स्वच्छ सर्वेक्षणामध्ये कराडकरांनी दिले दाखवून "हम भी कुछ कम नही" कराड नगरपालिकेच्या डोईवर मानाचा तुरा



स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका राज्यात प्रथम आल्याची बातमी कराडकरांना कळताच कराडकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. प्रत्येकाचे अभिनंदन करण्यासाठी एकमेकांचे मोबाईल सातत्याने खणखणत होते. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, माजी आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व आरोग्य विभागातील सेवकांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये कराड नगरपालिकेचा राज्यात पहिला क्रमांक आला असून देशातील एक लाख लोकसंख्येच्या चार हजार पेक्षा जास्त नगरपालिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये कराड नगरपालिकेचा पहिला क्रमांक आला आहे.स्वच्छ "कराड - सुंदर कराड" आणि स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळे कराडकरांचा उर अभिमाना अभिमानाने भरून आला आहे.

कराड शहरातील सर्वांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून अपार कष्ट केले, त्याचे चीज झाले असे म्हणावे लागेल.एखादे काम हाती घेतले की कराडकर मागे हटत नाहीत हे एकदा पुन्हा स्पष्ट झालेले आहे. कराड नगरपालिकेला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विकास कामांमध्ये आघाडी घेण्याची कराड नगरपालिकेची परंपरा आहे. तर तब्बल चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविण्याचा मान ही कराड नगरपालिकेला मिळालेला आहे. नगराध्यक्षपदाचा विक्रम करणारे आदरणीय पी. डी. पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. राजकीय पक्षाचे जोडे अथवा राजकीय पक्षाचा विचार नगरपालिकेच्या बाहेर ठेवून कराड नगरपालिकेमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी (नगरसेवक) शहराच्या विकासासाठी हातात हात घालून काम करीत असतात. पक्षीय राजकारण नगरपालिकेच्या परिघाबाहेर केले जाते. कराड नगरपरिषदमध्ये काम करताना केवळ शहराचा सर्वांगीण विकास करायचा, एवढाच एक साधा विचार घेऊन कराड नगरपालिकेच्या स्थापनेपासून आज अखेर नगरसेवक काम करत आहे. त्यामुळेच कराड नगरपालिकेचा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर, देशभरामध्ये नाव आहे. आणि एकाच व्यक्तीने चाळीस वर्ष नगराध्यक्षपद भूषविण्याचा विक्रमाची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.

कराड हे पौराणिक, ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्याचबरोबर कराडमध्ये सर्व जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व आनंदाने राहत आहेत. त्याचबरोबर कराड नगरपालिका कराड शहरातील नागरिकांना प्राथमिक सर्व सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर कराड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विविध प्रभागातून निवडून येणारे नगरसेवक कराड नगरपालिकेमध्ये एकत्रितपणे विकासाच्या कामासाठी प्रयत्न करीत असतात. गेल्या वर्षभरामध्ये कराडमध्ये सुरू असणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण कामांमध्ये अक्षरशा कराडकरानी स्वतःला झोकून दिले होते. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत मोठ्या प्रमाणात लोक चळवळ उभारण्यात आली होती. लोकचळवळ उभा करत असताना लोकांचे प्रबोधन करण्याबरोबरच स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्रमध्ये प्रथम क्रमांकाचा मान कराड नगरपालिकेला मिळालेला आहे.कराड नगरपालिका करत असलेले काम हे लोकाभिमुख आहे. कराड नगरपालिकेमध्ये काम करणारे सर्व नगरसेवक,

आरोग्य विभागाचे सर्व सेवक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर कराड शहरातील माता - भगिनी, नागरिक, विविध सामाजिक संघटना यांनी गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले आणि स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. यासाठी लागणारे कष्ट प्रत्येक कराडकरांनी उचलल्यामुळे कष्टाचे चीज झाले असे म्हणावे लागेल. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळाले हे अभिमानास्पद यशात सर्वात मोठा वाटा आरोग्य विभागातील अथक मेहनत घेणार्‍या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नगरपरिषदा व महानगरपालिका यांचा गौरव करण्यासाठी विज्ञान भवन (नवी दिल्ली) येथे महामहीम राष्ट्रपती, मंत्रीमहोदयांच्या हस्ते कार्यक्रम नियोजित असून सदर कार्यक्रमामध्ये कराड नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल गौरव करण्यात येणार आहे. अशा आशयाचे स्वच्छ भारत अभियान संचालनालय (नवी दिल्ली) यांचे पत्र प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्यामार्फत प्राप्त झालेला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये कराड नगरपरिषदेला जो बहुमान प्राप्त झाला त्याचे श्रेय निर्विवादपणे कराडकरांना आहे. कराड नगरपरिषदेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जाणीव व जागृती निर्माण करण्यासाठी नगरपरिषद स्तरावरून विविध प्रयत्न करण्यात आले. तमाम कराडकरांनी नगरपरिषदेच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लक्षणीय यश प्राप्त केलेले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ सालच्य अनुषंगाने पूर्वतयारी करून प्रत्यक्ष काम केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून घंटागाड्या१८ व ट्रॅक्टर २ नव्याने कचरा संकलन करण्यासाठी कार्यान्वित केले होते.स्वच्छ सर्वेक्षणला सामोरे जाण्यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशामध्ये सलग दोन वेळा प्रथम क्रमांक पटकावणाररे इंदूर महानगरपालिकेला कराड नगरपालिकेच्या शिष्टमंडळासह अधिकारी, कर्मचारी,कराड शहरातील स्वच्छतादूत, पत्रकार, नगरसेवक, नगरसेविका यांनी भेट देऊन माहिती घेतली. तसेच राज्य शासनाने कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना घनकचरा व्यवस्थापनासाठी जपान येथे पाठवल्यामुळे खऱ्या अर्थाने कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास गती मिळाली व या शहरांमध्ये स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व ती रुजली आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याची मोहीम राबवली गेली आणि याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. कचरा संकलन व विलगीकरण यामध्ये सातत्य ठेवल्यामुळे १०० टक्के ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा होत आहे.

एकंदरीत गतकाळामध्ये आदरणीय पी.डी. पाटील यांनी पायाभूत सुविधा उभ्या केल्यामुळे आणि विद्यमान सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काम केल्यामुळे कराडचा लोकोक सर्वार्थाने सर्वदूर पोहोचला आहे. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षणांमध्ये "हम भी कुछ कम नही" असे कराडकरांनी देशाला दाखवून दिलेले आहे. कराड नगरपालिकेने मिळवलेले हे यश म्हणजे कराड नगरपालिकेच्या डोईवर मानाचा तुरा आहे.

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.