वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत लवकरच तोडगा काढणार - नाम. चंद्रकांतदादा पाटील मुंबईत डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली भेट


कराड,(लक्ष्मीपुत्र) -  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस आणि श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली उंडाळे विभागातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन, वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल माफ करून ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी केली. यावेळी वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत लवकरच तोडगा काढणार असल्याची ग्वाही, मंत्री पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.

भाजपाचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या शिष्टमंडळात बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, संजय शेवाळे, सर्जेराव थोरात, हंबीरराव पाटील, शिवाजी चिबडे, संपतराव पाटील यांच्यासह उंडाळे विभागातील शेतकर्‍यांचा सहभाग होता.

महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर मांडणी केली. कराड दक्षिण मतदारसंघातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने सध्या ही योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. शिवाय वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकर्‍यांना ही रक्कम भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेचे थकीत वीज बिल शासनाच्या 81-19 च्या सुत्रानुसार माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कराड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून पुढे जाणार्‍या बैलबाजार ते नांदलापूर रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे आणि ढेबेवाडी फाटा ते बैलबाजार रोड या मार्गावरील रस्त्याचेही प्रलंबित काम मार्गी लागावे, यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी करावी. याचबरोबर कासारशिरंबे (यादव मेळा) ते कासेगाव रस्त्याच्या ओढ्यावर साकव पूलाची उभारणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. या मागण्यांची दखल घेत नामदार पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना थेट सूचना करत, वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत स्वत: विशेष लक्ष घालून लवकरच तोडगा काढणार असल्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.