शिक्षणाचे चांगभलं. ... हस्तक्षप थांबवा. . .अपघाती मृत्यू

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाले आहे. हे आता थांबवता येणार नाही, कारण शिक्षणाचे खासगीकरण केल्यानंतर त्याचा बाजारच होणार. शिक्षणामुळे समाज सुसंस्कारित होतो, अनेक पिढ्या सुसंस्कारित होतात, हा खरा शिक्षणाचा मूळ हेतू आहे. पण सध्या हा हेतू लांब राहिला आहे. वारेमाप पैसा मिळवण्यासाठी अनेकांनी शिक्षण संस्थांचा बाजार मांडला आहे. शिक्षण क्षेत्राच्या बाजारीकरणामुळे आजच्या युवकांना चांगले शिक्षण मिळत नाही. ही खंतही अनेक वेळेला शिक्षण तज्ज्ञ व्यक्त करताहेत. नर्सरीपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत खाजगीकरण झाले आहे. नाक्यानाक्यावर व चौकाचौकात जशा पानपट्ट्या थाटल्या जातात, त्यापद्धतीने शिक्षण संस्थांनी आपला बाजार मांडला आहे. खाजगी शिक्षण संस्था अनेक शिक्षकांना नियमानुसार मानधन व पगार देत नाहीत अशा हजारो तक्रारी राज्यभरामध्ये आहेत. कर्जवसुली केल्याप्रमाणे शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून फी वसुली करीत असतात. यामुळे शिक्षणाचा मूळ हेतूच व आत्मा हरवला आहे. दरम्यान लहान मुलांच्या स्कूल बसबाबत तर भीषण परिस्थिती आहे. खुराडात कोंबड्या भारतात अथवा गाडीत मेंढरं भरतात त्याप्रमाणे लहान मुलं स्कूल बसमध्ये कोंबली व भरली जातात हे वेदनादायक आहे. लहान व शाळकरी मुलांच्या निष्पाप जीवांचा जरासाही विचार कोणी करीत नाही असे निदर्शनास येत आहे म्हणूनच शाळकरी मुलांच्या वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्कुलबस विनियम 2011 मधील तरतुदींचे अत्यंत काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. स्कूल बस चालकांना एका दोरीत आणणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधित दोष स्कुलबर कॉन्ट्रॅक्टर, स्कुलबस ऑपरेटर्स यांच्यावर  वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येईल. असा इशारा उपप्रादेशिक परिवहन वाभागाने दिला आहे. याचाच अर्थ स्कूल बस चालक अथवा शिक्षण संस्था लहान मुलांच्या जीवांची काळजी करीत नाहीत हे स्पष्ट होत आहे. गल्लाभरू मानसिकता असल्यामुळे इतरांची काळजी केली जात नाही. असे खेदाने म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर अनेकांनी शिक्षण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि शिक्षण सर्वांना समान पातळीवर मिळाले पाहिजे, यासाठी आटोकाट प्रयत्न केला. या समाजहित रक्षकांचे, समाज प्रबोधनकारांचे अथवा समाजासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारांची कदर आजकाल शिक्षण संस्थां ठेवत नाहीत. शिक्षण संस्थांच्या बाजारीपणामुळे आणि माया गोळा करायच्या मानसिकतेमुळे शिक्षणाचे वाटोळे झाले आहे. शिक्षण क्षेत्रात महनीय व्यक्तीने केलेले काम अधोरेखित करण्याऐवजी आपल्या बापजाद्यांचा शिक्षण सम्राट म्हणून गौरव करण्यात धन्यता मानली जाते. केंद्रात व राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार आले तरी शिक्षणाबाबत सुधारणा फारशा होत नाहीत हे खेदाने लागेल. शेवटी शिक्षणाच्या नावाने चांगभलं म्हणत गप्प बसलेले बरे अशी मानसिकता समाजाची झाली आहे.

