मलकापूरची नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळणार कोणाला ? भारतीय जनता पार्टी का राष्ट्रीय कांग्रेस पार्टीला मिळणार सत्ता
मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकमेकांवर खरमरीत अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. मलकापूरच्या मतदारांनी दोन्हीकडचे एकमेकावरील आरोप ऐकलेले आहेत. उमेदवारांचे म्हणणे ऐकले आणि आता मतदार राजा मलकापूरचा निर्णय घेणार आहे यामुळे 27 तारखेला मतदान होईल. निकालानंतर मतदार राजाने कोणता निर्णय घेतला हे स्पष्ट होईल. मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक पक्ष चिन्हांवर होत आहे. दोन राजकीय पक्षांमधील सत्तासंघर्ष प्रसार सभांच्या माध्यमातून समोर आला आहे. वास्तविक पाहता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले. एकाने आरोप करायचा दुसऱ्यांनी त्या आरोपाचे खंडन करायचे, असा प्रचाराचा प्रकार या ठिकाणी दिसून आला. दरम्यान वैयक्तिक टीका अनेकांना झोंबली आहे. वैयक्तिक टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र वैयक्तिक टीका टिप्पणीमुळे दुखावल्याने निकालानंतर व्यक्तिगत संबंध सुधारतील का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एक ते नऊ प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. वास्तविक पाहता महिलांना 50 टक्के आरक्षण असताना पन्नास टक्क्यापेक्षा अधिक महिलांना उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेसने दिली आहे. याचा फायदा होतो किंवा नाही हे आता निकालानंतर स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एक ते नऊ प्रभागांमध्ये तुल्यबळ व सक्षम उमेदवार एकमेकाविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. प्रचारामध्ये दोन्ही पक्षाकडील उमेदवारानी प्रत्येक मतदार राजाची प्रत्यक्ष गाठ भेट घेऊन आपण कसे मलकापूरच्या विकासासाठी सक्षम आहोत ! हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता मलकापूर हे शिंदेंचे गाव म्हणून सर्वपरिचित आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे विरुद्ध शिंदे अशा लढत होत असल्याने या लढतीकडे संपूर्ण मलकापूर शहराचे लक्ष लागून राहिलेले आहे.
एक हाती सत्ता काबीज करू ! असा विजय आम्हाला प्राप्त होणार आहे, असे दोन्ही बाजूने सांगण्यात आले आहे. वास्तविक पाहता मलकापूरचा मतदार राजा कोणत्याही एका पक्षाला एक हाती सत्ता देणार का ? प्रत्येक उमेदवार पाहून मतदान करणार ? हा निर्णय त्या त्या प्रभागातील मतदार राजा घेणार आहे. गतकाळातील निवडणुकीमध्ये मनोहर शिंदे यांनी एक हाती सत्ता घेतली होती. विरोधकांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. ही वस्तुस्थिती पाहता गतकाळासारखी सध्या परिस्थिती आहे का ? याचा विचार करता काही प्रभागांमध्ये मोठा संघर्ष दिसून येत आहे. कारण दोन्ही बाजूकडचे उमेदवार सक्षम व सुशिक्षित आहेत. याचा विचार करता असा निकाल लागेल म्हणणे हे धाडसाचे होईल. आपल्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व मतदारांची मती गुंग करण्यासाठी ही राजकीय चर्चा होती अशी राजकीय निरीक्षकांनी मत नोंदवलेले आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी सभा घेऊन काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील या पद्धतीने प्रचारात उडी घेतली होती तर माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते उदयसिंह पाटील, राजाभाऊ पाटील, अजित पाटील चिखलीकर, बंडा नाना जगताप, शिवराज मोरे, प्रदीप पाटील, धनाजी काटकर, जाकिर पठाण, आदिल मोमीन, पंचायत समिती सभापती फरीदा इनामदार यांनी प्रत्येक प्रभागात पदयात्रा काढून काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास मंत्री रणजीत पाटील, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पाशा पटेल यांनी सभा घेऊन केंद्रात - राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तसेच कराडमध्ये नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारलेली आहे. आता मलकापूरमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सत्ता द्यावी म्हणजे मलकापूरचा विकास होईल असे आश्वासन दिले गेले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मलकापूर नगरपरिषदेची सत्ता परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये ज्येष्ठनेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी संपूर्ण मलकापूर शहर पिंजून काढले आहे. त्याचबरोबर कराडच्या नगराध्यक्ष सोहिनी शिंदे, विनायक भोसले, पैलवान आनंदराव मोहिते, महादेव पवार, तानाजी देशमुख हे प्रचारात उमेदवारांच्या बाजूने उतरलेले आहेत.
मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा प्रचार सुरू होता की काय ? अशी काहीशी परिस्थिती दिसून येत होती, कारण मलकापुर नगरपालिकेच्या विकासाबरोबरच कराड दक्षिणच्या विकासाचेही यावेळी सभांमधून चर्चा झालेली आहे. मलकापूर नगरपालिकेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. वास्तविक पाहता मलकापूर नगरपरिषदेची सत्ता टिकवण्यासाठी व सत्ता परिवर्तन करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्यापर्यंत प्रचाराची सीमा आखली गेली पाहिजे होती. दरम्यान घडलेले नाट्य सर्व जनतेसमोर आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर काँग्रेसचे माजीमंत्री व विद्यमान आमदार उतरणे हे स्वाभाविकच होते. राजकारणात सर्वकाही चालते आणि सत्तेसाठी राजकीय पक्ष काहीही करतात, असे बोलले जाते, याचे प्रत्यंतर मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराच्या सभांमधून निदर्शनास आले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष "हम भी कुछ कम नही" या अविर्भावामध्ये असतो आणि याला अपवाद मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक राहिलेली नाही, हे मान्यच करावे लागेल.
मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे दोन्ही पक्षांनी सुशिक्षित, अशिक्षित महिला उमेदवार दिलेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. सारिका प्रशांत गावडे, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने नीलम धनंजय येडगे यांच्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या पदासाठी निवडणूक होत आहे. डॉ. सारिका गावडे व नीलम येडगे या दोन्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाषणांमध्ये मलकापूरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची हमी दिली आहे. वास्तविक पाहता राजकारणामध्ये महिलांची संख्या वाढते आहे. त्याचबरोबर जाहीर सभांमधून भाषण करण्याचा महिलांना बहुदा अनुभव नसतो, दरम्यान मलकापूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवार भाषणांमध्ये तरबेज आहेत. यामुळे मतदार राजा आता डॉ. सारिका गावडे यांना संधी देणारे का? नीलम येडगे यांना नगराध्यक्षपदाच्या खुर्ची बसणार ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सारिका गावडे या व्यवसायाने डॉक्टर आहेत. तर नीलम येडगे या परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. म्हणजेच डॉक्टर आणि परिचारिका यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या अनुषंगाने प्रचारामध्ये डॉक्टरांची भूमिका काय असते आणि परिचारिकांची भूमिका कशी असते, यावर बोलले गेलेले आहे. तेव्हा मलकापूरची जनता डॉक्टरांना नगराध्यक्षपदाची खुर्ची देणार का ? परिचारिकेला मलकापूरवासियांची सेवा करायला संधी देणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा