत. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. यानुसार गत एक वर्षामध्ये डॉ. अतुल भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने अनेक बदल व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मंदिर समिती भाविकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून टोकण व्यवस्था हा एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना विठ्ठल दर्शन सुलभ होणार असून भाविकांना तासंतास रांगेत उभे रहावे लागणार नाही.

लवकरच टोकण व्यवस्था हि प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली जाणार आहे. स्वर्गीय जयवंतराव भोसले हे अतुल भोसले यांचे नातू आहेत. तर डॉ. सुरेश भोसले यांचे सुपुत्र आहेत. कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने दररोज अनेक रुग्णांना माफक शुल्क आकारणी करून तर काहींना मोफत आरोग्याची सुविधा दिली जाते. माजी मंत्री व ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते हे डॉ. अतुल भोसले यांचे चुलत आजोबा. छत्तीस वर्षांनंतर भोसले - मोहिते कुटुंबियांना सत्तेमध्ये संधी मिळाली आहे. स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी शिवसेनेतर्फे कराड लोकसभा निवडणूक लढवली होती. डॉ. अतुल भोसले यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि सध्या भारतीय जनता पार्टी असा आहे. उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती. कराड दक्षिण मतदार संघातून भाजपातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. डॉ. अतुल भोसले यांचा राजकीय प्रवास पाहून राज्यातील सरकारने त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद बहाल केले. आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा या पदाला देऊन डॉ. अतुल भोसले यांचा सन्मान केला आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते, सहकाराचे शिल्पकार स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या कर्मभूमीत जन्मलेले डॉ. अतुल भोसले यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद मिळाले. यानंतर त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मी जे काही काम करीन ते निश्चितपणे वरील महनीय व्यक्तींना स्वर्गातून पाहताना अभिमान वाटेल, असेच काम करण्याची ग्वाही अतुल भोसले यांनी दिली आहे. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान भारतामध्ये एक नंबरचे करण्यासाठी जो प्रयत्न करावा लागणार आहे. त्याची सुरुवात डॉ. अतुल भोसले यांनी केली आहे. बालाजी व शिर्डी देवस्थान येथील व्यवस्थेबाबतचा अभ्यास करून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सहज सुलभ विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी नियोजन केले जात आहे. अलीकडच्या काळामध्ये डॉ. अतुल भोसले यांचे संत साहित्याचे वाचन सुरू असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी डॉ. अतुल भोसले प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. हे ते करीत असलेल्या कामावरून दिसून येत आहे. सहकार, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉ. अतुल भोसले सध्या संत मार्गावरून वाटचाल करीत आहेत. संत वाङ्ममय, संत परंपरा, संत साहित्य, संस्कृती, संवर्धनासाठी संत विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी अभ्यास गटाची निर्मिती शासनाने केली आहे.

डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे कराड दक्षिण मतदार संघामध्ये या संधीचा विविध प्रकारे राजकीय अर्थ काढला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विठ्ठल रूपाने आपल्या मस्तकावर हात आहे असेही डॉ. अतुल भोसले कबूल करतात. सर्वच राजकीय व्यक्तीनी निवडणुकीपुरता राजकारणाचा विचार करावा इतर वेळी विकासात्मक कामांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. असेही डॉ. अतुल भोसले स्पष्टपणे आपला विचार व्यक्त करतात. गतकाळात अतुल भोसले यांनी ज्यावेळेपासून सहकार, राजकीय, वैद्यकीय आणि संत परंपरेत कामास सुरुवात केली जेव्हापासून त्यांचा प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे हे निदर्शनास येत आहे.

गोरख तावरे,कराड
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.