कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची लढाई बहुरंगी होणार कराड उत्तरमध्ये आमदारकीसाठी उमेदवारांनी रणशिंग फुंकले

विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असतानाही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राजकीय जुळवाजुळवी सुरू झाली आहे. कराड उत्तरमध्ये जिल्हा परिषदेचे नऊपैकी पाच सदस्य कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे धैर्यशील कदम यांनी शड्डू ठोकला आहे. निवडणुकीच्या मतपत्रिकेवर धैर्यशील कदम हे नाव असणार ! अशी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांी यावर जोरदार आक्षेप घेतला. तर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील "नरोवा कुंजरोवा" भूमिकेत आहेत. कराड उत्तरमध्ये भाजप विजय होऊ शकतो अशी यापूर्वीच सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजपाच्या वतीने मनोज घोरपडे कराड उत्तरचे उमेदवार असणार आहेत. 

धैर्यशील कदम यांनी विधानसभेची २०१४ निवडणूक लढवली आहे. यापूर्वी पेक्षा सध्या कराड उत्तरमध्ये निवडणुकीसाठी कॉंग्रेसची परिस्थिती चांगली व  मजबूत झाली आहे. गतवेळी धैर्यशील कदम यांना विधानसभा निवडणुकीच्यावेळी ५८ हजार मते मिळालेली आहेत. तर मनोज घोरपडे यांना ४४ हजार मत मिळाली होती. विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना ७८ हजार  मते मिळवून बाळासाहेब पाटील विजयी झाले. सलग चार वेळा बाळासाहेब पाटील विधानसभेला निवडून आलेले आमदार आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीप्रमाणेच पुढील निवडणूकही या उमेदवारांमध्ये होणार आहे हे निश्चित. दरम्यान धैर्यशील कदम यांना मिळालेली मते ही त्यांची व्यक्तिगत मते नसून ती काँग्रेस पक्षाची मते आहेत त्यामुळे धैर्यशील कदम यांनी त्या मतावर अधिकार सांगू नये. अशी भूमिका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी घेतली असून धैर्यशील कदम यांची उठाठेव म्हणजे राजकीय तडजोडीचा दर वाढवून घेण्याचा प्रकार आहे.असा आरोपही केला आहे. यामुळे काँग्रेस अंतर्गत गटबाजी होते की काय अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.

धैर्यशील कदम यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस ते काँग्रेस असा असून सध्या ते भाजपच्या संपर्कात असल्याने काँग्रेसचे राजकीय नेते नाराज झाले आहेत. धैर्यशील कदम यांनी वर्धन अग्रो नावाने खाजगी साखर कारखाना सुरू केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेशी असलेली सलगी आणि डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपद दर्जा मिळाल्यानंतर त्यांचे प्रत्यक्ष भेटून केलेले अभिनंदन यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंतांमध्ये धर्यशील कदम यांच्याबाबत नाराजी निर्माण झाली आहे. कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधक म्हणून अतुल भोसले कार्यरत आहेत. दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण असून भावी आमदार म्हणून डॉ.अतुल भोसले यांची जाहिरातबाजी सुरू आहे. काँगे्रस पक्ष वा नेत्यांविषयी चुकीचे बोललो नव्हतो, माझ्यावर जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. असा खुलासा देखील कदम यांनी केला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वाद वाढवू नका. बसून मिटवू, असा सल्ला धर्यशील कदम यांना दिला आहे.

गेल्या वीस वर्षांपासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब पाटील प्रतिनिधित्व करीत आहेत. दरम्यान कराड उत्तरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून  येऊ शकतो अशी शक्यता सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी (मसूर ता. कराड) येथे मेळावा आयोजित करून व्यक्त केला आहे. तर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कराड उत्तरला मनोज घोरपडे व कराड दक्षिणला अतुल भोसले यांची भाजपतर्फे उमेदवारी जाहीर केली आहे. मनोज घोरपडे यांनी कराड उत्तर मतदारसंघामध्ये संपर्क गतिमान केला आहे. मनोज घोरपडे व माजी आमदार प्रभाकर घार्गे संयुक्तीकपणे खासगी कारखाना उभा करीत आहेत. कराड उत्तर हा यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ. पी. डी. पाटील यांनी उत्तरमध्ये सहकाराचे जाळे विणले आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पी. डी. पाटील व विद्यमान चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून सिंचन योजना पूर्ण करून संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रातील जमीन ओलिताखाली आणून शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे.

कराड तालुक्यात तळागाळापर्यंत सहकार रुजला आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य व शेतकरी वर्गाकडे आर्थिक सुबत्ता आली आहे. तर आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे असणारी आमदारकी आपणाला मिळावी म्हणून सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला जातो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळून बाळासाहेब पाटील यांचे तिकीट कापून निवडणूक लढवली होती. गत विधानसभा निवडणुकीवेळी धर्यशील कदम व मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवलेली आहे. सध्या हे दोन्ही नेते निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहेत. डॉ. अतुल भोसले यांचा जयवंत शुगर,  धैर्यशील कदम यांचा वर्धन अग्रो आणि मनोज घोरपडे यांचा नियोजित साखर कारखाना हे तिन्ही साखर कारखाने खाजगी साखर कारखाने आहेत. आमदारकी मिळवायची असेल तर साखर कारखाना हवा, यामुळे  साखर कारखाने उभे केले जाताहेत. ज्या कारणांनी मतदार उघडपणे बाहेर पडू शकत नाहीत. याचा विचार करुन अहोरात्र प्रयत्न केले आणि वर्धन अग्रो कारखान्याची उभारणी केली.व  यशस्वीपणे गळीत हंगामाची चाचणीही झाली आहे. त्याचा आगामी निवडणुकीत परिणाम दिसेल. असा विश्वास धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला आहे.

एकंदरीत कराड उत्तरचे राजकारण सहकारी अथवा खासगी साखर कारखाना भोवती फिरवले जात आहेत. मी निवडणूक लढवणारच असा निश्चय धैर्यशील कदम यांनी धरला आहे तर भाजपाच्यावतीने निवडणूक लढविण्याची तयारी मनोज घोरपडे यांनी केली आहे. तर गेल्या वीस वर्षांमध्ये आपण केलेली विकासकामे व उत्तरच्या मतदारांशी असणारा स्नेह व त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असल्याने आमदारकीचा रौप्यमहोत्सवी विजय मिळवण्याचे नियोजन आमदार बाळासाहेब पाटील करीत आहेत. कराड तालुक्यातील वाढणाऱ्या राजकीय हालचाली पाहता मतदार सर्व घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

गोरख तावरे,कराड
9326711721



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.