मलकापूर नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू
कराडला लागून असणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून 27 जानेवारी रोजी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण विरोधात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांचे गट एकमेका विरुद्ध दंड थोपटून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट काँग्रेसच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक मैदानात उतरला आहे. तर डॉ. अतुल भोसले यांचा गट भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. परस्पर विरोधी दोन्ही राजकीय पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभाच्या सभा संपन्न झाल्या आहेत. या सभांमध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत. नगरपंचायतीची नगरपरिषद होण्यावरून दोन्ही गटांमध्ये श्रेयवादाचे राजकारण यापूर्वीच गाजले होते. दरम्यान आता नगरपरिषदेची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष दिसून येत आहे.
आमदार पृथ्वीराज चव्हाण केंद्रामध्ये मंत्री असल्यापासून मलकापूर ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदेला आपल्यापरीने विकास निधी देत आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मनोहर शिंदे यांनी मलकापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. मलकापूर वासियांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी मनोहर शिंदे यांनी शासनस्तरावर निधी उपलब्ध करून अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत.यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार आनंदराव पाटील नेहमी मनोहर शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने मनोहर शिंदे मलकापूरचा विकास करू शकले आहेत. मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत याठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या, प्रत्येक निवडणुकीवेळी मनोहर शिंदे यांच्याबरोबर स्थानिक वेगवेगळा गट त्यांच्यासोबत होता. सुरुवातीला आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट, यानंतर डॉ. अतुल भोसले व मनोहर शिंदे यांनी एकत्र निवडणूक लढवली तर आता मनोहर शिंदे यांच्याबरोबर माजी मंत्री विलासकाका पाटील यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील हे मनोहर शिंदे यांच्या बाजूने निवडणूक प्रचारात उतरले आहेत.
दरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टीच्यावतीने मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार उभे केले आहेत. वास्तविक पाहता यापूर्वी जे कार्यकर्ते आमदार बाळासाहेब पाटील गटाचे व माजी मंत्री विलासकाका पाटील गटाचे होते, ते आता डॉ. अतुल भोसले यांच्या भाजपाकडून निवडणूक मैदानात उमेदवारी घेऊन उतरले आहेत. केंद्रात, राज्यात भाजपचेच सरकार असल्यामुळे गतकाळातील कराड नगरपरिषदेमध्ये डॉ. अतुल भोसले यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार रोहिणी शिंदे यांना निवडून आणले, याचा संदर्भ देत आता मलकापूरच्या नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होणार ! असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. म्हणजेच नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया यावेळीही मलकापूरमध्ये डॉ. अतुल भोसले करून दाखवणार आहेत. तर अतुल भोसले यांचा गट शेतीमित्र अशोकराव थोरात सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, मदनराव मोहिते निवडणूक प्रचारात उतरले आहेत. यामुळे निवडणूक प्रचारादरम्यानच्या सभा चांगल्याच प्रकारच्या गाजणार असे चित्र दिसत आहे.
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 9 प्रभागांमध्ये एकूण उमेदवार 19 निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी एक ते आठ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये तीन उमेदवार निवडले जाणार आहेत. मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या 18,650 आहे. हे मतदार मलकापूरची सत्ता कोणाला द्यायची हे ठरविणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवड जनतेतून केली जाणार आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटातर्फे नगराध्यक्ष उमेदवार डॉ. सारिका प्रशांत गावडे निवडणूक मैदानांमध्ये आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीलम धनंजय येडगे या आहेत. वास्तविक पाहता मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची व प्रतिष्ठेची असल्याकारणास्तव प्रत्येक प्रभागांमध्ये अटीतटीची निवडणूक पहावयास मिळते आहे.
मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांनी जोरदारपणे सुरुवात केली आहे. तर आपली सत्ता टिकावी यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावतीने मनोहर शिंदे कसोशीचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान मलकापूर नगरपरिषदेची सत्ता कोणाच्या ताब्यात देणार ! याबाबत उलट सुलट खमंगदार चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत विकासाचा गाडा आम्ही सकारात्मक दृष्टीने चालविला आहे. यामुळे मलकापूरची जनता सत्ता आम्हालाच देणार असा आत्मविश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला आहेत. तर यावेळी मलकापूर नगरपरिषदेमध्ये परिवर्तन अटळ आहे असा आशावाद डॉ. अतुल भोसले गटातर्फे व्यक्त केला जात आहे. ९ प्रभागांमध्ये दोन्ही गटांतर्फे दिलेले उमेदवार हे सक्षम व कार्यक्षम असल्याने, प्रत्येक प्रभागांमध्ये अटीतटीची व संघर्षमय निवडणूक होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवारानी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर देवून, आम्ही कशाप्रकारे काम करणार हे मतदारांना पटवून देण्यास सुरुवात केली आहे.
मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. प्रचार शुभारंभ आणि प्रचारा दरम्यान नगरपरिषदेच्या एकूण कामकाजाबद्दल बोलले जात असतानाच याचवेळी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघांमध्ये आम्ही काय केले व काय करणार याचाही लेखाजोखा मांडला जात आहे. कराड दक्षिण मतदार संघांमध्ये प्रत्येक गावांमध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण विकासांच्या कामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मलकापूर नगरपरिषद निवडणूकीबरोबर कराड दक्षिण ही आम्हीच जिंकणार ! असा आत्मविश्वास डॉ. अतुल भोसले व्यक्त करीत आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अथवा दक्षिण मतदार संघात कोठलीही निवडणूक असली की, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचा विषय हा सातत्याने पुढे येत असतो. स्व. यशवंतराव मोहिते, माजी मंत्री विलासकाका पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांनी यापूर्वी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा जनतेच्या पैशातून निर्माण झाल्यामुळे, तो जनतेच्या मालकीचा करावा अशी मागणी सातत्याने केली आहे. दरम्यान याला समर्पक उत्तर व याबाबतचा खुलासा डॉ. सुरेश भोसले यांनी केला आहे. कृष्णा हॉस्पिटलमुळे मलकापूरला केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे. सर्वसामान्यांना सेवा देणे हा कृष्णा हॉस्पिटलचा उद्देश असून, गेल्या वर्षभरात सुमारे 10,000 जणांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. मलकापूरातील असंख्य लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. वास्तविक मलकापूरात सर्वाधिक कर भरणारी संस्था म्हणून कृष्णा समूहाची शासनदप्तरी नोंद आहे. वैयक्तिक आकसातून टीका करणार्या विरोधकांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही असा खुलासा डॉ. सुरेश भोसले यांनी केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा