काँग्रेस पक्षाला येत आहेत अच्छे दिन / मलकापूर नगरपरिषदेवर काँग्रेसचाच झेंडा. . .


सातारा जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या मलकापुर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षसह 15 जागांवर विजय मिळवला तर भारतीय जनता पार्टीला 5 जागा मिळाली आहेत. गत लोकसभा निवडणुकीपासून देशात मोदींची लाट व भारतीय जनता पक्षाची सत्ता सर्वत्र येत आहे, असे चित्र होते. दरम्यान तीन राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्यापासून सर्वत्र काँग्रेसचा विजय होत आहे, असे चित्र दिसून येत आहे.मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. कारण मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते.

दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापुर नगरपरिषद महत्त्वाचे आहे. यामुळे या निवडणुकीकडे केवळ सातारा जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या गटांमध्ये मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक झालेली आहे. अपवाद अपक्ष उमेदवारांचा सोडता एक ते नऊ प्रभागांमध्ये दुरंगी लढत झाली आणि यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेऊन 14 जागांवर विजय मिळवला. तर थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्यामुळे काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा विजय निश्चित होणार असे काँग्रेस पक्षाच्यावतीने सांगितले जात आहे. देशातील तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाने सत्ता संपादन केल्यानंतर देशपातळीवरील काँग्रेस पक्षामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला मतदार सत्ता देतील, असे वातावरण निर्माण झाले आहे. काही अंशी हे सत्य आहे, हे नाकारून चालणार नाही.

माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची समाजामध्ये असणारी प्रतिमा स्वच्छ, पारदर्शक व अभ्यासू यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मनोहज शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली आणि याला घवघवीत यश मिळालेले आहे. मनोज शिंदे यांनी मलकापूरच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे. याची पोचपावती मलकापूरच्या मतदारांनी मनोहर शिंदे यांना दिले आहे. 19 जागांपैकी 14 जागांवर पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे व मनोहर शिंदे यांचे नेतृत्व मान्य करणारे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीतही काँग्रेसने आघाडी घेतल्यामुळे काँग्रेसला मलकापुर नगरपरिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यामुळे येणाऱ्या काळामध्ये मलकापूरच्या विकासाचा वेग असाच कायम राहणार यात तिळमात्र शंका नाही. आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे मतदार संघातील मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते.

देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सामान्य नागरीकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसचे मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत 14 उमेदवार विजयी झाले आहेत. सदरची निवडणूक माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे मार्गदर्शन आणि माजी गृह राज्य मंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. विश्वजित कदम, उदयसिंह पाटील (दादा), हिंदूराव पाटील, अजितराव पाटील, जयवंत जगताप, राजाभाऊ पाटील, नाना पाटील, मंगला गलंडे, नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग देऊन प्रचाराचे मैदान गाजवले होते आणि काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींनी मलकापूरच्या मतदारांना जी आश्वासने दिली, विकासाचा मार्ग सांगितला, तो मलकापूरच्या मतदारांनी मान्य करून काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. मलकापूर ग्रामपंचायत, मलकापूर नगरपंचायत, मलकापूर नगरपरिषद असा प्रवास मलकापूर शहराचा झालेला आहे. यामध्ये मनोहर शिंदे यांनी दिलेले योगदान मतदारांनी विचारात घेऊन पुन्हा एकदा मनोहर शिंदे यांना मलकापूरचा विकास करण्याची संधी दिलेली आहे.

येणाऱ्या काळामध्ये राज्य व केंद्र शासनाकडून विविध प्रकारचा निधी मिळवून अनेक योजना मलकापूरमध्ये राबवल्या जातील. मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे विभक्त असणारे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गट व माजी मंत्री विलासकाका पाटील गट एकत्र आलेले आहेत. काँग्रेसच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. राजकारणात कोणी कोणाचा दीर्घकाळ शत्रू असत नाही व राजकारणात मित्रत्व ही फार काळ टिकत नाही हे या निवडणुकीमुळे स्पष्ट झालेले आहे.काँग्रेसची विचारधारा ही स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये रुजलेली आहे. लोकशाही मानणारे मानसिकता ही काँग्रेस कार्यकर्त्यांची असल्यामुळे काँग्रेसला देशातील जनता अग्रक्रमाने पसंती देत आहेत. हे अलीकडच्या काही निवडणुकांवरून स्पष्ट होत आहे.लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्तांतर होतात व सत्तांतर होणे ही काळाची गरज असते, कारण एकाच पक्षाची दीर्घकाळ सत्ता असल्यानंतर लोक वैतागतात व दुसऱ्याला संधी देतात, दरम्यान ज्यां राजकीय पक्षाला संधी मिळाली त्यांच्या कामाची मोजदाद केली जाते. आणि काम करण्याची पद्धत आवडली नाही किंवा पसंत पडली नाही तर मात्र पुन्हा मतदार दुसऱ्या राजकीय पक्षाला संधी देतात हा आजवरचा इतिहास आहे.

सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सर्वश्रुत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्मितीनंतर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झालेला आहे.इतर राजकीय पक्षांना अल्पप्रमाणात काही मतदारसंघांमध्ये मतदार पसंती देतात. मात्र सरसकट सातारा जिल्हात काँग्रेस व राष्ट्रवादी व्यतिरिक्त इतर पक्षांना संधी दिली जात नाही. हे आजवरच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. मलकापुर नगरपरिषदेचा निकाल हेच सांगत आहे की, आम्ही काँग्रेसच्या विचाराचे पाईक आहोत.

गोरख तावरे



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.