अंथरूण पाहून पाय पसरायला हवेत ! भौतिक सुख वस्तूंचे आकर्षण


आज प्रत्येकाला भौतिक सुखाची आस लागून राहिलेले आहे. भौतिक सुख हे आज जीवनाचे अंतिम ध्येय आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण शेजारच्या घरांमध्ये कोणत्या भौतिक वस्तू आहेत, त्या आपल्याकडे असाव्यात ? असा विचार सध्या समाजामध्ये प्रकर्षाने प्रकट होत असतो. आपल्या शेजाऱ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आपल्याकडे हव्यात, असा हव्यास अनेकांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. मात्र आपल्या कमाईच्या किती बाजू आहेत ? आपला दैनंदिन आर्थिकस्तर काय आहे ? याचा विचार न करता भौतिक गोष्टींचा वापर होत असल्याने अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असला तरी सुख वस्तूंचा उपभोग घेण्याकडे कल मात्र कमी होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर घर, बंगला, गाडी हा हव्यास फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र दिसून येत आहे.

घरामध्ये सर्व भौतिक सुविधा हव्या, त्याचबरोबर आपल्या आलिशान बंगला व घरासमोर चारचाकी वाहन हवे, ही मानसिकता दिसत असली तरी आपली कमाई किती आहे? त्यानुसार आपले राहणीमान असायला हवे, हा विचार होतो आहे की नाही ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.सहकार क्षेत्रामध्ये असणाऱ्या सहकारी बॅंका, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका यांचा व्याजदर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ज्याला जसे शक्य असेल त्या पद्धतीने ग्राहक कर्ज घेऊन आपल्या सुख वस्तूंचा उपभोग घेत असतो. दरम्यान नुकताच रेपो, रिव्हर्स रेपो दरात कपात होणार आहे. कर्ज होणार स्वस्त अशी बातमी धडकल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जे भौतिक सुखापासुन लांब आहेत, त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपणालाही कमी व्याजदरांमध्ये घर खरेदी करता येऊ शकते आणि आपल्या घरासमोर वाहन येऊ शकते, अशी आशा निर्माण झाली आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या दैनंदिन जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या व निकटच्या गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की जीवन सुखकारक झाले, असे म्हणता येते. दरम्यान या तीन गोष्टी प्राप्त करण्यासाठी अनेक यातायात व कष्ट सोसावे लागतात. त्याच वेळेला जीवनातील सुख, समाधान, ऐश्वर्य प्राप्त होते. दरम्यान अलीकडची मानसिकता पाहिली तर कमी श्रमात अधिक मोबदला मिळाला पाहिजे, ही मानसिकता समाजमनाची तयार झालेली आहे. सकारात्मक िचाराने काम करणाऱ्यांचे स्वप्नपूर्ती लवकर होत असते. तर नकारात्मक विचार आणि दुसर्‍याने केलेल्या प्रगतीचा हेवा केल्यामुळे कर्ज काढून घर व वाहन खरेदी केली जाते. हे एका दृष्टीने वाईट आहे. सहजासहजी काही मिळत नाही व प्राप्त होत नाही. कारण इतरांच्या प्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत असताना आपण कर्जबाजारी होतो, हा विचार केला जात नाही.

रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर जाहीर झालेले आहे. यानुसार रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात झालेले आहे. आता रेपो दर 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्के होणार असल्याने बँकांद्वारे वितरित होणारे कर्ज कमी व्याज दराने उपलब्ध होणार आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार असल्याकारणास्तव मध्यमवर्गीयांना आता आपल्या स्वप्नातील घर दिसू लागले आहे. स्वप्नातील गाडी मिळेल अशी आशा निर्माण झालेले आहे. वास्तविक पाहता मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी असे स्वप्न पाहणे गैर नाही, मात्र आपल्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत पाहिला पाहिजे. कर्ज घेऊन मर्यादित सीमारेषामध्ये राहिले पाहिजे. अन्यथा जीवनाचे गणित चुकण्याची शक्यता असते एवढे साधे व्यवहारिक ज्ञान समजले तर जीवनामध्ये फारसा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार असल्यामुळे, पाहिलेले स्वप्न अस्तित्वात येतील ही आशादायक बाब आहे. मात्र अंथरूण पाहून पाय पसरावेत असे मराठीमध्ये म्हटले जाते, याचाही विचार झाला पाहिजे.बँकांकडून घरबांधणीसाठी आणि वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुरुवातीच्या काळामध्ये भरले जातात. दरम्यान कालांतराने नियमितपणे हप्ते भरले जात नाहीत. आर्थिक गणित चुकते, याचा विचार करून बँकांची कर्ज घेतली गेली पाहिजेत. अन्यथा जीवनात पश्चाताप करणे व्यतिरिक्त पदरात काही पडणार नाही, हे निश्चित. सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्तासुद्धा कमी होणार आहे. यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. परंतु कर्ज घेत असताना मासिक उत्पन्न किती ? याचा विचार करून कर्ज घेतले गेले पाहिजे, म्हणजे जीवनात पश्चाताप होणार नाही.

वास्तविक पाहता प्रत्येकाला सुखवस्तू मिळाल्या पाहिजेत, आनंदाने जीवन जगता आले पाहिजे, भौतिक वस्तूंचा उपभोग घेता आला पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. एका अर्थाने बँकांचे व्याजदर कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आशा पल्लवित होणे स्वाभाविक आहे, यात गैर असे काही नाही. मात्र दैनंदिन जीवनाचा व संसाराचा गाडा कसा चालवायचा? याचा विचार करून व्याजदर कमी झाले तरी कर्ज घेताना आपल्या आवाक्यातील कर्ज घेऊन सुख वस्तूंचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.

गोरख तावरे, कराड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.