विरोधकांच्या बेगडी प्रेमाला जनताच 21 तारखेला उत्तर देईल : आ. पृथ्वीराज चव्हाण
कराड, (लक्ष्मीपुत्र) - विरोधकांनी लोकसभेला जो भावनिक प्रचार केला. तसाच याही वेळेस होईल. दोन महिन्यात पोटनिवडणूकीची का घाई केली. असा सवाल करत विरोधकांना जनतेचा पोकळ कळवळा आहे. नोकऱ्या दिल्याचे सांगून एकप्रकारे भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जनतेविषयीच्या बेगडी प्रेमाला जनताच 21 तारखेला उत्तर देईल. असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
विंग (ता. कराड) येथील श्री मारुती मंदीरात काँग्रेस आघाडीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील व विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारास प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. श्रीनिवास पाटील, किसनराव पाटील-घोणशीकर, आनंदराव पिसाळ, डॉ. इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते, राजाभाऊ पाटील-उंडाळकर, रघुनाथराव कदम, सारंग पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, मनोहर शिंदे, शिवराज मोरे, पैलवान नानासाहेब पाटील, इंद्रजीत चव्हाण, नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, सदस्या मंगल गलांडे, राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, मी कराड ते चिपळूण रेल्वे मार्गास मंजुरी मिळवली. कराड ते ढेबेवाडी हा मार्ग मी कोकणापर्यंत मी नेणार आहे. विकासाच्या अनेक कल्पना घेऊन मी तुमची सेवा करत आहे. पण हे नाकर्ते सरकार आपल्या भागातील निधी नागपूरला पळवत आहे. त्याचबरोबर त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कोलमडला आहे. फसवी कर्जमाफी, उत्पन्न दुप्पट झालेले नाही. मला विंग गटात विकासाची मोठी कामे करता आली. पण मी मंजूर केलेली कामे या नतद्रष्ट मंडळींनी अडवली. वानरवाडी तलाव व येणके-पोतले पुलाच्या कामास यांनीच विरोध केला. मी रेठऱ्याला दिलेला निधीही यांनी नाकारला. माझ्यापेक्षा दहापट कामे करा. मी तुम्हाला कुठे अडवले आहे.
श्रीनिवास पाटील म्हणाले, लोकांनी कराडच्या इतिहासाची आठवण ठेवावी. भारतीय इतिहासात कराडचे यशवंतराव चव्हाण, प्रेमलाकाकी, आनंदराव काका व सध्या पृथ्वीराजबाबा या चौघाजणांनी काम केले आहे. ही वस्तुस्थिती असताना आम्ही काय केलं असे विरोधक म्हणतात. त्यांनी जे पेरता तेच उगवते, हेही लक्षात ठेवावे. काहीवेळेस न पेरलेलेसुद्धा उगवते. पण ते पेरलेले नसते. जनतेने हे ओळखून येत्या 21 तारखेला पक्षाच्या चोचीतून जमिनीवर पडलेले उगवून देऊ नका. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, आम्हाला दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत तुम्ही "मैने एक बार जो कमेटमेंट कर दी, तो मै खुद्द की भी नहीं सुनता" ही दिलेली कमेटमेंट तुम्ही पाळली का? मग आम्ही आमच्यावरुन जीव ओवाळून टाकणारे श्रीनिवास पाटील निवडून आणणार आहोत.
अविनाश मोहिते म्हणाले, मलकापूरच्या माळावर सहकारातील फार मोठा भ्रष्ठाचार उभा राहिला आहे. तो सभासदांच्या मालकीचा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. बाप-लेकाची मस्ती या निवडणुकीत जिरवा, असे आवाहनही त्यांनी केले. राजेंद्र चव्हाण, नामदेव पाटील, मनोहर शिंदे, रघुनाथराव कदम यांची भाषणे झाली. यावेळी विंग, घोगाव व कालवडे येथील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शंकरराव खबाले यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी कराडचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, श्रीकांत मुळे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सदस्या नंदाताई यादव, वैशाली वाघमारे, कराड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पाटील, माजी अध्यक्ष दत्ता पाटील, कृष्णेचे माजी संचालक काशिनाथ गरुड, माणिकराव जाधव, उत्तमराव मोहिते, सरपंच धनाजी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितराव पाटील म्हणाले, विरोधकांची मस्ती जिरवायला ही जनता 24 तारखेला तयार आहे. अतुलबाबा 24 तारखेनंतर तुम्ही सासुरवाडीला जा. तिथंपण काँग्रेसचे दोन आमदार निवडून येणार आहेत. बाबा आणि श्रीनिवास पाटील यांच्याबाबत तुम्ही मस्तीची भाषा करू नका. आम्हाला जी माणसं सांभाळता येत नाहीत. ती तुमच्याकडे आली आहेत. त्यांच्या गळ्यात लोढणा बांधून फिरवा. तुम्हाला कोणी हातात हात दिला तर तुम्ही हात धुता. आणि मागं दोन रुमाल असतात. हे जनता जाणून आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा