अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ?



हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे  स्मारक अरबी समुद्रामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्न करत आहे. दरम्यान स्मारकाच्या कामाला ज्या प्रमाणात गती हवी होती, ती गती अद्याप मिळालेली नाही. गतकाळातील आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या शासकीय मंजुरी मिळवलेल्या आहेत. आणि समुद्रामधील जागाही निश्चित केलेली होती, परंतु गेल्या साडेचार वर्षांमध्ये शिवस्मारकाचे ज्याप्रमाणात काम झाले पाहिजे होते ते झाले नाही.याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे व्यक्त केली आहे.

वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचे मानबिंदू आहेत." छत्रपती शिवाजी महाराज की जय" असा जयघोष झाल्यानंतर मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो.  असे युगपुरुष असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम रेंगाळता उपयोगाचे नाही, अथवा शिवस्मारकाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारणाचा लवलेशही येता उपयोगाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर अनेक पिढ्या उभ्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची निगा राखण्यासाठी आजचा युवक जिवाचे रान करतो आहे. दरम्यान जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले काम म्हणजेच हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना, जगातील कोणत्याही देशांमध्ये असे झालेले नाही. आपल्या सवंगड्यासह ध्येयवेडाने पछाडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. दरम्यान मुंबईत समुद्रात होणाऱ्या छ. शिवाजी महाराज यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची कमी करून कसली काटसकर करत आहात, असा मराठी बाण्याचा रोखठोक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा विचारच मनामध्ये येण्याचा प्रकार म्हणजे विचारांचा खुजेपण आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. शिवस्मारकात बसवल्या जाणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करण्याचे कारणच काय ? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी रोखठोक मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असली तरी, विद्यमान युती सरकार याबाबत किती गंभीरपणे खुलासा करील, हे निश्चित सांगता येणार नाही. कारण सध्या निवडणुकीचे वातावरण असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत बोलताना विचारपूर्वकच बोलले पाहिजे, अन्यथा मराठी माणसाचे मन दुखावले तर, त्याचा फटका निश्चितच राजकीय पक्षांना बसू शकतो.अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाकडून आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळवलेल्या आहे. त्यामुळे शिवस्मारकाच्या प्रश्नाबाबत पृथ्वीराज चव्हाण गंभीर असणे स्वाभाविक आहे. त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले तर, त्याचा खुलासा विद्यमान सरकारने केला पाहिजे.

राजकारणासाठी व राजकारणामध्ये आपणाला फायदा व्हावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या विषयाला कोणीही हात घालणार नाही.शिवस्मारक नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे, हीच भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेली आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना शिवस्मारकाच्या कामाबाबत परिपूर्ण, सविस्तर माहिती दिलेली आहे.शिवस्मारकाच्या कामासाठी राज्य शासनाकडे पैसे नसतील तर त्यांनी तसे सांगावे, महाराष्ट्रातील जनता पैसे गोळा करून शिवस्मारकासाठी मदत करतील असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलेले आहे. याचा विचार राज्य शासनाने गंभीरपणे केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत असताना पैसे नाहीत हे कारण असू शकत नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रामध्ये अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच घेतलेला आहे आणि याबाबतचा निश्चित आराखडाही तयार झालेला असताना गेल्या साडेचार वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा (स्मारक) का उभे राहू शकले नाही ? याचा खुलासा राज्य शासनाने करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एकदा सोडून दोनदा भूमिपूजन केले. तरिही कामाला सुरूवात झाली नाही. मूळच्या आराखड्यात दोन टापा उंच केलेला घोडा होता. मात्र ठेकेदार कंपनीला खर्चात काटकसर करण्यास राज्यसरकारने सांगितले. त्यानंतर त्या कंपनीने चारी टापा जमिनीवर किंवा एक टाप वर केलेला घोडा अथवा घोड्याशिवाय केवळ पुतळा असे तीन पर्याय सरकारसमोर ठेवले आहेत. त्यामधील एखादा पर्याय मान्य करून तलवारीची उंची वाढवायची असे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारवर दबाव आहे का? तसे नसेल तर शिवस्मारकातील पुतळ्याची उंची कमी करण्याचा कारण काय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावा, अशी मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत पृथ्वीराज चव्हाण हे संवेदनशील आहेत. कसल्याही परिस्थितीमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, ही भूमिका स्पष्ट करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत, कोणतेही कारण न देता, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणे गरजेचे आहे. हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.

गोरख तावरे
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.