आता शरद पवार पंतप्रधान होणार ! माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार !



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची बातमी धडकल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचा अंदाज चुकला की काय ? असे वाटू लागले आहे. कारण शरद पवार यांनी यापूर्वीच "आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही" असे जाहीर केले होते. दरम्यान सध्या देशातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहता, विद्यमान भारतीय जनता पार्टीच्या सरकारला धक्का देण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्यामुळे राजकीय निरीक्षकांनी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीवरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

त्याचबरोबर खुद्द शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही ? हेही स्पष्ट केलेले नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी व माढा मतदारसंघातील मोहिते-पाटील यांनी शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर आपण निवडणूक लढवणार नाही त्यांचा प्रचार करू असे जाहीर केले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर देशपातळीवर राजकारणामध्ये शरद पवार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक राजकीय पक्षाशी चर्चा करताना, समन्वय साधण्याची कला शरद पवार यांना अवगत आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे प्रमुख राजकीय पक्षांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्याची तयारीही सुरू झाली आहे.

शरद पवार लोकसभा निवडणुकीत उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार असेल, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार असले तरी, शरद पवार पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याकारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याबाबत बरेच वादळ निर्माण झाले आहे. शरद पवार यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्याचबरोबर समाजातील दीनदलित,गरीब, शेतकरी, शेतमजूर,पीडित, अन्यायग्रस्त जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. समतावादी विचारसरणी ठेवून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वेगळेपण निर्माण केलेले आहे. त्याचबरोबर देशपातळीवरील राजकारणामध्ये काम करताना शरद पवार यांचे प्रत्येक राजकीय पक्षांची ऋणानुबंध मैत्रीपूर्ण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या विचारसरणीच्या पठडीमध्ये शरद पवार यांची राजकीय कारकीर्द सुरुवात झाली आणि आजही त्या विचारसरणीने शरद पवार महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. समतावादी, समाजवादी, राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करून शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगळे - वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून अनेक घटकांना संधी दिली आहे. ज्यांना कधी संधी मिळाली नाही, अशा दुर्लक्षित असणाऱ्या समाजातील व्यक्तींना आमदार-खासदार करण्यामध्ये शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रातील सरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री याचबरोबर अनेक खात्याचे मंत्रीपदाचा कार्यभार शरद पवार यांनी यशस्वीपणे सांभाळलेला आहे.

केवळ शरद पवार यांना आत्तापर्यंत पंतप्रधान पदापर्यंत पोहोचता आले नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार यांना पंतप्रधान पदाची संधी आलेली होती मात्र काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे शरद पवार यांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली आणि शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे पद हुकले. अन्यथा यापूर्वीच शरद पवार देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाले असते. हा इतिहास झाला दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आणि आपल्या सहयोगी पक्षांना बरोबर घेऊन लोकसभा निवडणुका लढवत असताना आघाडीचे सरकार निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची संधी आहे. हा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरला असावा. केवळ एक या कारणामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात असावेत, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. दरम्यान शरद पवार जोपर्यंत स्वतः उमेदवारीची घोषणा करीत नाहीत, तोपर्यंत शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत अनेक प्रकारची चर्चा सुरू राहणार आहे.

गोरख तावरे, कराड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.