 हस्तक्षप थांबवा

जंगल, झाडेझुडपे, डोंगर हे प्राण्यांचे सुरक्षित ठिकाण आहे. दरम्यान मानवाला आहे ती जागा अपुरी पडू लागल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागले, यामुळे झाडे झुडपे कमी झाले, जंगल कमी होऊ लागले आणि प्राण्यांचा निवारा हरवू लागला. प्राण्यांच्या वस्तीमध्ये मनुष्यप्राण्याने हस्तक्षप केला. मग मात्र जंगलातील प्राण्यांनी मनुष्य वस्तीमध्ये प्रवेश करण्याला सुरुवात केली. मनुष्यप्राणी व जंगलातील प्राण्यांमध्ये संघर्ष होऊ लागला, हा संघर्ष जीवघेणा आहे. कधी प्राणी मनुष्याला मारू लागला, तर कधी कधी मनुष्य प्राण्याला ठार मारू लागले. वाघ, बिबट्या हे हिंस्त्र प्राणी सर्रास शहरांमध्ये दिसू लागले. त्यांचा वावर शहरांमध्ये वाढला, त्यांचे आगमन शहरांमध्ये झाले आणि मनुष्य प्राणी भयभीत झाला. त्याला कळेनासे झाले की, जंगलातील प्राणी शहरात का येताहेत. मात्र त्यांचे जंगल कमी केल्याने आता जंगलातील प्राणी शहरात येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे मनुष्य प्राणी व जंगलातील प्राणी हे एकमेकांना चांगलेच घाबरतात घेतात हे नाकारता येणार नाही. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण हे डोंगराळ व दुर्गम भाग असणारे तालुके आहेत. या ठिकाणी अनेक प्राण्यांचे दर्शन होत असते. मात्र या तालुक्यांव्यतिरिक्त सातारा, कराड सारख्या शहरांमध्येही आता वाघ - बिबट्या दिसू लागले आहेत. आणि हे वाघ - बिबट्या मनुष्य प्राण्यांवर हल्ले करतात. म्हैस, गाय, शेळी यांचेवर तर ते हल्ले करतात. मात्र भुकेसाठी मनुष्यावर हल्ला करून जखमी करतात. बेसुमार होणारी वृक्षतोड, त्याचबरोबर डोंगरांना लावली जाणारी आग, वणव्यांमुळे जंगलातील प्राणी भयभीत होतात. त्यांचा निवारा हिसकावून घेतला जातो आणि मग हे जंगलस्थित असणारे प्राणी शहराच्या दिशेने येतात. यामुळे नवीन समस्या, प्रश्न निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. यासाठी काम करणाऱ्या यंत्रणेने प्रथमता ही समस्या का निर्माण होते. याची कारणे शोधून त्यांच्यावर उपाय शोधले पाहिजेत. आगीने घाबरलेले, भेदरलेले वाघ - बिबट्या डोंगर उतरून रस्त्यावर येतात. जंगल हे बिबट्या, रानडुकरे आणि अन्य प्राण्यांचे हक्काचे-सुरक्षित आश्रयस्थान आहे. पूर्वी जंगले घनदाट असल्याने वाघ, बिबट्यांचे अन्न असलेली हरणे आणि अन्य प्राणीही विपुल प्रमाणात होते. याचा विचार करून उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. मनुष्याने इतर जीवांच्या, प्राण्यांच्या विश्वात हस्तक्षेप थांबवला पाहिजे.

अपघाती मृत्यू

प्रत्येकाच्या जन्माबरोबर मृत्यू हा ठरलेला आहे. पण येणारा मृत्यू कुठे ? कधी ? कसा ? येईल हे मात्र सांगता येत नाही.
बंगळुरू-कोल्हापूर-पुणे या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे                चौपदरीकरण झाले आहे. सातत्याने वाहनांच्या अपघातांची संख्या  वाढत असल्याने हा महामार्ग मृत्यूचा झाला आहे. मरण हे नैसर्गिकपणे येतो, अपघातांमध्ये येतो अथवा आजारामुळे येतो. खंबाटकी घाटाचा बोगदा ओलांडल्यावर मृत्यूचा सापळा ठरलेल्या नागमोडी-एस वळण हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. सुखाचा प्रवास करताना येणारा मृत्यू हा दुर्दैवीच म्हणावा लागेल. राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघातांच्या कारणांची चर्चा सुरू होत असते. राष्ट्रीय महामार्गावरून येणारी - जाणारी वाहने हे विविध कारणाने ये जा करीत असतात. दुचाकी, चारचाकी ते बारा, चौदा, सोहळा चाकी अशा अवजड वाहनांपर्यंत या महामार्गावर वाहतूक सुरू असते. दोन वाहनांचा अपघात झाला की अक्षरश: चक्काचूर होतो. काही क्षणातच मृत्यू अनेकांवर घाला घातलो. काहीजण जिव वाचवायसाठी टाहो फोडतात. पण यांच्या आयुष्याची दोरी तुटणार असते. ती काही केल्या थांबत नाही, आणि मृत्यू अपघातातील व्यक्तींना कवटाळतो. ज्या वाहनांचा अपघात होतो ते वाहन किती सुस्थितीत आहे, हे पाहिले जात नाही, येणारा दुर्दैवी मृत्यूला घेऊनच येतो. काही जण जागीच गतप्राण होतात तर काहींना उपचार सुरू असताना यमसदनी जावे लागते म्हणजे अपघातांमध्ये मृत्यू येतोच. अपघातांमध्ये मृत्यू चुकतो त्यांना आयुष्यभराचे अपंगत्व येते. कितीही चांगले ड्रायव्हिंग असले, वाहन व्यवस्थित चालवत असाल परंतु पुढचाच बेसावधपणे अंगावर आला तर कोणी काहीही करू शकत नाही. अलीकडच्या काळामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण झाले, चौपदरीकरण झाले, मात्र अपघातांचे प्रमाण काही कमी झाले नाही. केवळ खाच खळग्यांच्या रस्त्यावरच अपघात होतात असे नाही, तर चकाचक चौपदरीकरणाच्या महामार्गावरही अपघात होतात. महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस वाहनधारकांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करीत असतात. वाहनधारकांना सावध करीत असतात मात्र यांचा मृत्यू येणार आहे तो मात्र कोणालाही चुकवता येत नाही. अथवा केलेल्या उपाययोजनांमुळे मृत्यू चुकत नाही. ज्यांच्या नसीबामध्ये अपघातात मृत्यू ठरला आहे तो बिनदिक्कतपणे अनेकांच्या नशिबात येतो. मग प्राप्त परिस्थितीला अथवा रस्ते, वाहन यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही.

                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.