अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची का कमी केली ? पृथ्वीराज चव्हाण, यांचा सवाल
कराड (लक्ष्मीपुत्र) - अरबी समुद्रातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची का कमी केली? असा सवाल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत शासनाकडून सातत्याने जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते भूमिपूजनाचा देखावा केला पण अजूनपर्यंत काम सुरु झालेले नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे बदलण्यात आलेला प्रकल्प आराखडा असेही प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची १९२ मीटर वरून वाढवून २१० मीटर इतकी करण्यात आली आणि हे जगातील सर्वात उंच स्मारक ठरेल अशी जाहिरातदेखील विद्यमान सरकारने केली. परंतु दोन्ही प्रकल्प आराखड्यातील तरतुदींमध्ये बारकाईने पहिले असता स्मारकाची उंची वाढवण्याच्या नावाखाली शासनाने प्रत्यक्षात महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली आहे तर पुतळ्याखालील चौथऱ्याची उंची वाढवली आहे.
२३ फेब्रुवारी २०१५ रोजी केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने मूळ प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली. त्यामधील तरतुदींनुसार पुतळ्याची उंची १६० मीटर तर त्याखाली असलेल्या चौथऱ्याची उंची ३२ मीटर अशी एकूण स्मारकाची उंची १९२ मीटर प्रस्तावित करण्यात आली होती. २३ डिसेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने वरील प्रस्तावात सुधारणा केल्या. त्यानुसार पुतळ्याची उंची १६० मीटर ऐवजी १२६ मीटर आणि चौथऱ्याची उंची ३२ मीटर ऐवजी ८४ मीटर केली. म्हणजेच महाराजांच्या धातूच्या पुतळ्याची उंची ३४ मीटरने (११२ फुटांनी) कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
यासंदर्भात काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे, प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरदेखील महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा प्रस्ताव का पाठवण्यात आला ? सुधारित प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण खात्याची ‘पर्यावरणीय मान्यता’ अजूनपर्यंत मिळाली नाही हे खरे आहे का ? राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला असल्याने महाराजांच्या ब्राँझच्या पुतळ्यावरील खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता का? गुजरात राज्यात प्रस्तावित सरदार पटेलांच्या “स्टॅच्यु ऑफ युनिटी” मध्ये पुतळ्याची उंची १५७ मीटर आहे तर शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वात उंच कसा होईल?
महाराजांचे स्मारक असो की महाराजांच्या नावे राबविलेली कृषी कर्जमाफी योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून अभिनिवेशी राजकारण करणे आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेला भुलवत ठेवणे हेच सत्ताधारी पक्षाचे धोरण आहे. असा आरोपही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा