कराड दक्षिण मतदारसंघात राजकीय संघर्ष अटळ आमदारकी मिळवण्यासाठी कराड दक्षिणमध्ये व्यूहरचना सुरू

अमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघामध्ये विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे. पृथ्वीराज चव्हाण गतकाळात यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होते. त्यावेळी त्यांनी विकासकामांसाठी तेराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. भोसले - मोहिते कुटुंबीयांनी सहकार व वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेले काम हे नेत्रदीपक व कौतुकास्पद आहे. कै.जयवंतराव भोसले सहकाराचे शिल्पकार, य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी केलेल्या सार्वजनिक जीवनातील कामांचा डॉ. अतुल भोसले यांना वसा व वारसा आहे.

यशवंतराव मोहिते यांनी दीर्घकाळ राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेले आहे. दक्षिण मतदार संघाचे पहिले आमदार होते. यानंतर माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनी पस्तीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. गत विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवून सध्या पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विलासकाका पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील आमदारकी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तर डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अशी, मला मिळालेला बहुमान समस्त वारकरी संप्रदायाचा आणि कराडवासीयांचा असून, या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार अाहेत. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. यानुसार गत एक वर्षामध्ये डॉ. अतुल भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने अनेक बदल व सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

डॉ. अतुल भोसले हे कराड दक्षिण मतदार संघामध्ये इच्छुक आहेत. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची उमेदवारी कराड दक्षिण मधून भाजपातर्फे जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक रिंगणात असणारच आहेत. दरम्यान पस्तीस वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणारे विलासकाका पाटील उंडाळकर यांचे चिरंजिव उदयदिंह पाटील ही रयत संघटनेच्यावतीने निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. अतुल भोसले हे कृष्णा चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने दररोज अनेक रुग्णांना माफक शुल्क आकारणी करून तर काहींना मोफत आरोग्याची सुविधा देतात. ज्येष्ठ विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते हे डॉ. अतुल भोसले यांचे चुलत आजोबा. छत्तीस वर्षांनंतर भोसले - मोहिते कुटुंबियांना सत्तेमध्ये संधी मिळाली आहे. स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी शिवसेनेतर्फे कराड लोकसभा निवडणूक लढवली होती. डॉ. अतुल भोसले यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि सध्या भारतीय जनता पार्टी असा आहे.

कराड दक्षिण मतदार संघातून भाजपातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात विलासकाका पाटील उंडाळकर, डॉ. अतुल भोसले यांनी निवडणूक लढवली होती. राज्य शासनाच्यावतीने आमदार पृथ्वीराजबाबा आणि डॉ. अतुल भोसले कराड दक्षिणच्या विकासाला निधी घेऊन येत आहेत. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान भारतामध्ये एक नंबरचे करण्यासाठी जो प्रयत्न करावा लागणार आहे. त्याची सुरुवात डॉ. अतुल भोसले यांनी केली आहे. बालाजी व शिर्डी देवस्थान येथील व्यवस्थेबाबतचा अभ्यास करून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सहज सुलभ विठ्ठलाचे दर्शन मिळावे यासाठी नियोजन केले जात आहे. कराड दक्षिण मतदार संघामध्ये राजकीय संघर्ष मोठय़ा प्रमाणात झाला आहे. हा राजकीय संघर्ष आजही कायम आहे. गटातटात विभागलेल्या राजकीय लोकांचे काहींचे मनसुबे पूर्ण झाले. तर काहींचे मनसुबे अपूर्ण आहेत, ते पूर्ण करण्यासाठी राजकीय संघर्ष केला जात आहे.

उदयसिंह पाटील यांची राजकीय वाटचाली खडतर आहे. गतकाळातील पस्तीस वर्षांमध्ये माजी आमदार विलासकाका पाटील यांनी उदयसिह पाटील यांचे राजकिय पुनर्वसन करणे आवश्यक होते मात्र, हे राजकीय पुनर्वसन झाले नाही. दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये उदयसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप होता. या प्रकरणातून उदयसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तर अलीकडच्या काळामध्ये डॉ. अतुल भोसले यांचे संत साहित्याचे वाचन सुरू असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी डॉ. अतुल भोसले प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. हे ते करीत असलेल्या कामावरून दिसून येत आहे. सहकार, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉ. अतुल भोसले सध्या संत मार्गावरून वाटचाल करीत आहेत. संत वाङ्ममय, संत परंपरा, संत साहित्य, संस्कृती, संवर्धनासाठी संत विद्यापीठाची निर्मिती करण्यासाठी अभ्यास गटाची निर्मिती शासनाने केली आहे. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, पारदर्शक कारभार करणारे नेतृत्व म्हणून संपूर्ण देशात ते परिचित आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयाचे आजही कराड मतदारसंघांमध्ये कौतुक केले जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण, डॉ. अतुल भोसले, उदयसिंह पाटील यांच्यामध्ये कराड दक्षिणमध्ये राजकीय संघर्ष होणार हे स्पष्ट आहे. प्रत्येकाचा लेखाजोखा जनतेसमोर यानिमित्ताने येणार आहे. डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यामुळे कराड दक्षिण मतदार संघामध्ये या संधीचा विविध प्रकारे राजकीय अर्थ काढला जात आहे. सर्वच राजकीय व्यक्तीनी निवडणुकीपुरता राजकारणाचा विचार करावा इतर वेळी विकासात्मक कामांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. असेही डॉ. अतुल भोसले स्पष्टपणे आपला विचार व्यक्त करतात. पृथ्वीराज चव्हाण हे माजी तर आहेतच, भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सध्या काँग्रेस पक्ष व त्यांचे मित्रपक्ष पाहताहेत. प्रारंभी कराड दक्षिणमधला आमदारकीचा संघर्ष करून पुढील वाटचाल सर्वांनाच करावी लागणार आहे. कारण अतुल भोसले यांनाही भावी आमदार म्हणून सध्या संबोधले जात आहे. उदयसिंह पाटील यांच्या रूपाने पुन्हा माजी आमदार विलासकाका पाटील यांची आमदारकी प्रस्थापित करावी, असा त्यांच्या गटाचा प्रयत्न सुरू आहे.

विधानसभा निवडणुका दीड वर्षांवर आहेत मात्र, कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये राजकीय हालचाली जोरदारपणे सुरू झालेल्या आहेत. विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण दक्षिणचे व आमदार बाळासाहेब पाटील उत्तरचे यांचा जनसंपर्क मोठा आहे. याचा विचार करून त्यांचे विरोधक राजकीय व्यूहरचना करीत आहेत. गतकाळात अतुल भोसले यांनी ज्यावेळेपासून सहकार, राजकीय, वैद्यकीय आणि संत परंपरेत कामास सुरुवात केली जेव्हापासून त्यांचा प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे. कराड उत्तरपेक्षा कराड दक्षिणमध्ये राजकीय संघर्ष मोठय़ा प्रमाणात होणार याचे संकेत सध्या मिळत आहेत. 

गोरख तावरे, कराड
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.