स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत उपोषणाला बसलेल्या पंचायत समिती सदस्यांना न्याय मिळावा
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया घातला आणि सत्तेचे केंद्रीकरण झाले होते, त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाजातील सामान्य लोकांना सत्तेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे, समाजातील सामान्य लोक सत्तेमध्ये सहभागी झाला पाहिजेत, समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून वावरता आले पाहिजे, यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि एक हाती असणारी सत्ता सर्वांना समप्रमाणात मिळावी यासाठी केलेला प्रयत्न स्तुत्य असा होता.
सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे समाजातील अनेक घटक सत्तेपासून लांब होते, त्यांना सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि विकासाचा महामेरू सर्वत्र उधळू लागला. केवळ विशिष्ट समाजानेच सत्ता उपभोगायची आणि इतरांनी पाहत राहायची ही परिस्थिती राहिली नाही. लोकशाहीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामुळे अनेक छोटे-छोटे लोकप्रतिनिधी आपापल्या गावापुरते, आपल्या विभागातील काम करू लागले, स्थानिक स्वराज्य संस्थामुळे विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होऊ लागले आणि विकासाची कामे सुचवण्यात संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी सहभाग घेऊ लागले.
स्थानिक स्वराज्य संस्थामुळेच अनेक शहरांचा सर्वांगीण विकास झाला, विकासाची गंगा वाहू लागली आणि दर्जेदार व दर्जात्मक कामे होण्यास मदत झाली, याचे उदाहरण द्यायचे झाले तर कराड नगरपरिषदेमध्ये आदरणीय स्वर्गीय पी डी पाटीलसाहेब यांनी केलेली कामे पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कराडचा सर्वांगीण विकास झाला आहे, मान्य करावे लागेल. वास्तविक पाहता यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच आदरणीय स्वर्गीय पी डी पाटीलसाहेब यांनी कराड शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. राजकारण केवळ निवडणुकांपुरतेच त्यांनी केले आणि इतर वेळी केवळ शहराचा विकास करण्यासाठी आदरणीय पी डी पाटीलसाहेब यांनी दिलेले योगदान कोणालाही, केव्हाही, विसरता येणार नाही, कारण सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे असा इतिहास आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी घडविलेला आहे.
यशवंतराव चव्हाण यांचे खरे वारसदार म्हणून आदरणीय स्वर्गीय पी डी पाटीलसाहेब यांच्या कुटुंबाकडे महाराष्ट्र आदराने पाहतो आहे. कारण आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार सातत्याने समाजासमोर ठेवण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी कुटुंबीयांचे सुरू असलेले काम इतरांपेक्षा सरस व दर्जेदार आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या परिसरांमध्ये महाराष्ट्रातील पंचायत समिती सभापती, उपसभापती व पंचायत समिती सदस्य त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन, या पंचायत समिती सदस्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया घातला ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत पंचायत समितीमध्ये असणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या हक्कासाठी बसले आहेत.याचा विचार करून सध्याच्या विद्यमान सरकारने याबाबत लक्ष घालून सदरचे प्रश्न सोडवावेत, अशी लोक भावना निर्माण होऊ लागले आहे.
वित्त आयोगामुळे पंचायत समिती सदस्यांना मिळणारा विकास निधी पूर्ण बंद झाला आहे. तेव्हा सदरचा निधी पूर्ववत पंचायत समिती सदस्यांना मिळालाच पाहिजे ही त्यांची एक आग्रहाची मागणी आहे. प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक यांच्या बदलीचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे पंचायत समिती सदस्य हे केवळ नामधारीच राहिले आहेत. विदर्भ ,मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पंचायत समितीमधील सर्वपक्षीय सदस्य या आंदोलनात सहभागी झाले आहेत. वास्तविक पाहता सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे युती सरकार आहे. आणि कराड येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय सदस्य सहभागी झाले आहेत. कारण केवळ एका पक्षाचा हा विषय राहिला नसून पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना समान अधिकार आहेत आणि ते सर्वांना मिळाले पाहिजेत, यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी कराड येथे आंदोलन सुरू केले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाला यश यावे, पंचायत समिती सदस्यांना हवे असणारे हक्क मिळावेत, म्हणजेच खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचा आलेख उंचावत राहो ! अशी आशा करायला हरकत नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा