अखेर शिवसेना-भाजपा युती झाली हो ! राजकारणामध्ये कोणी, कोणाचा फार काळ मित्र नसतो अथवा शत्रू नसतो


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. लोकसभा निवडणुका कसल्याही परिस्थितीत जिंकायच्याच. असा विडा भाजपाने व काँग्रेसने उचललेला आहे. अशी तयारी काँग्रेस व राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे भाजप - शिवसेनेने ही आपली सत्ता कायम ठेवायची यासाठी निर्णय घेतलेला आहे. देशातील प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तासंपादनासाठी कार्यरत असतो, याशिवाय राजकीय पक्ष जगूच शकत नाहीत. आणि राजकीय पक्षाची निर्मिती झालेली असते, ती म्हणजे केवळ सत्ता संपादनासाठीच. सत्ता असल्याशिवाय जनसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. यामुळे देशातील व राज्यातील सत्ता ही आपल्याच राजकीय पक्षाला प्राप्त झाली पाहिजे. यासाठी वर्षानुवर्ष नियोजन केले जाते. वातावरण निर्मिती केली जाते. कारण सत्ता कसल्याही परिस्थितीत आपल्याच पक्षाला मिळाले पाहिजे. यासाठी राजकीय पक्ष वाटेल ते करण्याची तयारी ठेवत असतात. "वाटते ती" म्हणजे कोणताही अनुचित प्रकार न करता लोकशाही मार्गाने दिलेल्या आयुधांचा वापर करून लोकांमध्ये प्रबोधन करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यात काही गैर आहे, असे म्हणता येणार नाही.

सत्तशिवाय राजकीय पक्ष जगू शकत नाही. याचा अर्थ कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद वाढत नाही. कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही आणि सामान्य लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. यामुळे लोकशाहीमध्ये सत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. आपल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि कॉंग्रेस पक्ष उतरणार आहेत. त्याचबरोबर सध्या सत्तास्थानी असणारा भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन सत्तासंपादनासाठी लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीसोबत असणारे त्यांचे मित्रपक्ष नाराज आहेत. मित्रपक्षांची नाराजी काढून भारतीय जनता पक्ष राजकारणामध्ये "हम भी कुछ कम नही" असे दाखवून देत आहे.हे आता स्पष्ट झालेले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकायच्या असतील तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला बरोबर घेणे अत्यावश्यक आहे. याचा विचार करूनच जागावाटपाचा फार्मूला ठरला आहे . 50 - 50 टक्के जागांचे वाटप झालेले आहे. भाजपाबरोबर आम्ही युती करणार नाही असे शिवसेना वारंवार म्हणत होती. दरम्यान शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर नाही, तर याचा फायदा काँग्रेस पक्षालाच होणार ! आणि काँग्रेसची सत्ता येणार ! यामुळे विरोधात जाण्यापेक्षा आपल्याच मित्र पक्षाबरोबर कायम राहणे हे शिवसेनेने सत्य स्वीकारून भारतीय जनता पार्टी बरोबर युती केलेली आहे.भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती होण्याअगोदर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून येणार्‍या लोकसभा निवडणुका संयुक्तपणे लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची समजूत घातली आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याची भावना शिवसेनेची झालेली आहे, आणि हे सत्य आहे. त्यामुळे शिवसेनेला नाराज करून भाजपाला निवडणुका लढवणे सोपे नाही. भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष हा शिवसेना आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्रपणे निवडणूक मैदानात आहेत. अखेर शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे.स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेला लोकसभा निवडणूकीत सोबत न घेतल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी अखेर भाजपने शिवसेनेला टाळी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्येच सकारात्मक चर्चा झाली, यानंतर युतीची घोषणा झाली आहे.शिवसेना-भाजप युती झाली म्हणजेच, ती होतीच मात्र युतीमध्ये तणाव होता, तो आता कमी झाला आहे. पूर्वीसारखीच शिवसेना-भाजपाची युती अभेद्य राहिलेली आहे.याचा सर्वाधिक आनंद भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना झाला आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुका युती एकत्रीत लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेसाठी दोन्ही पक्ष २५-२३ जागा लढणार असून विधानसभेच्या १४४ जागा भाजपा लढेल आहे, तर शिवसेनेला १४४ जागा दिल्या जातील हा फॉर्म्युला ठरला आहे.लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपाला 50 - 50 टक्के जागांचे वाटप निश्चित झालेले आहे. युतीचे जागा वाटपाचा तिढा सुटला असता तरी कॉंग्रेस महाराष्ट्रातील राष्ट्रवादीबरोबर निवडणुका कशा होणार ? जागा वाटप कसे होणार ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजूनही काँग्रेस आपल्या मित्र पक्षांबरोबर चर्चा करीत आहे. शिवसेना-भाजपा युतीचा श्रीगणेशा सकारात्मक झाला. मात्र काँग्रेसची राजकीय चेकमेट कशी असेल, हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे स्पष्ट होईल.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत अखेर सकारात्मक भूमिका घेऊन शिवसेना-भाजपाशिवाय देशाला पर्याय असू शकत नाही, बहुधा याचा विचार केलेला आहे. म्हणूनच अखेर शिवसेना-भाजपाची युती पक्की व भक्कम झाली आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत चांगली रंगत आहे. एकास एक उमेदवार म्हणजे दुरंगी लढती पहावयास मिळतील. अटीतटीच्या लढती होतील आणि सत्तासंघर्ष पाहिला मिळेल. सत्तासंघर्ष हा नेहमीच निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येतो. दरम्यान अलीकडच्या काळामध्ये भाजपनेही समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. तर काँग्रेसनेही आपल्या मित्रपक्षाला बरोबर घेऊन निवडणुकीचा निर्णय घेतला आहे.शिवसेना-भाजपाची युती म्हणजेच राजकारणामध्ये कोणी, कोणाचा फार काळ मित्र नसतो अथवा शत्रू नसतो हे एकदा स्पष्ट झालेले आहे.भाजपाने शिवसेनेबरोबर युती केल्यामुळे शिवसेना सध्या विरोधकांच्या टारगेटवर आहे. कारण गेल्या साडेचार वर्षांमध्ये जेवढा विरोध भाजपला विरोधी पक्षातील विरोधकांनी केला नाही त्याच्यापेक्षा अधिक पटीने भाजपाचे "वस्त्रहरण" करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलेला आहे. यामुळे सत्तेच्या जवळपास जाऊ पाहणाऱ्या विरोधकांना शिवसेनेने रोखले आहे. या कारणास्तव सध्यातरी शिवसेना विरोधकांच्या रडारावर असणे स्वाभाविक आहे.

गोरख तावरे
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.