चौथास्तंभ कोणता ?
लोकशाहीचा चौथास्तंभ अधिक सक्षम झाला की कमकुवत झाला ? यावर चर्चा होणे आवश्यक आहे. दरम्यान लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून नक्की कुणाला संबोधायचे ? प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया की सोशल मीडिया ? हा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता वृत्तपत्रांचे माध्यम अलीकडच्या काळामध्ये बदलते आहे. प्रिंटिंग वृत्तपत्रांबरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियाचा प्रभाव वाढत आहे. प्रसार माध्यमांची गतिमान बदलांचा स्वीकार समाजमन करीत आहे. लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून मीडियाचा वारंवार उल्लेख होत असतो, वास्तविक पाहता कायद्यान्वये घटनेमध्ये अधिकार प्राप्त झालेला नाही.
लोकशाहीमधील इतर जे तीन स्तंभ आहेत, त्यांना घटनेच्या कक्षेमध्ये अनेक अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. दरम्यान मीडिया हा लोकांचे मत व्यक्त होणारा चौथास्तंभ म्हणून लोकशाहीचा चौथास्तंभ मीडियाला संबोधले जात आहे. काळानुरूप माध्यमांमध्ये अनेक बदल होत आहेत हे बदल प्रत्येक माध्यम स्वीकारीत आहे. वृत्तपत्र हे प्रिंटिंग मीडिया माध्यम आहे, यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रिंटिंग करण्याचे तंत्रज्ञान बदलले आहे, लाखो प्रती छापण्याचा छपाई मशीन बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियामुळे प्रिंट मिडिया आपली वृत्तपत्रेच सोशल मीडियावर त्याच पद्धतीने वाचकांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक घटनेचे वृत्त स्वतंत्रपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळातील माध्यमे आणि स्वातंत्र्यानंतरची माध्यमे याचा विचार करता, स्वातंत्र्यानंतरच्या माध्यमांमध्ये गतिमान बदल झालेले आहेत आणि ते बदल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्वांनी स्वीकारलेले आहेत. त्याचबरोबर नवीन माध्यमांचा सक्षमपणे स्वीकार केला जात आहे. यामुळे लोकशाही बळकट होण्यास अधिक मदत होत आहे. परंतु याचवेळी या माध्यमांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होतो, अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत, वास्तविक पाहता सुरुवातीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया होते, त्यावेळी पिवळी पत्रकारिता करणाऱ्यांची काही प्रमाणात संख्या होती, पिवळी म्हणजेच पित्त पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या आज ही आहे. हे नाकारून चालणार नाही. माध्यमांचा गैरवापर करून समाजात व समाजमन हेलावण्याचा प्रयत्न होणार्या अनेक घटना महाराष्ट्रभर घडत आहेत व त्या समोर येत आहेत. समाजमनाला एक सकारात्मक दिशा देण्याचे काम माध्यमांचे आहे, ते इमानेइतबारे करणारी माध्यमे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये आहेत. दरम्यान या माध्यमांचा गैरफायदा घेऊन समाजामध्ये व समाजमन दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा घटनाही समोर येत आहेत.
लोकशाही अधिक बळकट करावयाची असेल तर माध्यमांमध्ये सकारात्मक काम करणाऱ्या प्रतिनिधींची संख्या अधिक असणे आवश्यक आहे. नकारात्मक गोष्टींना प्राधान्य देऊन समाजमन दुखावणार असेल, समाजामध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण होणार असेल, तर नक्कीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी एक भीती व्यक्त करत असत, समाजासमोर सकारात्मक विचार आला नाही तर देशांमध्ये अराजकता माजेल असे ते नेहमी म्हणायचे. सत्ता राजकारणामध्ये सोशल मीडियाचा अलीकडच्या काळामध्ये वापर पाहिला तर माध्यमे लोकशाहीचा चौथास्तंभ आहेत का ? याचा शोध घ्यावा लागेल. कारण प्रत्येक राजकीय पक्ष सोशल मीडियाचा आपल्या सोयीने अर्थ लावून समाजमनामध्ये विविध विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्धा बाबत टीकाटिप्पणी केली जाते, त्याला कोणतीही मर्यादा व परिसीमा नाही, यामुळे सोशल मीडियाला माध्यम म्हणायचे की नाही याचा विचार झाला पाहिजे.
