कराडमधील पत्रकारांसाठी पत्रकार दिनाची कमाई
6 जानेवारी म्हणजे पत्रकार दिन यानिमित्त महाराष्ट्र मध्ये सर्वत्र पत्रकार दिन साजरा केला गेला. या निमित्ताने कराड येथील सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यथोचित सत्कार केला. त्याचबरोबर जागतिक पातळीवर व देशांमध्ये जी सध्या मीडियाची वाटचाल आहे. याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती कराडच्या पत्रकारांना आपल्या ओघवत्या शैलीमध्ये दिली आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांवर कार्पोरेट क्षेत्राचा घाला चिंताजनक आहे असे सांगून त्यांनी जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमांना कशा प्रकारचे स्वातंत्र्य आहे, अथवा एखादी घटना मांडताना प्रसारमाध्यम कोणती काळजी घेतात व कोणत्या प्रकारे ते जनतेसमोर मांडतात. त्याचे उदाहरणासह विश्लेषण केले आहे. कारण प्रसार माध्यम म्हणजे जनतेचे प्रश्न मांडण्याचे आणि न्याय मागण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. ते बदल अनेक माध्यमांनी स्वीकारले आहेत. कोणतेही प्रसारमाध्यम एखाद्या राजकीय पक्षाचे व व्यक्तीच्या दावणीला बांधले गेले नाही पाहीजे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य तिकले पाहिजे आणि निर्भीडपणे प्रश्न मांडून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वातंत्र पूर्वकाळातील पत्रकारिता व स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता आणि आधुनिक काळातील पत्रकारिता असे पत्रकारितेचे तीन विभागांमध्ये विश्लेषण केल्यानंतर यातील बदल लक्षात येतील. केवळ एका माध्यमावर बोलून सर्व माहिती मिळेल असे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील वर्तमानपत्रांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या काळामध्ये फक्त प्रिंट मीडिया उपलब्ध होता. प्रिंट मीडियाद्वारे स्वातंत्र्यासाठी दिलेले लढे याचा विचार करावा लागेल. कारण स्वातंत्रपूर्व काळातील वृत्तपत्रे ही विशिष्ट विचारानी प्रसिद्ध केली जात होती. आपला विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्रपूर्व काळातील वर्तमानपत्रांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रबोधनात्मक चळवळीमुळेच स्वातंत्र्याचा लढा तीव्र झाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले हे कबूल करावे लागेल. स्वातंत्र्यानंतर काही काळ वैचारिक वर्तमानपत्रे निघत होती. वैचारिक वर्तमानपत्र म्हणजे त्या वर्तमानपत्राच्या संपादकाची वैचारिक भूमिका मांडली जात होती. कालांतराने यात बदल झाला आणि संपादकच पगारी नेमू लागल्यामुळे साखळी वर्तमानपत्राचे वर्चस्व दिसू लागले.
दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये व्यावसायिक पत्रकारिता आली. म्हणजे केवळ प्रबोधनच नव्हे तर प्रबोधनाबरोबर आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. आर्थिक फायदा वृत्तपत्राला झाला पाहिजे आणि वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना चांगले मानधन व गलेलठ्ठ पगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न झाला. एका अर्थाने ही चांगलीच सुरुवात झाली होती. पत्रकारांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये चांगला प्रयत्न झाला. पत्रकारितेच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल होते. त्याचबरोबर केंद्र शासनाने आयोग नेमून पत्रकारांना त्या आयोगाप्रमाणे वेतन देण्याचे बंधन वृत्तपत्राच्या व्यवस्थापनावर घातलेले आहे. आजही त्या आयोगानुसार पत्रकारांना पगार देण्याचे केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. दरम्यान सर्वच वर्तमानपत्रांना केंद्र शासनाच्या आयोगानुसार वेतन देणे शक्य नाही. म्हणूनच वर्तमानपत्राची वाटचाल, त्याचे उत्पन्न पाहता केंद्र शासनाच्या आयोगाची अंमलबजावणी सर्व ठिकाणी, सर्व स्तरावर झाली आहे असे दिसून येत नाही. यामुळे वृत्तपत्र व्यवस्थापन त्यांनी यामधील मध्यम मार्ग काढून वेतनापेक्षा मानधनावर अथवा कॉन्ट्रॅक्टरवर पत्रकारांच्या नेमणुका होऊ लागल्या आणि आजही अशा प्रकारच्या नेमणुका वृत्तपत्रांमध्ये होतात आणि असेच कामकाज वृत्तपत्रांचे सुरू आहे.
अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया इतका प्रभावी झाला आहे की, यावर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. दरम्यान मोठ्या वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक मीडियातील वृत्त प्रसारित करणारी मीडिया व साखळी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनावर सरकारचा दबाव असतो. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडच्या पत्रकारांना सांगितलेले आहे.सरकारचे नियंत्रण माध्यमांच्यावर असावे का ? हा चर्चेचा विषय आहे. दरम्यान माध्यमांच्यावर सरकारचे नियंत्रण हवे, त्यासाठी आचारसंहिताही हवी मात्र, सरकारचा दबाव असता उपयोगाचा नाही. कारण हे लोकशाहीला मारक आहे. विद्यमान सरकारच्या विरोधात प्रसार माध्यमे काम करू लागली की त्यांच्यावर दबाव आणला जातो. हे लोकशाहीसाठी चांगली बाब म्हणता येणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्यही आहे. मात्र सरकारने मुस्कटदाबी करता उपयोगाचे नाही.
प्रसारमाध्यमे ही सरकार व जनतेमधील दुवा आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये सरकारच्या विरोधात काही वृत्त दिले म्हणजे त्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर दबाव आणून काहीही उपयोग होणार नाही. पत्रकार दिनाचे औचित्य साधून कराडमध्ये पत्रकारांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून वृत्तपत्रसृष्टीबद्दल महाराष्ट्र राज्यात, भारतात व जगामध्ये काय घडामोडी सुरू आहेत. याबाबत इत्थंभूत माहिती मिळाली ही आजच्या पत्रकार दिनाची कमाई म्हणता येईल. प्रसार माध्यमांची दिशा व दशा कशाप्रकारचे आहे. याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले विवेचन पत्रकारांना केवळ मार्गदर्शनच नव्हे तर आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
गोरख तावरे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा