ज्येष्ठ संपादक, पत्रकार हालाखीचे जीवन कंठताहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण



“आचार्य बाळशास्त्री जाांभेकर पत्रकार सन्मान” योजना ज्येष्ठ पत्रकारांसाठी सकारात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ संपादक, पत्रकारांना यांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. कारण गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ व 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे महाराष्ट्रमध्ये अनेक संपादक, पत्रकार आहेत. “आचार्य बाळशास्त्री जाांभेकर पत्रकार सन्मान” योजनेस
मान्यता मिळालेले आहे. सदरची योजना ज्येष्ठ पत्रकारांसाठी आहे. ही योजना मंजूर करावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. वास्तविक महाराष्ट्रामध्ये पत्रकार व संपादकांच्या अनेक संघटना आहेत. प्रत्येक संघटनेने यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळे एकाच संघटनेला या कामाचे श्रेय देता येणार नाही.

ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी अशी प्रथम मागणी करण्यात आली होती. मात्र सध्या पेन्शन कोणालाही दिली जात नसल्यामुळे सदर पत्रकारांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पत्रकार सन्मान योजना असे नाव देण्यात आलेले आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सदरची योजना सुरू करण्यात आली आहे. हे एका दृष्टीने आनंदाची व सकारात्मक बाब म्हणता येईल. कारण मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण नावाचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. हा यामागील इतिहास आहे. पत्रकारिता करणे म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणे अशा पद्धतीचे प्रारंभीच्या काळात होते. अलीकडच्या काळामध्ये व्यवसायिक पत्रकारिता निर्माण झाली आहे. म्हणजेच पत्रकारांना चांगले वेतन दिले जाते आणि वृत्तपत्रांनाही जाहिरात स्वरूपामध्ये चांगले आर्थिक लाभ होत आहे.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी देशसेवा केली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष लघु व मध्यम वृत्तपत्रांनी जिल्हा, तालुकास्तरावर प्रबोधनाची चळवळ सुरू राहण्यासाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजकार्य केलेले आहे. या हेतूनेच पत्रकारांना आर्थिक लाभ मिळावा, यासाठी अनेक संघटनांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर दुसरे कारण असे की, महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेमध्ये काम करणारे संपादक, पत्रकार ज्येष्ठ आहेत, ते हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन कंठीत आहेत. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर पत्रकारांसाठी असणाऱ्या संघटनांनी सकारात्मक विचार करून हलाखीचे जीवन जगणाऱ्या संपादक, पत्रकारांना आर्थिक मदत शासनाच्यावतीने व्हावी, यासाठी पत्रकारांना पेंशन सुरू करावी अशी मागणी केली. दरम्यान पत्रकार सन्मान योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर करून पत्रकारांना दिलासा दिला आहे.शिवसेना-भाजप सरकारने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. कारण पत्रकारांना आर्थिक मदत करावी अशी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली जात होती. मात्र याबाबत युती सरकारने निर्णय घेऊन राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानित केले आहे. असे अभिमानाने म्हणावे लागेल.

महाराष्ट्रातील ज्या पत्रकारानी सामाजिक दृष्टिकोन ठेवून व प्रामाणिक पत्रकारिता केली, त्यांना या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या ज्येष्ठ पत्रकारांचे आर्थिक परिस्थिती सुस्थितीत आहेत, त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही. दरम्यान शिवसेना-भाजप सरकारने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना जाहीर केली, यामध्ये अनेक जाचक अटी व नियम आहेत. याबाबत फेरविचार करून काही अटी व शर्ती या अध्यादेशातून वगळाव्या लागतील, यासाठी सर्व संघटनांना पुन्हा एकदा शासनस्तरावर प्रयत्न करावा लागणार आहे. ज्येष्ठ पत्रकारांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रामध्ये आजही अनेक ज्येष्ठ संपादक, पत्रकार हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन कंठीत आहेत. त्यांच्यासाठी हा आशेचा किरण आहे. ज्येष्ठ संपादक, पत्रकार यांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक लाभाची गरज आहे त्यांना हा आर्थिक लाभ मिळाला पाहिजे. यासाठी सदर अध्यादेशातील नियम, अटी, शर्ती शिथिल करून अधिकाधिक ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ संपादकांना पत्रकारांना न्याय दिला असेही म्हणता येईल.

गोरख तावरे, अध्यक्ष
प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद
पुणे - कराड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.