शिवसेना - भाजपा युतीबाबत काय होईल ?
आगामी लोकसभा - विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. जे प्रारंभी लोकसभेच्या निवडणुका होतील आणि यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना-भाजपची युती होणार ! याचेही आता संकेत मिळत आहेत. फक्त आता युती होण्याची औपचारिकता बाकी आहे की काय ? असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शिवसेने-भाजप यांच्यात पूर्वीप्रमाणे युती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवलेल्या आहेत. अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही भाजपच्या प्रस्तावाची वाट पाहत नाही. हे ही बरोबर आहे, कारण शिवसेना "अकेले चलोरे" चा नारा पूर्वीपासून देत आहे. यामुळे मैत्रीसाठी शिवसेना हात पुढे करणार नाही. शिवसेनेबरोबर मैत्रीची आवश्यकता व गरज सध्या भारतीय जनता पार्टीला आहे, हे मात्र निश्चित.
लोकसभा आणि विधानसभेच्या जागांसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीमध्ये बोलणी सुरू आहे. अनेक जागांवर त्यांचे एकमत झाले आहे. दरम्यान याच धरतीवर शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर जागा वाटप कशी होईल ? याचीही चर्चा सुरू झालेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये संयुक्त कार्यक्रम होत आहेत. यावेळी "चाय पे चर्चा" बरीच झालेली आहे. यामुळे शिवसेना भाजपा युती होणार हे आता स्पष्ट झालेले आहे. दरम्यान आक्रमक असणारी शिवसेना शांत का झाली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना-भाजप युती होणार असे वातावरण सध्या निर्माण झाले असतानाच. शिवसेना-भाजप युतीच्या या चर्चेमुळे राज्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानाची भर पडलेली आहे.
भाजपच्यासमोर लोकसभेच्या 288 जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा उद्देश असल्याने भारतीय जनता पार्टी मित्रपक्षांना किती जागा देणार ? हा कळीचा मुद्दा आहे. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते व राज्यसभेचे खासदार राऊत यांनी सांगितले की, शिवसेनेने कोणालाही कसलाही प्रस्ताव दिलेला नाही, आम्ही एकट्या निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे आणि पक्षाने तयारी सुरू केली आहे.वास्तविक पाहता संजय राऊत जे बोलतात ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका असते. ते जाहीरपणे मांडतात. "स्वबळाचा नारा" यापूर्वीच शिवसेनेने दिला आहे. कारण सत्तेसाठी वाट्टेल ते करणारी भारतीय जनता पार्टीबरोबर आता मैत्रीपूर्ण संबंध नकोत ! शिवसेना-भाजप युती नको ! अशीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका वारंवार समोर आलेली आहे. भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्यामधील प्रत्येक राजकीय नेता, वेगवेगळी वक्तव्य करत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून युती अभेद्य राहील की नाही अशी राजकीय परिस्थिती होती.
निवडणुका जवळ येतील तशी परिस्थिती वेगळी व चर्चा वेगळी पहावयास मिळत आहे. वास्तविक पाहता युतीची कोणत्याही क्षणी घोषणा होईल असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. याचा अर्थ अंतर्गत शिवसेना-भाजपामध्ये कोठे ना कोठे, कोणत्यातरी स्तरावर चर्चा होत असावी, याशिवाय का जबाबदार मंत्री असे वक्तव्य करत आहे. अन्यथा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि आपल्याला याचा फायदा उठवता यावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उगाचच शिवसेना-भाजप युती होणार असा कांगावा करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना-भाजपा युती होण्याची गरज आहे, असे भारतीय जनता पार्टीला वाटत आहे, कारण गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाबरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी प्रारंभी भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी काडीमोड घेऊन विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखवणे स्वाभाविकच आहे.
सत्तेसाठी वाट्टेल ते करणारी भारतीय जनता पार्टी आहे. असा एक समज सध्या तरी समाज मनामध्ये निर्माण झाला आहे. कारण सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे जे सर्वसामान्य लोकांशी बोलणे, वागणे आहे ते, अहंभाव, सत्तेची गुरमी अशा पद्धतीचे असल्याचे बरीच चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार करता शिवसेनेला बरोबर घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टीला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळणार नाही, मग लोकसभेची निवडणूक असो अथवा विधानसभेची निवडणूक असो याचे गणित भारतीय जनता पार्टीने माडले आहे. यामुळे अनेक वेळेला शिवसेनेपुढे भारतीय जनता पार्टी झुकत आहे. आणि मैत्रीसाठी हात पुढे करत आहे. दरम्यान सत्ता आल्यानंतर शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने जी वागणूक दिली आहे. यामुळे शिवसेना दुखावले आहे. भाजप-शिवसेना महाराष्ट्रात सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर शिवसेना नेहमी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत आहे. हे अनेक कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून व पत्रकार परिषदांमधून स्पष्ट झालेले आहे.
राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात आघाडी करून लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन राजकीय पार्टीचा सदरचा निर्णय पाहता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळ्या निवडणुकीला सामोरे गेल्या तर याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीला होणार ! हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणूनच सध्या तरी भारतीय जनता पार्टीने आपला सत्तेच्या मोहाचा नांगा खाली टाकला आहे. तरीही शिवसेना त्यांना जुमानत नाही हेही सत्य आहे. सध्याची राजकीय परिस्थिती अशी असली तर येणाऱ्या काळामध्ये अनेक घडामोडी घडतील व राजकारणामध्ये कोणीही कोणाचे दीर्घकाळाची शत्रू नसतात किंवा मित्रही नसतात त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गोरख तावरे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा