भाजपचाच मुख्यमंत्री होणार कसा ? कोण आमरपट्टा घालून आलाय ? काळ कोणाला माफ करीत नाही


नम्रता व सौजन्यशीलतेने जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट साध्य करता येते, हे आतापर्यंतच्या तत्त्वज्ञानाने स्पष्ट केले आहे. मात्र सत्तास्थानाचा अमरपट्टा माझ्याकडे आहे. असा अहंभाव भाजपच्या मनामध्ये निर्माण होणे ही धोक्याची घंटा आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरामध्ये अनेक राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली. देशाच्या व राज्याच्या प्रमुख स्थानावर विविध पक्षांच्या राजकीय लोकांनी काम केले मात्र सत्तेचा अहंभाव व सत्तेच्या मस्तीत कोणताही राजकीय पक्ष यापूर्वी राहिला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपाला केंद्रात व देशातील अनेक राज्यात सत्ता दिली मात्र सत्तेचा अहंभाव, सत्तेच्या मस्तीत राहायचे हा एक नवीन पायंडा भाजपाने देशासमोर ठेवले आहे असे दिसून येत आहे.

कोणत्याही क्षेत्रात कोणाचाही अहंभाव फारकाळ चालत नाही, मस्ती फार काळ राहत नाही, सौजन्य व संयम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो बहुधा भाजप विसरला कि काय ? भाजपाचा देशातील सर्वात प्रथम मित्रपक्ष कोण असेल ? तर तो शिवसेना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान मुद्द्यावर भाजपाशी मैत्री केली आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मैत्रीसाठी शिवसेना नेहमीच प्रामाणिक राहिली आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजप मित्रासारखा वागत नाही, हे स्पष्ट झाले आहे. सत्ता सदासर्वकाळ कोणत्याही एका पक्षाकडे दीर्घकाळ राहू शकत नाही, हे सत्य भाजप विसरला आहे. म्हणूनच बहुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणी अामरपट्टा घालून आलेला नाही. प्रत्येक राजकीय पक्षाला सत्ता हवी असते आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची प्रत्येक पक्षाची तयारी असते मात्र आपल्या मित्रपक्षाला सोबत घेऊन वास्तविक फार दुजाभाव केला जात नाही.

मित्रपक्षांबरोबर थोडे डावे - उजवे केले जाते मात्र पूर्णपणे "हम करे सो कायदा" असे होत नाही. सत्तेची मस्ती केली की ती उतरण्याची ताकद जनतेमध्ये आहे आणि जनता योग्यवेळी प्रत्येकाला जागा दाखवत असते, ज्यांना ज्याठिकाणी जागा हवी ती त्यांना सत्तास्थानी बसविते. सत्तास्थान देऊन अहंभाव बाळगला, अामरपट्ट्यासारखी वागू लागले, आणि आम्ही म्हणतो तेच खरे ! हे कोणीही खपहून घेत नाही. केंद्रात व राज्यात सलग भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे वास्तविक भाजप "गांधारी" झाली आहे. "अामरपट्टा" हा बहुदा राजकारणातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये लागु होतो. कोणीही आमरपट्टा घेऊन आला नाही. हे सत्य आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्चपदावर गेल्यावर त्याला ते पद केंव्हांना केंव्हा सोडावे लागते.

मीच मुख्यमंत्री होणार ! भाजपचाच मुख्यमंत्री असणार हे बोलायला हरकत नाही. मात्र हे बोलण्यापूर्वी मित्रपक्षांशी काही वाटाघाटी झाल्या आहेत, काही चर्चा झाली आहे, याबाबत तारतम्य बाळगून बोलायला हवे. मुख्यमंत्री कोणालाही, केव्हाही होता येते, त्याच्या ते ललाटी असावे लागते. उगाच बहुमत आहे. लोकशाही संकेतानुसार सर्वाधिक संख्या आहे, म्हणून बेभान बोलून चालत नाही. या बेभाण बोलण्याला वेसण घालण्याची ताकद लोकशाहीने बेभान बोलणाऱ्यांच्या संख्येपेक्षा इतर एकत्रित संख्येला दिली आहे, याचे भान कसे विसरून चालेल. म्हणूनच "सौ सोनार की एक लोहार की" प्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गरजले "कुणी मुख्यमंत्रीपदाचा आमरपट्टा घालून आलेला नाही" शहाण्यांना एवढा इशारा काफी है। मित्रपक्षांची म्हणजेच शिवसेनेची वारंवार केली जाणारी हेटाळणी भविष्यकाळात केंव्हाना केंव्हा भाजपला भोगावी लागेल हे मात्र निश्चित. कारण काळ कोणाला माफ करीत नाही.

गोरख तावरे, कराड
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.