पांढरेपाणी गाव सुविधांपासून वंचित . . . पांढरेपाणी गावाला काळ्यापाण्याची शिक्षा
पुरोगामी महाराष्ट्रमध्ये अनेक खेडेगावांचा समावेश होतो. त्याचबरोबर अनेक तालुके हे दुर्गम डोंगराळ व दुष्काळग्रस्त आहेत. त्याचबरोबर अनेक गावांची नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही वेळेला गावांच्या नावाने हास्यविनोद होतो तर काही गावांची नावे घेताना लज्जा निर्माण होते. वास्तविक पाहता याठिकाणी गावांचा नावांचा उल्लेख करणे फार महत्त्वाचे नाही. महाराष्ट्राच्या इतिहास पाहत असताना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका गावाचा उल्लेख करून त्याबाबत लिहिणे अपेक्षित आहे. पाटण तालुका डोंगराळ, दुर्गम म्हणून परिचित आहे. पाटण तालुक्याच्या विकासासाठी विद्यमान आमदार शंभूराज देसाई सातत्याने प्रयत्न करीत असतात. त्याचबरोबर गतकाळामध्ये पाटण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आदरणीय विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणच्या विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. वास्तविक पाहता आदरणीय विक्रमसिंह पाटणकर सध्या राजकारणापासून चार हात लांब राहिले आहेत. राजकारणाचा संन्यास घेतला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कारण आदरणीय विक्रमसिंह पाटणकर यांचा नुकताच अमृतमहोत्सवी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दीनिमित्त पाटणमध्ये "महाराष्ट्र दौलत" नामक मोठे स्मृतिस्थळ उभे राहिले आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री महोदयांच्या उपस्थित झालेले आहे. वास्तविक मुख्य मुद्दा बाजूला राहिला असे वाटते, जे सांगायचे आहे ते, पाटण तालुक्यातील एका गावाचे नावावरून नुकतेच आदरणीय विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी केलेली टिप्पणी यावरून सदर गावाच्या अनुषंगाने कुतूहल निर्माण होणे स्वाभाविकच आहे. दरम्यान पाटण तालुक्याच्या राजकारणाचा मागोवा घेऊन पुढे जाणे इष्ट ठरेल, म्हणून थोडक्यात हा पाटण तालुक्यातील राजकारणात परामर्श घेतला आहे. पांढरेपाणी नावाचे पाटण तालुक्यातील दुर्गम गाव आहे. या ठिकाणी अनेक सोयी - सुविधा अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत. पाटण तालुक्याच्या राजकारणामध्ये या गावाच्या अनुषंगाने आरोप-प्रत्यारोप होत असले तरी, पर्यटन स्थळ म्हणून याठिकाणी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यातील अनेकांनी भेटी दिल्या आहेत. या परिसरातील निसर्गाचा स्वच्छंदी आनंद लुटला आहे. पर्यटकांनी येथील सुविधांपेक्षा निसर्गसौंदर्याने नटलेले पांढरेपाणी गावाचा घेतलेला आनंद महत्त्वाचा वाटतो.
वास्तविक पाहता पांढरेपाणी गावाचा विकास झाला पाहिजे, निसर्गसौंदर्याने नटलेले म्हणून त्याचा विकास झाला नाही पाहिजे, ही भूमिका नाही, तर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे, गावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी - सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत आणि त्या लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांची जबाबदारी आहे, हे नाकारून चालणार नाही, पांढरेपाण्याला काळ्यापाण्याची शिक्षा असे वाक्य वाचल्यामुळे पांढरेपाणी गावाच्या अनुषंगाने मनामध्ये कुतूहल निर्माण होणे स्वाभाविक आहे. पांढरेपाणी म्हणजे काय ? असा काही जणांना प्रश्न पडेल, म्हणून पांढरेपाणी हे एका गावाचे नाव आहे. आणि या अनुषंगाने सत्यजितसिंह पाटणकर यांनी पांढऱ्यापाणी गावाला काळ्यापाण्याची शिक्षा असे विधान केल्यामुळे कुतूहल निर्माण झाले. सेक्सपिअर याने म्हटले आहे, नावात काय आहे ? वास्तविक पाहता नावातच सर्व काही आहे ! कारण पांढरेपाणी गावाचे नाव ऐकताच सदरचे गाव सुजलाम - सुफलाम असेल असे निश्चितच वाटते. दरम्यान पांढरेपाणी हे अतिदुर्गम भागात असणारे छोटेसे गाव आहे. या ठिकाणी जाताना साधा रस्ताही नाही याचा विचार झाला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर अद्याप काही गावांना रस्ता नसेल तर मग काय करायचे ? हा खरा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी काम करीत नाहीत असे नाही.
दरम्यान काही वेळेला काही गावांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, बहुधा पांढरेपाणी या गावाकडे स्वातंत्र्यापासून सर्वांचे दुर्लक्ष झाले की काय ? हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच सत्यजितसिंह पाटणकर यांनी म्हटले आहे, पांढरेपाणी गावाला काळ्या पाण्याची शिक्षा कायमच मिळाली ! पांढरेपाणी गावच्या लोकांनी परिवर्तन परिवर्तनामध्ये सहभाग घेतला आहे असेही सत्यजित पाटणकर यांनी म्हटलेले आहे. वास्तविक पाहता काही गटातटाचे राजकारण पाहता पांढरेपाणी गावातील काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले असतील, परंतु आमदार शंभूराजे देसाई यांना मानणारे अनेक जागृत नागरिक पांढरेपाणी गावात आहेत, हेही नाकारून चालणार नाही. पांढरे पाणी गावाला स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत आरोग्य, रस्ते या मुलभूत सुविधां नाहीत. पांढरेपाणी गावातील नागरिक प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. पाटण तालुक्यातील एका डोंगराळ, दुर्गम भागात असलेल्या पांढरेपाणी गावासाठी पाटण तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक राजकारण करून पांढरेपाणी गावाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आणि पांढरेपाणी नावाप्रमाणेच पांढरेपाणी गावातील माणसांची मने हे पांढरेशुभ्र व निसर्गाने नटलेल्या आनंददायक, उत्साहवर्धक, नैसर्गिक देणगी प्रमाणे सुज्ञ नागरिक आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा