कराड - पाटणमध्ये संततधार सुरू पावसामुळे पाटण तालुक्यात चार घरांची पडझड


पाटण दि. 16  ( लक्ष्मीपुत्र )  काल रात्रीपासून कराडसह परिसरामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर पाटण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांच्या पडझडीची मालिका अद्यापही सुरूच आहे. तालुक्यातील घाटमाथा, नावडी, येरफळे, शिरळ येथील प्रत्येकी एक अशा चार घरांची पडझड झाली असल्याची माहिती येथील तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

कराडसह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही तर एक सलग संततधार सुरू होती. कराडसह पाटण तालुक्यांमध्ये पाऊस सुरू असल्याने कृष्णा व कोयना नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.पाटण तालुक्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने घरांची पडझड होत आहे. या पावसाळ्यात आत्तापर्यंत तालुक्यात पंधरा घरांची पडझड झाली आहे. तर पूरातून एक म्हैस वाहून गेली आहे. संबंधित नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

धोकादायक इमारती अथवा घरांमध्ये आपला जीव धोक्यात घालून राहू नये असे आवाहन तहसीलदार रामहरी भोसले यांनी केले आहे. याशिवाय सध्या सर्वत्र सुरू असलेला मुसळधार पाऊस व काही ठिकाणी नद्यांसह ओढे, नाले यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत कोयना धरणातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याने याबाबत नदीकाठच्या गावांना व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी आरोग्याची काळजी घेताना पाणी उकळून प्यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिपक साळुंखे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.