दुसरा राहुल नको

नोटाबंदी व जीएसटीमुळे छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. बरेच व्यवसाय बंद पडले आहेत तर अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांना नैराशाचे गर्तेने व्यापले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी व जीएसटीचा घेतलेला निर्णय हा विकासाभिमुख नाही. याचे ज्वलंत उदाहरण कराड तालुक्यात घडले आहे. कराडच्या मुख्य बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय करणारा राहुल फाळके याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी, सोन्या चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी फेसबुक अकाऊंटवर जे, मनोगत व्यक्त केले आहे. ते विदारक व भीषण आहे. 

सोने चांदीचा व्यवसाय हा काही प्रमाणात रोख तर काही प्रमाणात उधारीवर चालतो, अनेक लोकांना राहुल फाळके यांनी विविध प्रकारची मदत केली असल्याचे त्यांनी मनोगतात म्हटले आहे. दरम्यान राहुल फाळके यांचा आक्षेप कोणाही मित्र अथवा उधारी धारकांच्यावर नाही. हे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने प्रथमता नोटाबंदी केली आणि त्यानंतर जीएसटी लागू केल्यानंतर राहुल फाळके यांचा व्यवसाय चालेनासा झाला, सोन्या चांदीला ग्राहक मिळेना आणि उधारी होती ती वसूल होत नव्हती, यामुळे राहुल निराशेच्या गर्तेत गेला होता. कष्ट करून प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न राहुल फाळके करीत होता. 

दरम्यान केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याला अकाली जीवनयात्रा संपवावी लागली, हे दुःखदायक आहे. राहुल फाळकेचा शेवटच्या क्षणाचा आक्रोश अथवा मनोगत केंद्र सरकारपर्यंत पोहचेल की नाही ? माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका छोटे व्यावसायिकांचा जीवन संपवण्याचा प्रकार वेदनाकारक वाटेल ते नाही ? माहित नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर विचाराचा निस्सीम भक्त राहुल फाळके होता. याचाच अर्थ गत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप अथवा नरेंद्र मोदींच्या विचाराला पाठबळ नक्कीच राहुल फाळके यांनी दिले असणार ! कारण शिवसेना लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाबरोबर होती. दरम्यान सत्तांतरानंतर भारतीय जनता पार्टी पूर्वीसारखी राहिली नाही, सत्तेची नशा भाजपच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी, मंत्रीमहोदयांच्या डोक्यात शिरली आहे. 

सत्तेच्या नशेत वावरणाऱया भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राहुल फाळके यांच्या मृत्यूची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतात, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये व्यवसायाच्या नैराश्यातून एका व्यापाऱयाने आत्महत्या केल्यामुळे, नोटाबंदी व जीएसटीमुळे छोट्या - छोट्या व्यावसायिकांना काय यातना होताहेत, हे या भीषण घटनेतून स्पष्ट होत आहे. शेवटी काय ? तर राहुल फाळके यांचे बलिदान व्यर्थ न हो ! असेच म्हणावे लागेल.  भारतीय जनता पार्टीने व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्या राहुलची वाट पाहू नये. एवढीच इच्छा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.