दूध आंदोलनाला पाटण तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद
पाटण: राज्यभर सुरू असलेल्या दूध आंदोलनाला पाटण तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महत्वपूर्ण असलेल्या सकस दूध प्रकल्प व पाटण तालुका सहकारी दूध संघाने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता दूध आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. याबाबत सतर्कता म्हणून पाटण पोलिसांनी आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या आहेत. दूध आंदोलनामुळे मात्र तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी पाटण येथील अग्रगण्य असणाऱ्या सकस दूध प्रकल्प व पाटण तालुका सहकारी दूध संघाने आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र मुळातच येथील सामान्य गोरगरीब शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असताना या पुरक दुग्ध व्यवसायावर त्यांचा किमान दैनंदिन उदरनिर्वाह सुरू असायचा. या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध प्रकल्पांनी दूध संकलनच बंद केल्याने त्याचा थेट तोटा हा संबंधित शेतकऱ्यांना बसला आहे. सरासरी पाच ते सात प्रतिलिटर दुधावर संबंधित शेतकऱ्यांचा दैनंदिन व्यवहार अवलंबून असतो. त्यामुळे सकस प्रकल्पाचे सरासरी पंचेचाळीस हजार व पाटण तालुका दुध संघाचे सरासरी पंधरा हजार लिटर अशा एकूण तब्बल साठ हजार लिटर दुधावर या आंदोलनाचा थेट परिणाम होऊन सुमारे दहा हजार शेतकरी व जवळपास पाचशेहून अधिक दुध संकलन केंद्रांचे केवळ एका दिवसात तब्बल अठरा ते वीस लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, दूध आंदोलन पाटण तालुक्यात शांततेत व सनदशीर मार्गाने सुरू असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास हादवे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा