तंत्रज्ञान आणि भविष्य वेध.... अजिंक्य डी. वाय. पाटील यांच्या विचारातून प्रकट झालेला लेख.....


गेल्या काही महिन्यांत झालेल्या मोर्चामध्ये नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवांचा मोठा सहभाग होता. कायम नोकरी मिळावी, म्हणून रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेल्वे रोको केलेली कृती असो, एमपीएससी परीक्षा गेली दोन वर्षे न घेतल्याबद्दल आणि रिक्त पदे न भरल्याबद्दल सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली नाराजी असो, किंवा संपूर्ण राज्यभरात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी, म्हणून हजारो युवकांनी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न असो, या साऱ्या आंदोलनातील प्रश्नांचा सामायिक धागा म्हणजे वाढती बेरोजगारी आहे. 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’ च्या अहवालानुसार देशामध्ये सुमारे ३.१ कोटी बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात सतत वाढ होत आहे.

देशाच्या ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. शेतीविषयक समस्या, कर्जबाजारीपणा, शेती वगळता पर्यायी रोजगाराचा अभाव, यांमुळे ग्रामीण स्तरावरील युवकांची स्थिती बिकट बनली आहे. शेती करून हातात काही येत नाही आणि शेती करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, अशी त्यांची संभ्रमावस्था झाली आहे. बेरोजगारीसारखा अत्यंत ज्वलंत प्रश्न आपल्या देशापुढील सर्वात मोठे आव्हान असून या प्रश्नाची सोडवणूक एकटे कोणतेही सरकार करू शकत नाही, तर समाजातील सर्व घटक जे रोजगाराची संधी उपलब्ध करून देवू शकतात अशांनी मिळून यावर उपाय शोधणे आणि कृती करणे आवश्यक आहे. अपेक्षित रोजगारांची संख्या आणि बेरोजगारीचा दर यांच्यामधील दरी सुंदावत चालली आहे. निश्चलनीकरणामुळे मध्यम आणि लघु उद्योग धुळीला मिळाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, ग्रामीण भागांतील लघुउद्योगांची तर कंबर तुटली हे सर्वज्ञात आहेच.

आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे. औद्योगिक क्रांतीने जगाच्या अर्थकारणाचे चित्र संपूर्णपणे बदलून टाकले. वाफेच्या इंजिनापासून सुरू झालेल्या या तंत्रज्ञानाने उत्पादन क्षेत्रापासून शेती व्यवसायापर्यंत सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल आणले. कापड उद्योग, लोहमार्ग वाहतूक, पोलाद उत्पादन येथपासून घडत गेलेले बदल खाण उद्योग, ऊर्जा उद्योग या सर्वच क्षेत्रांत पसरत गेले. मोठमोठे कारखाने उभे राहिले.लोकांना रोजगार मिळाले, शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येत गेला आणि या सर्वांचाच देशाच्या अर्थकारण व समाजकारण यांवर सखोल परिणाम झाला. या औद्योगिक क्रांतीने जशी सुबत्ता आणली तसेच त्याचे वाईट परिणामही आले. शहरीकरण झाले, पण शहरांचे बकालीकरणही झाले. ऊर्जेच्या भरमसाट व अयोग्य वापराने पर्यावरणावर अतिशय घातक परिणाम होऊन खेड्यापाड्यांतून शहरात काम व पैशाच्या आशेने आलेल्या माणसांचे हाल झाले. खेडी ओस पडत चालली व शहरातील वाढत्या गर्दीने आयुष्य बरबाद झाले. पण एक मात्र खरे की तंत्रज्ञानाने आणलेल्या या औद्योगिक क्रांतीने तेव्हा उत्पादकता भरपूर प्रमाणात वाढवली.

रोजगार वाढवले, मालाची मागणी वाढवली, सेवांची गुणवत्ता वाढवली. आपण गेल्या ५० वर्षात भारतात झालेल्या पोलाद, मोटार उद्योग, वाहतूक सेवा इत्यादींतील बदल बघितले तर १०० वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात झालेल्या बदलांचे चित्र डोळ्यांसमोर आणता येते. तेव्हाच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे ज्या यंत्रांची निर्मिती झाली, त्या बहुतेक सर्व यंत्रांनी माणसाच्या शारीरिक कष्टांची जागा घेतली. उदाहरणार्थ वजन उचलण्याच्या यारीने २०० माणसांची संपूर्ण दिवसाची मेहनत एका तासात उरकण्याची किमया केली. माल उत्पादन, खाण उद्योग, वाहतूक या सर्वच क्षेत्रांत माणसाच्या मेहनतीची जागा लहान-मोठय़ा यंत्रांनी घेतली. साध्या जमिनीत खट्टा करायला किंवा विहीर खणायला जेवढी माणसे किंवा दिवस लागायचे, यंत्रांनी तेच काम काही तासांत उरकून उत्पादकता कमालीने वाढवली. यामुळे बिनचूक मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यास व त्याचा परिणाम उत्पादनाच्या खर्चावर होऊन त्या त्या मालाचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करणे शक्य होऊ लागले. पण या प्रत्येक यंत्राबरोबर ते चालवणारा माणूस तेथे असणे जरुरीचे होते.

आजची जी तंत्रज्ञान क्रांती होते आहे. त्यात माणसाच्या मेहनतीची जागा यंत्रे घेत असतानाच बुद्धीचीही जागा घेत आहेत. संगणक जेव्हा ८०/९० च्या दशकात घराघरात पोहोचले, त्यावेळी संगणक कितीही वेगवान असला तरी त्याला स्वत:ची बुद्धी नाही व आपण जे सांगू, जी आज्ञावली पुरवू त्यानुसार काम करणारा तो माणसाचा गुलाम आहे. अशी हेटाळणी रूप भाषा सर्वच जण वापरताना दिसत होते. पण या डिजिटल क्रांतीच्या ओघात आता येणारी यंत्रे, यंत्रमानव हे माणसांचीच जागा घेत आहेत. या क्रांतीचा पहिला परिणाम जो तुम्हा-आम्हा सर्वांनाच दिसेल तो म्हणजे चालकाशिवाय चालणारी गाडी. आता केवळ कल्पनेतच नाही तर प्रत्यक्षात रस्त्यावर धावताना दिसणार आहे. आज जेव्हा संगणकीय यंत्र व माणूस बरोबरीने कामे करतील तेव्हा ऐन वेळी निर्णय कोण घेईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी वैद्यकशास्त्रातील एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून, विमान, गाड़ी चालकापर्यंत ही नवीन यंत्रे माणसाची मेहनतच नाही तर बौद्धिक क्षमतेची जागा उत्तम तऱ्हेने घेऊ लागणार आहे. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग यांच्यावर या नवीन क्रांतीमुळे होणारा हा परिणाम सर्व अर्थव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर खोलवर परिणाम करणारा ठरणार आहे.

आजच्या औद्योगिक व तंत्रज्ञान क्रांतीने अकुशल कामगारांची गरज जवळजवळ संपुष्टात आणली आहे. पण आजही कुशल कामगारांना रोजगाराची हमी आहे. उद्याच्या तंत्रज्ञानाने कुशल कामगारांची गरजही कमी होत जाईल. डिजिटल क्रांतीचे हे बदलते स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे. औद्योगिक उत्पादकता वाढते आहे, पण लोकांची घरटी आमदनी मात्र कमी होत आहे. अर्थव्यवस्था वाढते आहे, पण रोजगाराचे प्रमाण मात्र वाढताना दिसत नाही. गरीब - श्रीमंतीतील दरी आणखीनच वाढताना दिसत आहे. तुम्ही केवळ कुशल कामगार आहात म्हणून तुम्हाला रोजगार मिळणार नाही तर आता तुम्हाला 'अतिकुशल कामगार म्हणून शिक्षण घेणे जरुरी आहे. जगातील सर्वच प्रगत देशांत या उद्याच्या तंत्रज्ञान क्रांतीमुळे हे बदल घडणार आहेत. त्या बदलांची व त्यांच्या परिणामांची तीव्रता ही त्या त्या देशातील सामाजिक परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असेल. पण सर्वच देशांतील मध्यमवर्गीय समाजावर या बदलांचे जास्तीत जास्त परिणाम झालेले असतील.

आपण आजपर्यंत करीत असलेली कामे उद्या यंत्रे करणार आहेत व त्यामुळे उद्या निर्माण होणाऱ्या रोजगारांची तयारी आज करणे जरुरी आहे. भारत आज त्या नवीन क्रांतीला सज्ज व्हायला पाहिजे. कारण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे उभे राहणारे कारखाने वेगळ्या कौशल्याला रोजगार देणार आहेत. तंत्रज्ञानाचा एक नवीन वर्ग तयार करणार आहेत. आपण सर्वांनीच याची दखल घेऊन त्या दृष्टीने तयारी करणे जरुरी आहे. उत्पादनाच्या तंत्रात बदल झाल्याने जी बेकारी निर्माण होते त्या बेकारीला तांत्रिक बेकारी असे म्हणतात. शहरी भागात कारखानदार श्रमिकांऐवजी यंत्रांना जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन करणे यामुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते. त्यामुळे तांत्रिक बेकारी निर्माण होते. काही ठिकाणी यांत्रिकीकरणामुळे हजारो लोकांचा रोजगार आणि नोकऱ्या बुडाल्या असून या लोकांच्या उपजीविकेसाठी सरकार आणि त्यांच्या नोकरीच्या ठिकाणच्या व्यवस्थापनाने आपल्या कामगारांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

यामध्ये सरकारने यंत्र कर वसूल करून त्यामधील ठराविक हिस्सा अशा बेरोजगार झालेल्या कामगारांना दिला तर ते उदरनिर्वाहाचा दुसरा काहीतर विकल्प शोधतील आणि त्यांना एक आधार मिळेल. असं जर नाही झाल तर, बेरोजगारीमुळे हिंसाचार,गुन्हेगारी आणि समाजाला अहितकारी असणाऱ्या गोष्टींमध्ये हि लोक सामील होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.पण सध्या आपला सर्वसाधारण समाज हा नको असलेल्या गोष्टींमध्ये म्हणजे धर्म, जाती - पाती, राजकारण, मांसाहार,भाषण-लेखन स्वातंत्र्य यामध्ये गुरफटून आपला वेळ फुकट घालवतो आहे.ज्यामुळे रोजगाराच्या किंवा अर्थार्जनाच्या काहीच संधी प्राप्त होणार नाहीत. अशा परीस्थित जर या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी याला संवैधानिक स्वरूप देता आले तर देशात सगळीकडे याचा उपयोग करून बेरोजगारी आणि पर्यायाने उदरनिर्वाह आणि गुन्हेगारी यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येईल. या सगळ्या गोंधळात तंत्रज्ञान क्रांतीच्या बदलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघणे हि काळाची गरजच आहे

डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील
अध्यक्ष, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ,
लोहगाव- पुणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.