कराड जिल्हा व्हावा अशी मनस्वी इच्छा असणाऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. कराड तालुक्याचा "कराड" जिल्हा होईल ! आता कराड जिल्हा होणार !


स्वतंत्र कराड जिल्ह्या असावा ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून कराडकर करत आहेत. कराड जिल्हा करताना त्याला लागून असणऱ्या तालुक्यांचा  कराड जिल्ह्यामध्ये  समावेश करावा आणि कराड जिल्हा करावा. अशी वेगवेगळ्या पद्धतीने यापूर्वी मागणी करण्यात आली आहे. तसेच कराड जिल्हा करताना लागूनच असणारे कडेगाव, पलूस, पाटण, वाळवा, शिराळा,  तालुक्यांचा समावेश करता येतो, अशा पद्धतीने शासनस्तरावर प्रयत्न अनेकांनी यापूर्वी केला आहे. दरम्यान याला म्हणावे असे यश आलेले नाही.

वास्तविक पाहता कराड जिल्हा झाला पाहिजे का ? तर नक्कीच कराड जिल्हा झाला पाहिजे ! कारण सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा कराड तालुका आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल देणारा कराड तालुका आहे. त्याचबरोबर कराड तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व कराड दक्षिण विधानसभा मतदार संघचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर लागून असणाऱ्या तालुक्‍यांचा ही विकास सर्वार्थाने करावयाचा असेल तर कराड जिल्हा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कराड जिल्हा करण्यासाठी आपण शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन  विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड येथे पत्रकारांना दिले आहे.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून हॉटेल अलंकार येथे डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराडमधील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अतुल भोसले यांनी कराड जिल्हा करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू अशी हमी दिलेली आहे. विशेषता भारतीय जनता पार्टीचे भूमिकाही छोटे - छोटे राज्य करण्याची आहे. त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार आहे. यामुळे शासनाची भूमिका छोटे-छोटे जिल्हे असावी तशीच आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचा आग्रह अशाच प्रकारचा आहे. मोठ्या जिल्ह्यांपेक्षा छोटे-  छोटे जिल्हे असतील तर विकासाची प्रक्रिया अधिक जलद गतीने होते.

आता कराड जिल्हा होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वार्थाने कराड तालुक्याचा विकास झाला आहे का ? हे पाहताना नक्कीच कराडचा सर्वांगीण विकास झाला आहे आणि विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. यामध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे  त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे काम करणारे पदाधिकारी कराडसाठी विकास निधी आणण्याकरिता कमी पडत नाहीत. पाटण व वाळवा हे दुर्गम डोंगराळ तालुके असल्यामुळे या तालुक्यांचा विकास होण्यासाठी नक्कीच कराड जिल्हा झाला तर सर्वाधिक निधी व लवकर विकासकामे या दोन तालुक्यातील होतील हे निश्चित. सध्याचे लोकप्रतिनिधी या दोन्ही तालुक्यातील तालुक्याचा विकास करण्यासाठी कसोशीचा प्रयत्न करत आहेत.

 सातारा व सांगली जिल्ह्यातील तालुके कराड जिल्ह्यासाठी जोडावयाचे आहेत. त्यांच्यासाठी सातारा व सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण फार दूर अंतरावरचे असल्या कारणास्तव कराड जिल्हा होणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. कराड जिल्हा झाला तर या तालुक्यांना जिल्ह्याचे ठिकाण "कराड" हे जवळचे होईल. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीवेळी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये लातूर जिल्हा केलेला आहे. यासाठी त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती म्हणूनच लातूर जिल्हा झाला. विदर्भ, मराठवाड्यातही यापूर्वी छोटे-छोटे जिल्हे निर्माण झाले आहेत.

आता पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे असणारे "कराड" चा सुद्धा आता जिल्हा होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक राजकीय लोकांनी प्रयत्न केला मात्र, याकडे राजकीय हेतूने पाहिल्यामुळे कराड जिल्हा झाला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. कारण जिल्हा झाल्यानंतर अनेक राजकीय लोकांना ते गैरसोयीचे होणार होते. कारण त्यांच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याकारणास्तव अनेकांनी छुप्या पद्धतीने कराडला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त होऊ नये, यासाठी विरोध केला आहे. अन्यथा यापूर्वीच कराड जिल्हा झाला असता. असो.  झाले ते झाले, आता नव्याने डॉ.अतुल भोसले हे कराड स्वतंत्र जिल्हा व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिल्याने कराड जिल्हा व्हावा अशी मनस्वी इच्छा असणाऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. कराड तालुक्याचा "कराड" जिल्हा होईल अशी आशा करावयास काही हरकत नाही.

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.