कराड उत्तर बाळासाहेब पाटील, कराड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण, पाटण शिवसेना शंभूराज देसाईंचा करिश्मा कायम


कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत विद्यमान आमदारांनी बाजी मारली असुन आपापले गड कायम राखले आहेत. आमदार बाळासाहेब पाटील यांची रौप्यमहोत्सवी लोकप्रतिनिधी म्हणुन जनतेने ४८८५६ मताधिक्यांनी विजयी केले. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी सर्वाधिक मताधिक्य आमदार बाळासाहेब पाटील यांना मिळालेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणुन जनतेने दुसर्‍यांदा संधी दिली आहे. तर पाटणचे आमदार शंभूराज देसाई सलग दुसर्‍यांना निवडून आले आहेत. तर तिसर्‍यांदा शंभूराज देसाई हे शिवसेनेचे आमदार झाले आहेत.

कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले यांनी आव्हान निर्माण केले होते. अतुलबाबा भोसले यांनी सुरुवातीपासून नियोजन चांगले केले.वातावरण चांगले निर्माण करुन मतदार संघ पिंजुन काढला मात्र अतुल भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाची अनेक कारणे आहेत. दरम्यान आम्ही जिकडे गुलाल तिकडे हा फाजील आत्मविश्वास नडला तर आपले जमलेय विजय आपलाच म्हणत खुषमस्करी करणारे वास्तवापासून लांब राहिले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी मुकाबला होता याची जाणीव होती मात्र शेवटच्या क्षणी काही धोरणे फसली. दरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा नेहमी काँग्रेसची पाठराखण करीत आला आहे. सत्ताकाळात पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असणारे सर्व सवंगडी त्यांना सोडून विरोधी पक्षात सामील झाले होते. दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा ऐन निवडणूकीतील जबाबदार्‍या सांभाळल्या आणि विजयश्री खेचून आणून "हमे कुछ कम नही" हे दाखवून दिले.

पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही. कराड नगरपालिकेतील सत्ताधारी गट अतुल भोसले यांच्याकडे तर विरोधातील लोकशाही आघाडीचा गट पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी राहिला. दरम्यान पस्तीस वर्ष कराड दक्षिण मतदारसंघावर अधिराज्य करणारे विलासकाका पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील मात्र या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले यांच्यात लढत झाली. कराड दक्षिण मतदार संघातून पृथ्वीराजबाबा दुसऱयांदा निवडून आले आहेत. कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सुरेश भोसले, माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते यांनी अथक परिश्रम करून अतुल भोसले यांना आमदार करायचेच हा निर्धार केला होता मात्र तो यशस्वी झाला नाही. आमदार आनंदराव पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक मात्र चाळीस वर्षांपूर्वीचा घरोबाला पुर्णविराम या निवडणूकीच्या माध्यमातुन दिला गेला. आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील व मुलगा मानसिंग पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जाहीर प्रचार केला. याचा फारसा परिणाम मतदारांच्यावर झालेला दिसून येत नाही.

कराड उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील हे पाचव्यांदा निवडून आलेले आहेत. कराड दक्षिण व कराड उत्तरमध्ये आघाडी धर्म पाळल्यामुळे या दोन्ही उमेदवारांना एकमेकांची मदत झाली. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा काँग्रेसचा गट कराड उत्तरमध्ये आहे त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना मदत केली. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट कराड शहरासह दक्षिणमध्येही कार्यरत आहे त्यांनी पृथ्वीराजबाबा यांना उघडपणे मदत केली.

कराड उत्तर मतदार संघांमध्येही तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे धैर्यशील कदम व भाजपचे बंडखोर अपक्ष मनोज घोरपडे या तीन उमेदवारांनी या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र कराड उत्तरच्या जनतेने पाचव्यांदा आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी देऊन यशवंत विचारांचा मार्ग स्वीकारला. कराड उत्तर हा यशवंत विचारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कराड दक्षिण प्रमाणे या ठिकाणी आरोपांचा धुरळा उडविला जात नाही, प्रत्येक उमेदवार आपले मुद्दे जनतेसमोर मांडतात आणि जनता शांतपणे विचार करून निर्णय घेते. विरोधी उमेदवारांनी चांगली लढत दिली मात्र मतदारांनी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी देऊन रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून सध्या बाळासाहेब पाटील यांना विजयश्री केले आहे. निवडीनंतर आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ नेहमी यशवंत विचाराची पाठराखण करीत आला आहे. याच विचाराने जनतेने मला पुन्हा एकदा यशवंत विचारानुसार विकास करण्याची संधी दिली असल्याची प्रतिक्रिया दिली.

पाटण विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली कारण गेल्या पाच वर्षांत शंभूराज देसाई यांनी अकराशे कोटी रुपयांचा विकास निधी आणला हे सातत्याने मतदारांना पटवून दिले. केवळ निवडणुकीपुरते जनतेच्या समोर येणाऱ्यांना जनता थारा देणार नाही असा विश्वास सातत्याने व्यक्त करीत विरोधकांच्यावर आगपाखड शंभुराज देसाई करीत होते. पाटण मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास पोचला आहे. लोकांच्या गरजा ओळखून प्रत्येक गावाला आवश्यक निधी दिला आहे, विकास कामे केली आहेत. निवडणुकीच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात तळ ठोकून राहायचे कोणीही आपले गाव सोडून इतर भागांमध्ये जाऊन प्रचाराबाबत लुडबुड करायची नाही हा शंभूराज देसाई यांचा प्रचार करण्याचा फंडा यशस्वी झाला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर यांनी शंभुराज देसाई यांच्या विरोधात दंड थोपटले होते. मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच माझा विजय निश्चित होणार असा विश्वास शंभूराज देसाई यांना होता आणि तो शंभुराज देसाई यांनी सार्थ ठरविला. राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्यापेक्षा १४२२६ मते जादा घेवुन शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी विजयी मिळविला. शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी आपला मतदारसंघ सुरक्षित ठेवला असुन गेल्या पाच वर्षांमध्ये जी विकासकामे केली त्यामुळे त्यांना प्रचंड मताधिक्य मिलाले आहे. पाटणच्या जनतेने विकासाला मत दिले असुन नेहमी जनतेप्रती आदर ठेवुन कार्यरत असल्यामुळे शिवसेनेला विजयी केले आहे. यापुढे विकासनामामधील अधिक गतीने विकास कामे केली जातील, अशी प्रतिक्रिया आमदार शंभुराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

एकंदरीत कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण मतदारसंघांमध्ये पूर्वीच्याच लोकप्रतिनिधींना जनतेने पसंती देवून पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यस्तरावरील नेते असल्यामुळे त्यांना मतदारसंघाबरोबर राज्यातील काँग्रेस पक्षाचे काम पाहावे लागणार आहे. आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शंभूराज देसाई हे आपल्या कार्यक्षेत्रात व्यतिरिक्त शेजारी डुंकून पाहत नसल्यामुळे त्यांना मतदारसंघात पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची संधी मिळाली आहे. या तिघांच्या विरोधात रणशिंग फुंकलेल्या उमेदवारांना आता पुन्हा एकदा नव्या जोमाने मतदारसंघामध्ये काम करावे लागेल. अन्यथा निवडणुकीपुरतेच जनतेसमोर येणारे उमेदवार म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होऊ शकते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.