मलकापुर नगरपरिषद निवडणुकीत नामदार विरुद्ध आमदार गटांमध्ये लढत होणार
मलकापूर नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे आता मलकापूरमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. वास्तविक निवडणुका म्हटल्या की आरोप-प्रत्यारोप होणार. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवी असते, यामध्ये काही गैर आहे असे नाही. दरम्यान आरोपाची पातळी घसरली नाही पाहिजे, याचे भान मात्र सर्वांनीच पाळले पाहिजे.कसे असेल मलकापूर निवडणुकीतील राजकीय चित्र. याचा विचार केला गेला तर माजी मुख्यमंत्री व विद्यमान कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले या दोघांच्या गटामध्ये मलकापूरमध्ये राजकीय संघर्ष पहावयास मिळेल. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सांभाळणार आहेत माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे. तर डॉ. अतुल भोसले यांच्या बाजूने ज्येष्ठनेते, शेतीमित्र अशोकराव थोरात गड लढणार आहेत. दरम्यान काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत मलकापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये पहावयास मिळणार आहे.
काँग्रेस व भाजपाने आत्तापर्यंत उमेदवारांची चाचपणी केली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अर्ज भरण्याच्या दिवसापासून ज्यांना शुभमुहूर्त सापडेल अशा शुभमुहूर्तावर निवडणुकीसाठी अर्ज भरले जातील.मलकापूरचा इतिहास पाहिला तर सुरुवातीच्या काळामध्ये मलकापूर ग्रामपंचायत होती, यानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आणि आता नगरपंचायतीची नगरपरिषद झालेली आहे. मलकापूर नगरपरिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच पंचवार्षिक निवडणूक होत असल्याने याठिकाणी चांगल्या प्रकारचे राजकीय लढत पाहावयास मिळेल हे निश्चित. मलकापूर शहराचा र्वांगीण विकास सुरू आहे. हे नाकारता येणार नाही कारण गतकाळामध्ये मनोहर शिंदे यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. त्याचबरोबर मलकापूर हे दक्षिण विधानसभा मतदार संघात येत असल्याकारणाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी राज्य शासनाकडून विकासासाठी निधी मतदारसंघात अनेक ठिकाणी आणला आहे. हे ही मान्य करावे लागेल.
गतकाळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूरसह कराड व दक्षिण विधानसभा मतदार संघात मोकळ्या हाताने विकास निधी दिला आहे. यामुळे अनेक शहरांचा चेहरामोहरा बदलला आहे. त्याचप्रमाणे मलकापूरवर पृथ्वीराज चव्हाण यांचे विशेषत्वाने लक्ष असल्याकारणामुळे केंद्र व राज्य शासनाकडून अधिकचा म्हणून जेवढा निधी मलकापूरला देता येईल तेवढा त्यांनी मलकापूरच्या विकासासाठी दिला आहे. काँग्रेस व भाजप मलकापूरमध्ये स्थानिक पातळीवर प्रथमच समोरासमोर लढणार आहेत. यामुळे निवडणुकीमध्ये कसे चित्र असेल हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. त्याचबरोबर काँग्रेसचे कोणकोणते उमेदवार मैदानात येतात व भाजपाचे कोणते उमेदवार त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करणार हे पहावे लागेल. आमदार विरुद्ध नामदार गट मलकापूरमध्ये लढत आहेत.
त्याचबरोबर मनोहर शिंदे विरुद्ध अशोकराव थोरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहताना मतदारांना वस्तुस्थिती पहावे लागणार आहे. केवळ निवडणुकीपुरते होणाऱ्या आरोपांच्या व गैरप्रकारांच्याकडे न पाहता मलकापूरचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता कोणत्या राजकीय पक्षाकडे व स्थानिक राजकीय उमेदवारांच्याकडे आहे. हे पाहून अशा उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. कारण शहराचा सर्वांगीण विकास झाला तर सर्व सुविधा नागरिकांना सहज मिळतील. यासाठी मतदारांनी जागृतपणे मतदान करणे आवश्यक आहे. प्रत्येक राजकीय पक्ष व व्यक्तीकडून मतदारांना फारशा अपेक्षा नसतात. त्यांचा हेतू केवळ गावाच्या विकासाबरोबर त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा असते. आणि याच हेतूने राजकीय पक्ष आपले काम करीत असतात. दरम्यान निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार पारदर्शक असतात असे नाही.समाजहितापेक्षा स्वार्थाला महत्व देणारे काही तथाकथित व्यक्ती राजकारणात शिरकाव करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा महाभागांना मलकापूर नगरपरिषदेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांनीच केला पाहिजे.
मलकापूर नगरपालिका सातारा जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नगरपालिका म्हणून गणली जात आहे. कारण अल्पावधीत मलकापूर नगरपरिषदेने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. काँग्रेस व भाजप सध्या विकासा नारा देऊनच जनतेसमोर येत आहेत. कॉंग्रेसच्या दृष्टीने मलकापुर नगरपालिका स्वतःच्या ताब्यात राहणे गरजेचे आहे. तर भाजपच्या दृष्टीने मलकापूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण या निवडणुकीत प्रचारासाठी मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार अतुल भोसले यांनी यापूर्वीच मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गाठीभेटी सुरू केले आहेत. यामुळे आमदार विरोध नामदार गटांमध्ये अटीतटीची निवडणूक होणार आहे.
गोरख तावरे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा