कराड दक्षिणच्या आणखी विकासासाठी आशीर्वाद द्या : आ. पृथ्वीराज चव्हाण


कराड, (ललक्ष्मीपुत्र) - मी मुख्यमंत्री असताना विरोधी आमदारांची कधीही विकास कामांबाबत अडवणूक केली नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षात मी शिफारस केलेल्या कामांना बाजूला ठेवले गेले नाही. म्हणून मला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींचा विकास करता आला. मतदारसंघातील ही विकासाची घडी आणखी चांगली बसवण्यासाठी मला आशीर्वाद द्या. गावपातळीवरील आप-आपसाधील मतभेद बाजूला ठेवून तुमच्या सर्वांगीण विकासाकरिता श्रीनिवास पाटील आणि मला साथ द्या. असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

तुळसण, विठलवाडी, पाचूपतेवाडी, नांदगाव, पवारवाडी येथे प्रचारार्थ निघालेल्या दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, मी आमदार निधीपेक्षा कितीतरी जादा पटीने विकासकामे आणली. विधानसभेत त्या ताकदीचा प्रतिनिधी असला, तर हे शक्य आहे. कराड दक्षिणेतील जनतेच्या आशीर्वादामुळे मला खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री या पायऱ्या चढता आल्या. हे मी कधीही विसरणार नाही. माझ्याकडून विकासकामांच्या बाबतीत कधीच राजकारण होत नाही. येथूनपुढेही ते होणार नाही. तुम्हीही विकासाबाबत कधीही माझ्याकडे या. त्यासाठी माझी कायम मदत राहील.

ते म्हणाले, या विभागातील जनतेने दबावाला घाबरू नये. तुम्ही कष्टकरी व स्वाभिमानी आहात. दहशत असेल तर मुळीच घाबरू नका. मी सदैव तुमच्याबरोबर आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी देशात व राज्यात मानसिक गुलामगिरी स्वीकारली गेली. केंद्र व राज्यातील सरकारला शेतकऱ्यांचे दुःख माहिती नाही. अर्थव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे देशात मंदी आहे. त्यामुळे देश चालवता येत नाही. 

ते म्हणाले, आपले राज्य पुन्हा पेशवाईच्या हातात गेल्यास स्वातंत्र्यापूर्वीची वर्णाश्रम व्यवस्था यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने मतदान करा. अनेकांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीला ही मंडळी बळी पडली. त्यांचा विचार करू नका. आपण आपले भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीला साथ द्या. यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, पैलवान नानासाहेब पाटील, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, उदय पाटील-उंडाळकर, पैलवान तानाजी चवरे, सर्जेराव शिंदे, कृष्णत थोरात यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.