प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दिवाकर रावते यांनी घेतली कणखर भूमिका


एसटी महामंडळ अतिशय डबघाईला आले होते. त्याला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न मंत्री दिवाकर रावते यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एसटी बसमध्ये नुकत्याच सापडलेल्या स्फोटकाच्या पार्श्वभूमीवर परिवहन खाते खडबडून जागे झाले आहे. अनेक निर्बंध खाजगी प्रवासी वाहतुकीबरोबरच एस टी महामंडळावरही घालण्यात आलेले आहेत. वास्तविक पाहता शासकीय विभागांमध्ये शिस्त नसते, ती शिस्त आणण्याचा प्रयत्न परिवहन विभागाने केलेला आहे. राज्यातील एसटी बससह खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, इतर प्रवासी वाहतूक साधने यांच्या सुरक्षीततेसंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक व सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत. वास्तविक पाहता हे निर्णय महाराष्ट्रातील तमाम एसटीने अथवा खासगी वाहनाने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी म्हणजेच प्रवाशांना सुखकारक प्रवास व्हावा, यासाठी एसटी महामंडळाची स्थापना झालेली आहे. एसटी महामंडळाच्यावतीने प्रवाशांना सर्वाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून एसटी महामंडळाची दुर्दशा व दुरावस्था झालेली आहे. एक प्रकारे मृत्युशय्येवर एस टी महामंडळ झोपल्याप्रमाणे अवस्था झालेली होती. दरम्यान शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी परिवहन मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक चांगले बदल केलेले आहेत. प्रवाशांना सुखकारक, आरामदायक प्रवास करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याचबरोबर सध्या दिवाकर रावते यांनी महत्त्वाचा व अतिशय निकटचा प्रश्न हाती घेऊन याबाबत कारवाईचे संदेश दिलेले आहेत.एसटी महामंडळाच्या बसेसप्रमाणेच खाजगी बस वाहतूक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. वास्तविक पाहता एसटी महामंडळाचे दुकान बंद होणार की काय ? अशी परिस्थिती मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झाली होती. कारण एस टी महामंडळ सुविधा देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने खाजगी बस वाहतूक करणारे प्रवाशांना सुविधा देत आहेत.

दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकताच निर्णय घेतला आहे की, खासगी प्रवासी बसेसनी अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्यास परवाना निलंबनाबरोबरच बस जप्तीची कारवाई होणार आहे. खाजगी बस वाहतूक करणाऱ्यांना प्रवाशाची ने-आण करता येते, दरम्यान त्याच बरोबर कुरिअर पार्सल अथवा विविध प्रकारच्या इतर अनुषंगिक सुविधा पुरवून अधिकचा नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. यावर राज्य शासनाचा यापूर्वी अंकुश नव्हता तो आता अंकुश राहणार आहे. राज्यातील खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेसनी प्रवाशांची वाहतूक करताना सुरक्ष‍िततेबाबत संपूर्ण दक्षता घ्यावी.प्रवासी वाहतूक करताना अनेक जण प्रवाशांच्या जीवाची अथवा सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी सुरक्षितेबाबत संपूर्ण दक्षता घेतली पाहिजे असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बजावलेल्या आहे. आणि विशेष म्हणजे प्रवासी वाहतूक करताना खासगी प्रवासी बसेसनी कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत कुरिअर वाहतूक, अनधिकृत पार्सल वाहतूक किंवा अनधिकृत लगेज वाहतूक करु नये अशी तंबीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भरलेली आहे. याचा किती परिणाम होतो ? हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल.

शासनाने घालून दिलेल्या नियमांना डावलून जर खाजगी प्रवासी वाहतूक सुरू राहणार असेल, परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. कारवाई कशी व कोणत्या पद्धती होईल. हे येणाऱ्या काळामध्ये पहावे लागेल. या निर्णयाची अंमलबजावणी खरेच किती प्रमाणात होते, हे ही स्पष्ट होईल.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर कडक कारवाई होणार आहे. म्हणजेच वाहतूक करताना खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स बसेस आढळल्यास त्यांच्यावर परवाना निलंबनाची तसेच जागेवर बस जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. इतकेच काय एस टी महामंडळ अंतर्गत अनागोंदीचा कारभार सुरू आहे. यावरही अंकुश ठेवण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेला आहे. एखाद्या एसटी बसचालकाने अथवा वाहकाने अनधिकृत पार्सलची वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम बदलीची आणि दुसऱ्यांदा थेट बडतर्फीची कारवाई होणार आहे. अनेक छोट्या-मोठ्या पार्सलची वाहतूक एसटी वाहक व चालक करीत असतात. ही पार्सलची वाहतूक करताना आर्थिक फायदा होत असतो.मात्र या फायदा व्यतिरिक्तही काही पार्सल अशा असतात ते समाजासाठी उपयोगी व वेळ वाचवणाऱ्या आहेत.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा स्पष्टवक्तेपणा व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा स्वभाव असल्याने "गव्हाबरोबर किडे ही चिरडले जाणार", हे मात्र निश्चित. जे नियमबाह्य आहे, त्याला पायबंद बसला पाहिजे, मात्र जे समाज उपयोगी आहे, ते मात्र बंद होता उपयोगाचे नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी बसस्थानकामध्ये बंदोबस्तासाठी पोलिसांची मर्यादित संख्या आहे. आता पोलीस चौकी एसटी महामंडळाच्या आवारात उभारली जाणार आहे.एसटी बसस्थानकामध्ये दिवसभरामध्ये लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. अनेकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काही निर्णय होणे महत्त्वाचे होते, ते निर्णय दिवाकर रावते यांनी घेतलेले आहेत. याबद्दल दिवाकर रावते यांचे कौतुकच केले पाहिजे. परिवहन खाते व एसटी महामंडळाला येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील हे निश्चित.

गोरख तावरे,
कराड - 9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.