लोकसभा - विधानसभा एकत्र होणार ? यूती का आघाडीचे सरकार येणार ?
आगामी लोकसभा - विधानसभेचे रणसिंग वाजू लागले आहे. वास्तविक पाहता पहिल्यांदा लोकसभा निवडणुका होतील ! त्यानंतर विधानसभांच्या निवडणुका होतील ! असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा व विधानसभा एकत्रित होतील असा अंदाज व्यक्त केल्यामुळे निवडणुका नक्की
कशा होणार ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूका एकत्र व्हाव्यात अशी बहुदा कॉंग्रेसची इच्छा आहे. दरम्यान सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट झालेली नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपले वेगवेगळे भाकित करीत असल्यामुळे नक्की निवडणुका कंधी होणार ? हा प्रश्न मतदारांना पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी मतमतांतरे व्यक्त केल्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा व विधानसभा एकत्रित निवडणुका होणार की वेगवेगळ्या ! याबाबत अद्याप निवडणूक आयोगाने कोणतेही स्पष्टता स्पष्ट केलेली नाही.यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या जातील, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेला आहे. वास्तविक पाहता अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनाही राजकारणाची चांगली जाण आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचे म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे अशोक चव्हाण यांनी वर्तवलेल्या अंदाजातून लोकसभा - विधानसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे तर्क व्यक्त लढवले जात आहेत. दरम्यान अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केलेल्या अंदाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त करताना अशोकरावांना भविष्य वर्तवण्याची सवय जडली आहे. त्यांच्याकडे सध्या पक्षाचे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे ते अशी विधाने करत सुटले आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक पाहता अशोकराव चव्हाण सध्या विरोधी बाकावरील नेते आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या प्रत्येक कृतीवर आपले मत व्यक्त करण्याची प्रथा विरोधी पक्षनेत्याची आहे. आणि याबाबत अशोकराव चव्हाण कोठेही कमी पडलेले नाहीत, तर विरोधकांनी केलेल्या आरोपाचे खंडन करणे अथवा आरोपाचे टिंगल-टवाळी करणे अथवा केलेल्या विधानावर चिमटा काढणे हे सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याचे कामच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला असला तरी, मतदारांच्या दृष्टीने व राजकीय निरीक्षकांच्या दृष्टीने लोकसभा निवडणुका कधी होणार ? विधानसभा निवडणुका कधी होणार ? किंवा विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रित होणार का ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याबाबत निश्चितपणे असा खुलासा होत नाही. यामुळेच मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणे स्वाभाविक आहे.
गत लोकसभा - विधानसभा निवडणुका एकत्रित झालेल्या नाहीत तर वेगवेगळ्या झालेल्या आहेत. प्रथमता लोकसभेच्या निवडणुका आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या अनुषंगाने मागील इतिहास पाहिला तर लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात जागा जिंकून बहुमत प्राप्त केले होते. तर विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी युती तोडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाची युती झाली व सध्या महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार सत्तास्थानी आहे. केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये केंद्रातील व राज्यातील सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याचा विचार केला जात आहे.केवळ विकासकामांच्या जोरावर या देशांमध्ये निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी विविध प्रलोभने मतदारांना दाखवावे लागतात,परस्पर विरोधी राजकीय पक्षावर जोरदार टीका करावी लागते, तरच मतदार राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान करतात, केवळ आम्ही विकास कामे केली म्हणून देशातील मतदार सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी देतीलच असे नाही.
गेल्या साडेचार वर्षांमध्ये केंद्रातील व राज्यातील सरकारने जनतेसाठी नवीन योजना आणल्या नाहीत व जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. असा विरोधकांचा आरोप आहे. या अनुषंगाने सध्या राजकीय वातावरण काय आहे ? जनतेचा कौल काय आहे ? हे पाहून लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुका एकत्रित होणार की वेगवेगळ्या होणार ? हा येणारा काळच ठरवेल. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जात आहेत. कारण देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. यामुळे आगामी सरकार कोणाचे येणार ! कोणत्या राजकीय पक्षाला संधी मिळणार ? याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे.जनतेच्या दृष्टीने, जनतेचा सकारात्मक विचार करणारा राजकीय पक्ष सत्तास्थानी आला तर जनतेचा आर्थिकस्तर सुधारणासाठी व प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतो. भारतीय जनता पार्टी - शिवसेना यांची युतीचे सरकार आणायचे का ? काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकारला संधी द्यायचे ? हे निवडणुकीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या वातावरणानंतर मतदार आपला निर्णय घेत असतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा