राजभवन गंगटोक येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीला त्यांचे १०५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - माझ्या बालपणी ज्यांची माया मला लाभली व त्यांचेच प्रोत्साहनाने मला पुण्या-मुंबईत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत मी १९६५ साली कोल्हापूर येथे सेवारत झालो आणि पुढे १९७९ पासून भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्र भर वेगवेळ्या पदावर जून १९९९ पर्यंत मी सेवा बजावली. १९९९ साली भारतीय प्रशासकीय सेवेतून मी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली व पुढे १९९९ आणि २००४ साली दोनवेळा कराड लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून देश पातळीवर प्रतिनिधित्व केले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी पंडित नेहरूंच्या हाकेला प्रतिसाद देऊन भारताचे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी १९६२ साली स्वीकारली. पुढे त्यांना भारताच्या गृहमंत्री पदाची धुरा पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे आग्रहावरून, आवाहन म्हणून स्वीकारावी लागली. सिक्किमच्या जनतेने १४ एप्रिल १९७५ रोजी सिक्किममध्ये झालेल्या सार्वमताचे ( Referendum ) आधारावर सिक्किमला भारतामध्ये सामील करून घेण्याची विनंती पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना केली. ती विनंती प्रस्तावाचे स्वरुपात गृहमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी लोकसभेच्या पटलावर २६ एप्रिल १९७५ रोजी मांडली. त्या दिवशी उपस्थित असलेल्या सभासदांनी दोनतृतियांश बहुमताने तो ठराव पारित केला आणि त्याचमुळे सिक्किमचा समावेश भारतीय प्रजासत्ताकातील २२ वे राज्य म्हणून ३६ व्या राज्यघटना दुरुस्तीनंतर १६ मे १९७५ पासून झाला आणि त्यामुळे सिक्किम राज्यात राजेशाही संपून लोकशाही राज्यनिर्मीती झाली आणि राज्यपाल पदाची सुरुवात झाली.
कृष्णाकाठी जन्मलेल्या “यशवंतांचे” आशीर्वादाने त्यांचेच जन्मभूमी-कर्मभूमीतला मी हिमालयाच्या कुशीतील उत्तर-पूर्वेच्या तिस्ता-रंगीन नद्यांच्याकाठी बहरलेल्या हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेल्या, प्रदूषणविरहित भारतातील पहिले संपूर्ण जैविक शेती करणारे राज्य म्हणून गौरविले गेलेल्या शांतताप्रिय सिक्किम राज्याचा पंधरावा राज्यपाल म्हणून २० जुलै २०१३ पासून सेवारत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचे मार्गदर्शनाने लाभलेल्या शिकवणुकीचे आजपर्यंत पालन मी केले व यापुढेही करीत राहीन.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीला त्यांचे १०५ व्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा