सुखी जीवनाचा मार्गक्रमणासाठी अध्यात्मिक वाचनाची गरज


सांसारिक दुःखांनी अनेक जण व्यथित होत असतात संसारिक जीवनामध्ये सुखाबरोबर दुःखाला ही सामोरे जावे लागते हाच जीवनाचा सारांश आहे. सदा सर्वकाळ संसारिक जीवनामध्ये एक सारखी परिस्थिती राहत नाही. दरम्यान संसारिक जीवनामध्ये सुख - दु:ख अनुभवून परिपक्व जीवन जगणे त्यालाच जीवनाचा परिपूर्ण अर्थ समजला असे म्हणावे लागेल. सांसारिक व्यक्तींच्या हृदयाचा ताप कसा व कोणी दूर करेल यासाठी विचारमंथन झाले पाहिजे कारण प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये दुःखापेक्षा सुखाची अपेक्षा असते.

त्याचबरोबर संसारिक जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग कोणालाच नको असतात दरम्यान ओघाने असे प्रसंग येतात त्याला मन घट्ट करून सामोरे गेले पाहिजे. संसारिक जीवनातील दुःख दूर करण्यासाठी आणि शाश्वत सुखाच्या शोधात निगम असलेल्या परमार्थ मार्गाचा अवलंब करणाच्या पथिकांना मार्गदर्शन करण्यासाठी अध्यात्मिक मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. अध्यात्मिक मनशांती व सुखशांती मिळविण्यासाठी सोपा व सरळ साधा मार्ग आहे. या मार्गाने गेल्यास जीवनातील सुख म्हणजे काय ? जीवनातील दुःख म्हणजे काय ? हे कळते महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून सर्वश्रुत आहे. अनेक संत - महंत व आध्यात्मिक गुरूंनी सांसारिक जीवनातील सुखाचे गमक सांगितले आहे. त्याचबरोबर दुःखाचे प्रसंग कसे येतात व त्यावर मात कशी करावी ? याबद्दल विवेचन केले आहे.

म्हणूनच संत साहित्य संसारिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विविध विचारसरणीच्या संतानी अमृतमय वाणीतून प्रबोधन केले आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून समूहाने राहणारा मनुष्य हा कालांतराने बदलत गेला मात्र, अंतर्मनातील घालमेल व सुख - दुःख यामध्ये काडीचाही फरक झाला नाही. भौतिक प्रगती केली गेली. आधुनिक साधनांचा वापर केला. नवनवीन शोध लावले मात्र, अंतर्मनातील सुख दुःखावर विज्ञानाने प्रगती केली का ? याचा विचार करता विज्ञानाने अंतर्मनातील सुख - दुःखावर मात करण्यासाठी कुठलीही यंत्रणा, नवनिर्मिती केली नाही हे निदर्शनास येते. दरम्यान जीवनामध्ये सुख व दुःख म्हणजे काय ? सुख - दुःखावर मात कशी करावी ?यासाठी अध्यात्मिक मार्गाशिवाय दुसरा मार्गच असू शकत नाही.अध्यात्मिक अमृतबिंदुचे सेवन केल्यानंतर काही प्रमाणात जीवनातील दुःख कमी होईल हे मात्र निश्चित.

अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करणे म्हणजे एकाएका बिंदुमध्ये जणू अथांग समुद्र सामावलेला आहे. याठिकाणी अथांग सागराची उपमा देण्यामागचा हेतू असा आहे की, प्रत्येक मनुष्याचा अंतर्मनाचा थांगपत्ता अद्यापपर्यंत कोणालाच लागलेला नाही. कारण मनुष्याच्या अंतर्मनामध्ये चालू असणाऱ्या घडामोडींचा बाहेरील म्हणजेच बाह्य स्वरूपातील देखाव्यातून अंतर्मनातील गोष्टी कळतील असे नाही. लहान-लहान गोष्टीतसुद्धा खूप विशेष अर्थ भरलेला असतो. म्हणूनच अध्यात्मिक पुस्तकांमध्ये विशद केलेल्या छोट्यामोठ्या गोष्टींमधून जीवनाचे सुख-दुःख ओळखता आले पाहिजे आणि सुखाने, समाधानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान संपादन केले पाहिजे. यासाठी अध्यात्मिक पुस्तकांचे म्हणजे संत साहित्याचे वाचन सर्वस्तरात, सर्व वयोगटातमध्ये झाले पाहिजे.

म्हणजेच दुःखाच्या प्रसंगाच्यावेळी त्याला कसे सामोरे जायचे याचे आत्मबळ वाढेल. अध्यात्मिक व संत साहित्य सर्वासाठी उपयोगी आहे आणि सर्व काळात उपयोगी आहेत. त्याचा यथा अवकाश का होईना प्रत्येकाने केव्हा तरी विचार केला पाहिजे आणि अध्यात्मज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. जीवनाचा सुखद अनुभव अनुभवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची जोपासणा करूया, संत साहित्याचे वाचन करूया, आणि सुखी जीवनाचा मूलमंत्र समजावून घेऊया, म्हणजे जीवनामध्ये दुःखाच्या प्रसंगांमध्ये मन नैराश्यग्रस्त होणार नाही याची दक्षता घेऊ या. जीवनामध्ये ज्ञान संपादन केल्याने प्रगल्भता वाढते, त्याचबरोबर वाचन करताना ते कोणत्या प्रकारचे करावे यालाही महत्त्व आहे. सुखकारक, समाधानाने, आनंदमय, उत्साहपूर्ण जीवन जगायचे असेल तर संत साहित्य व अध्यात्मिक मार्गाशिवाय इतर मार्ग मनुष्याला जीवनाचा मतितार्थ कळेल असे नाही. श्रद्धापूर्वक अध्ययन केल्यानंतर निश्चितच सुख मिळेल मात्र, अध्यात्माची कास धरताना अंधश्रद्धेचा लवलेशही मनामध्ये येता उपयोगाचा नाही.

गोरख तावरे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.