बा विठ्ठला पंढरपूर वासियांना सद्बुद्धी दे . . !



पंढरपूरचा विठ्ठल हा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. कष्टकऱ्यांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. लाखो वारकरी दरवर्षी अनवाणी पायाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे. याचा विचार करून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अत्याधुनिक सोयी सुविधेसह भक्त निवास बांधले आहे. विशेष म्हणजे आयजीबीसी या संस्थेने या इमारतीला मानाकन दिले असून पहिली “ग्रीन बिल्डींग” ठरली आहे. या भक्त निवासामध्ये सुमारे १२०० भाविक मुक्काम करू शकतील, अशी उभारणी केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दूरदृष्टीने भक्तनिवासाची उभारणी केली आहे. याचा रास्त अभिमान व आनंद वारकरी संप्रदायातील वारकऱयांना झाला. मात्र स्थानिक पंढरपूरकर वासियांना याचा आनंद झालेला दिसत नाही. भक्त निवासाची चर्चा होण्यापेक्षा भक्तनिवास लोकार्पण सोहळ्याचे राजकारण नाट्यावर चर्चा सुरू आहे.

डॉ. अतुल भोसले यांनी लोकार्पण सोहळ्यासाठी कराड मधून कार्यकर्ते कार्यक्रमासाठी वारकरी म्हणून आणले असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. याचा अर्थ असा होतो की, जर कराडमधुन कार्यकर्ते अतुल भोसले यांना आणावे लागले तर पंढरपूर वासिय झोपले होते काय ? पंढरपूरमधील स्थायिक असणारे वारकरी कोठे गेले होते ? भक्त निवास लोकार्पण सोहळ्याचा इतका राग व मत्सर पंढरपूर वासियांच्या मनामध्ये का निर्माण झाला आहे ? पंढरपूर वासियांनी संत परंपरा सोडून दूषणे देण्याचा विचार जोपासला आहे का ? संतभूमीत उभारलेले भक्त निवास हे पंढरपूरच्या सौंदर्यात भर घालणारे नाही का ? पंढरपूरकरांनी सकारात्मक दृष्टी बदलून नकारात्मक दृष्टीचा अंगीकार केला आहे का ? चांगल्याला चांगले व वाईटाला वाईट म्हणता म्हणता चांगल्याला ही वाईट म्हणन्याची पंढरपूर वासियानी कला अवगत केली आहे का ? डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कार्यकर्ते हेच वारकरी आहेत असं भासवण्याचा प्रयत्न केला, कराडहून तीन हजार कार्यकर्ते घेऊन अतुल भोसले कार्यक्रमाला आले होते असा मीडियाने शोध लावला आहे. वादासाठी हे सत्य आहे. असे म्हटले गेले तर मग पंढरपूर वासिय इतके आलिशान भक्तनिवासाचे लोकार्पण सोहळा होत असताना कसल्या तंद्रीत व निद्रावस्थेत होते. ते कार्यक्रमस्थळी का आले नाहीत, हे स्थानिकांनीच याचा खुलासा करणे गरजेचे आहे.

भक्त निवास लोकार्पण सोहळ्या संबंधाने मोजकरच प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक पाहता या अनुशंगाने अजून बरेच (अगणित ) प्रश्न निर्माण होतात. मात्र उकिरडा कितीही खोदला, विस्कटला तरी त्यातून दुर्गंधीच येणार. डॉ. अतुल भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले याचा फटका अनेकांना बसला व अनेकांचे नुकसान झाले. याचा राग सध्या आळवला जात आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ज्या पंढरपूर नगरीत विठ्ठल रुक्मिणी युगेन युगे आहेत. त्या मातीतील रहिवाशांनी येणाऱ्या वारकऱ्यांची निशुल्क सेवाच केली. मात्र ते होणे शक्य नाही कारण प्रत्येकाचा घरसंसार व प्रपंच आहे. डॉ. अतुल भोसले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अनेकांची गैरसाय झाली याबद्दल माफी मागितली. कारण मंदिर समितीच्या बैठकांमध्ये अनेक कडू निर्णय अतुल भोसले यांनी ठामपणे घेतले. काही प्रथा बंद केल्या. पांडुरंगाची सेवा पारदर्शक व प्रामाणिकपणे करण्याच्या दृष्टीने निर्णय झाले. त्याचा राग व मत्सर अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता आणि याला आता वाट करून दिली जात आहे. ती भक्त निवास लोकार्पण सोहळय़ांच्या निमित्ताने. असो.