माध्यमांमध्ये अधिक बदल झाले ते असे, प्रारंभीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता सोशल मीडिया असे मीडियाचे प्रकार पाहता, विश्वास प्राप्त असणारी मीडिया म्हणून आजही प्रिंटमीडियाकडे पाहिले जात आहे. कारण ते दीर्घकाळ टिकणारे एकमेव माध्यम आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियामध्ये व्यक्त झालेले विचार काही क्षणात, काही काळानंतर नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे प्रिंट मीडियाद्वारे प्रकट होणारे, व्यक्त झालेले विचार दीर्घकालीन स्मरणात राहतात, ते उपयोगी असतात. राजकीय लोकांनी यापूर्वीच प्रिंटमिडियामध्ये पदार्पण केले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाही राजकीय लोकांच्या हातात आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियासाठी स्वतंत्र वॉर रूम करून राजकीय पक्ष त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून नक्की कोणती मीडिया याबाबत प्रबोधन होणे व आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र "दर्पण" नावाने सुरू केले. मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ सहा जानेवारीला रोवले गेले आणि यानंतर वृत्तपत्रांची मालिका सुरू झाली ती आजतागायत तशीच सुरू आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना दर्पणकार यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात येते, तर महाराष्ट्र शासनाच्यावतीने दर्पणकार यांना आदरांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांना जाहिराती दिला जात आहेत. हिंदुस्थान हा लोकशाही प्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे काम वृत्तपत्राने केले आहे. ते स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये वृत्तपत्रांची भूमिका व वैचारिक प्रबोधन अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. हे सातत्याने समाजासमोर येत आहे, यामुळे आधुनिक युगात व एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रांचे महत्त्व कमी झालेले नाही तर दिवसेंदिवस वर्तमानपत्र विक्रीचा आकडा वाढतोच आहे.
कागद, शाई व प्रिंटिंग छपाईचा खर्च वाढत असला तरी, अल्प दरामध्ये वाचकांना वृत्तपत्र देण्यासाठी वृत्तपत्रांचे मालक प्रयत्न करतात. कारण प्रबोधनाची चळवळ चालू राहिली पाहिजे, हा एकमेव उद्देश ठेवून वृत्तपत्र चालवले जातात. व्यावसायिक दृष्टिकोनातून वृत्तपत्र चालवले जात नाहीत. त्यामुळे वृत्तपत्रांचा समावेश सेवा उद्योगामध्ये करून राज्य व केंद्र शासनाने वृत्तपत्रांना सर्वस्तरात आवश्यक असणारी मदत केली पाहिजे. केवळ जाहिरात देऊन वर्तमानपत्रे जगतील असे नाही, तर वृत्तपत्रे जगण्यासाठी वृत्तपत्रांना आवश्यक असणारी यंत्रसामग्रीसाठी आवश्यक आर्थिक मदत केली पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सर्वश्रुत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करायची असेल, तर वृत्तपत्रे जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, समाजापर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी शासनस्तरावर त्यांना मदत झालीच पाहिजे. अशी भूमिका छोट्या व मध्यम वृत्तपत्रांची तर आहेच. त्याचबरोबर मोठ्या साखळी वर्तमानपत्रांना देखील राज्य शासनाकडून मदत दिली गेली आहे. त्याच पद्धतीची मदत छोट्या व मध्यम वृत्तपत्रांना करणे आवश्यक आहे. देशाची व राज्याची जडणघडण सक्षमपणे, प्रबोधनात्मक व वैचारिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर वर्तमानपत्रांची अत्यंत गरज आहे. हे ओळखून वर्तमानपत्रांना सुविधा व आर्थिक मदत केली गेली पाहिजे
# गोरख तावरे
अध्यक्ष
प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा