कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड


कला अकादमीवर कराडच्या मंगला बनसोडे यांची निवड
कराड दि22 (सावा) तमाशाच्या लोककलेला आपल्या सर्व कुटुंबानेच वाहून घेतले आहे. गेली ५५ वर्षे आपण या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील झाडाखालच्या तमाशापासून ते नाट्यगृहातील तमाशापर्यंत तमाशा मंडळे व त्यामधील कलाकारांना कोणत्या अडी-अडचणी येत असतात. त्यांच्या समस्या काय आहेत, याची आपणास माहिती आहे. या समस्या सोडविण्याला व तमाशा कलावंतांना मान-सन्मान प्राप्त करून देण्याला आपण समितीच्या माध्यमातून प्राधान्य देणार आहे. राज्यभरातील तमाशा कलावंत व शासन यांच्यामधील दुवा म्हणून आपण समितीमध्ये काम करणार आहे. त्यामुळे खर्‍या-खुर्‍या तमाशा कलावंतांना आपण न्याय मिळवून देऊ, असे मंगला बनसोडे-करवडीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आपल्या स्वत:च्या तमाशाव्दारे यावर्षीपासून 'लेक वाचवा' या विषयावर वगनाट्य सादर करून आपण राज्यभरात लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नितीन बनसोडे व अनिल बनसोडे-करवडीकर उपस्थित होते.राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सल्लागार सदस्यपदी प्रसिध्द तमाशा कलावंत तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र शासनाकडून बनसोडे यांना मिळाले आहे.

मंगला बनसोडे-करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या मालकीण तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांना आजवर विविध संस्था व शासनाकडून कला व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून लोकनाट्य तमाशाच्या क्षेत्रात गेली ५५ वर्षे मंगला बनसोडे कार्यरत आहेत. लोककला तमाशाच्या क्षेत्रात त्यांनी आजवर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे तमाशा क्षेत्रातील कलाकारांना न्याय मिळवून देता यावा, त्यांचे प्रश्न सोडविता यावेत, यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्यांची पु. ल. देशपांडे कला अकादमीवर सदस्य म्हणून निवड केली आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये ११ जणांचा समावेश आहे.

कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे समितीचे सचिव आहेत. तीन वर्ष कालावधीसाठी या समितीची निवड शासनाकडून करण्यात आली आहे. मंगला बनसोडे यांच्या माध्यमातून प्रथमच या समितीवर एका तमाशा कलावंताला काम करण्याची संधी मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.