डॉ. अतुल भोसले हे सहकाराचे शिल्पकार जयवंतराव भोसले यांचे नातू आहेत. जयवंतराव भोसले यांनी निर्माण केलेले शैक्षणिक, वैद्यकीय, सहकार क्षेत्रातील दीपस्तंभासारख्या संस्था डॉ. अतुल भोसले सक्षमपणे चालवित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद दिल्यानंतर डॉ. अतुल भोसले यांच्या आंतरिक मनातील धार्मिक सदविचार, सदभावना प्रकट झाल्या आणि त्या समाजासमोर आल्या आहेत. हे पंढरपुरातील त्यांचे काम पाहिल्यावर निदर्शनास येत आहे. वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे लहान, थोर, मोठा असा भेदभाव नसतो, एकमेकाला भेटल्यावर चरण स्पर्श केला जातो. याच परंपरेनुसार सर्व अहंभाव बाजूला ठेवून अतुल भोसले वारकरी संप्रदायात रममाण झाले आहेत. भक्त निवास लोकार्पण सोहळ्यात त्यांनी ज्या व्यक्तींचा सत्कार केला त्यांचे चरणस्पर्श केला. कराडचा युवा नेता, लातूरचा लाडका जावई पंढरपूरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाला, आध्यात्मिक परंपरेत सामावला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या संधीचे केवळ "सोने"च नव्हे तर पंढरपूरकर वासियांना सदा सर्वकाळ सुख, समाधान, ऐश्वर्य मिळावे असे काम डॉ. अतुल भोसले करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाराष्ट्राला हजारो वर्षांची संत परंपरा आहे. दरम्यान संत साहित्यावर अभ्यास करण्यासाठी वेगळे संत विद्यापीठ भारत देशात कोठेही नाही, ते पंढरपूरमध्ये निर्माण होणार आहे. या संबंधाने लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला असून लवकर पंढरपूरमध्ये संत साहित्यासाठी संत विद्यापीठ उभे राहील यासाठी आता अतुल भोसले उर्वरित काळामध्ये काम करतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरस्थित कार्यक्रमांमध्ये संत विद्यापीठ स्थापनेला चालना दिली जाईल अशी घोषणा केली. याकडे स्थानिक मीडियाने दुर्लक्ष केले याला काय म्हणायचे ? पंढरपुरच्या दृष्टीने संत विद्यापीठ होणे हे पंढरपूरचा गौरव आहे. पंढरीत पांडुरंगाच्या भूमीत संत विद्यापीठ उभारणे म्हणजे विठ्ठल मंदिराच्या कळसावर वारकरी पताका अधिक डौलाने फडकणारे असा आहे. संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून धार्मिक, अध्यात्मिक अभ्यास करू पाहणारे तज्ञ पंढरपूरात येतील. ही पंढरपूरकरांसाठी अभिमानाची व स्वाभिमानाची बाब असली पाहिजे.

"उघडा डोळे पहा नीट"

विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इमारतीमधील सांडपाणी, पावसाचे पाणी यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच धार्मिक, आरोग्यदायी तसेच देशी वृक्ष लागवड केली आहेत. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व्हे नंबर ५९ इथे दर्शनाला आलेल्या भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास बांधण्याची संकल्पना तत्कालीन अध्यक्ष अण्णा डांगे यांनी मांडली होती. हे वास्तव डॉ. अतुल भोसले विसरले नाहीत म्हणूनच सन्मानाने अण्णा डांगे यांना निमंत्रण पाठवले होते आणि अण्णा डांगे ही कार्यक्रमाला उपस्थित होते. याबाबतही कोल्हे कुही केली होती. दरम्यान भाविकांच्या आणि मंदिर समितीला उत्पन्न वाढीचा विचार करून डॉ. अतुल भोसले यांनी काही
बदल केले. शासनाकडून समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्यावर डॉ. अतुल भोसले यांनी त्याला आधुनिक “टच” दिला. यामध्ये डॉ. अतुल भोसले यांचे चुकले काय ? विशेष म्हणजे या इमारतीमधील कोणतेही घाण, सांडपाणी, बाहेर न जाता त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन केले. सुनिश्चित नियोजन करणे चूक आहे का ? पावसाचे वाया जाणारे पाणी, सांडपाणी या वर प्रक्रिया करून हे पाणी इमारतीतील वृक्षांना देण्यात येणार आहे. तसेच इथे जमा झालेला कचरा खोलीच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून खत निर्मितीही केली जाणार आहे. यासाठी एक अत्याधुनिक यंत्र इमारतीमध्ये बसविण्यात आले आहे. सध्या देशभरामध्ये केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये हजारो नगरपालिकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान पंढरपूर नगरपालिकेचा सहभाग यामध्ये दिसून येत नाही.

विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इमारतीमध्ये आग किवा अन्य दुर्घटना झाल्यास ती घटना आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री बसविण्यात आली आहे. आगीची घटना घडली तर काही सेंकदात ऑक्सिजन आणि पाण्याचा फवारा सुरु होईल. तसेच ज्या ठिकाणी आग लागली. त्या ठिकाणी “हाय प्रेशर” पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचा अर्थ पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या वारकर्‍यांच्या सुरक्षेचाही अत्यंत बारकाव्याने विचार केला गेला आहे. वारकऱ्यांची सुरक्षा व आरोग्याचा चांगुलपणाने चांगला विचार करणे हे गैर आहे का ? असा प्रश्न पंढरपूर वासीयांना करावासा वाटतो. टोलेजंग भक्तनिवास बांधण्याचाच केवळ हा हेतू नाही तर या ठिकाणी वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याचबरोबर या भक्त निवासामध्ये तुळस, झेंडू, लाल फुल, २७ नक्षत्रांची २७ वृक्षे आदी धार्मिक तसेच आरोग्यदायी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षत्रांची लागवड करताना जे नक्षत्र सुरु आहे. त्या नक्षत्रावर वृक्ष लावले आहेत. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" . . . याप्रमाणे वृक्षांची जोपासना करण्याच्या दृष्टीने भक्त निवासामध्ये प्रयत्न केला आहे.

भक्त निवासमध्ये ८ लोकांना एकत्र राहता येईल. असे ७८ हॉल तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच लोकांना एकत्र राहता येईल असे ६३ हॉल तयार करण्यात आले आहेत. २ बेड असलेल्या ८१ रूम, दोन बेडचे व्हीआयपी वातानुकूलित ५१ रूम्स, व्हीआयपी ८ सूट, व्हीव्हीआयपी ६ सूट अशी राहण्याची सोय करण्यात आली आहे.मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना तसेच इथे येऊन काही महिने राहणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी वन बीएचके फ्लॅट देखील तयार करण्यात आले आहेत. एकाच वेळेला अनेक लोक जेवण करतील असे सुसज्ज शाकाहारी रेस्तराँ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी २२०० चौरस मीटरचे लॉन व १५ बाय ०९ मीटरचा स्टेज देखील तयार करण्यात आला आहे. भक्त निवासच्या दर्शनी बाजूस ४३ गाळे देखील बांधण्यात आले आहेत. तसेच २७३ चार चाकी वाहने व २०० दुचाकी बसतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरीचा पांडुरंग कष्टकऱ्यांचा देव आहे हे सर्वश्रुत आहे. दरम्यान देव भक्तांमध्ये भेदभाव करीत नाही. समाजातील विविध स्तरांमध्ये असणाऱ्या उच्चपदांपासून उद्योगपतींपर्यंत' शेतात राबणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांपर्यंत सर्वांनाच विठ्ठल रुक्मिनी भक्त निवासामध्ये राहण्याची सोय केली गेली आहे. आता यापुढे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाणार आहे. या आधुनिक आणि वारकरी भाविकांसाठी बांधलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे.

"बा विठ्ठला पंढरपूर वासीयांना सदबुद्धी दे . . !" असे खेदाने पांडुरंगाकडे मागणी करावी लागत आहे. कारण डॉ. अतुल भोसले यांना मिळालेली संधी त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाने सिद्ध करून दाखवली आहे. सध्या अतुल भोसले हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचा मान, सन्मान केवळ पंढरपूर वासियांनी नव्हे तर अखंड महाराष्ट्राने केला पाहिजे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीबाबत सकारात्मक विचारांनी, सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, नकारात्मक दृष्टीने पाहिले तर सर्व जगाच पिवळे दिसेल. म्हणून अखेरीस पुन्हा एकदा "बा विठ्ठला सर्वांना सदबुद्धी दे . . ! "

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.