शिवम प्रतिष्ठानचे गेले अठरा वर्षांपासून सुरू असणारे प्रबोधन चळवळीचा लोकजागर, युवा संमेलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसे पोहोचले पोचले ? प्रबोधनाची चळवळ अविरत कशी सुरू राहिली !



शिवम प्रतिष्ठानच्या प्रबोधन चळवळीला आज भेट देण्याचा योग आला. नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कराड अध्यक्ष सुधीर एकांडे, माजी नगरसेवक श्रीश पेंढारकर आणि मी स्वतः घारेवाडी येथील शिवम प्रतिष्ठान आयोजित केलेल्या संमेलना ठिकाणी जाऊन भेट देवून आलो, जे पाहिले, त्याचा लेखाजोखा, शब्दात प्रकट करण्याचा केलेला प्रयत्न. तुम्हाला केव्हा ना, केव्हा तरी, शिवम प्रतिष्ठानच्या या संमेलनस्थळी जावे अशी मनस्वी इच्छा होईल. प्रतिष्ठानने उभे केलेल्या अप्रतिम, सुंदर व प्रोत्साहनात्मक, रचनात्मक ठिकाणी भेट द्यावे, अशी इच्छा प्रकट कराल, हे नक्कीच.

घारेवाडी (ता. कराड) येथे गेल्या अठरा वर्षांपासून रुदय युवा संमेलन सुरू आहे. ते अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शिवम प्रतिष्ठाने अथक परिश्रम घेतले आहेत. त्याचबरोबर वैचारिक प्रबोधन व्हावे, यासाठी शिवम प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. यासाठी राबणारे अनेक हात आहे. या हाताना समाजाने सलामच केला पाहिजे. धुळोबाच्या डोंगरात शिवम प्रतिष्ठानने उभे केलेले काम महाराष्ट्रासाठी आदर्शवत असेच आहे. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात युवकवर्ग या ठिकाणी या संमेलनात सहभागी होत असतात आणि वैचारिक खुराक घेऊन आपापल्या गावी जातात आणि आपल्या परीने आपल्या परिसरात प्रबोधनाचे काम करतात. गेल्या 18 वर्षांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख वक्त्यांनी हजेरी लावून प्रबोधनाची चळवळ गतिमान करण्यासाठी योगदान दिले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक वक्ता असा नाही की, या डोंगरदऱ्यात येऊन त्याने युवकांना प्रबोधनाची वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

शिवम प्रतिष्ठानसाठी झटणारे हजारो हात आहेत. त्याचबरोबर शिवम प्रतिष्ठानने याठिकाणी लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय निर्माण केले आहे. या ग्रंथालयांमध्ये निवासी विद्यार्थी असतात. सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी या ठिकाणी मुक्काम करून अभ्यासाची तयारी करीत असतात आणि हे विद्यार्थी परीक्षांमध्ये नेत्रदीपक व सुयश मिळवतात, हे शिवम प्रतिष्ठानचे यश आहे. स्पर्धा परीक्षांसाठी हवे असणारे शैक्षणिक वातावरण व शांतता या ठिकाणी शिवम प्रतिष्ठानने उभा केलेल्या अभ्यास शाखेमध्ये निश्चित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आधुनिक उपकरणांची गरज आहे, तेही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. युवकांसाठी आयोजित केले जाणारे संमेलन हा केवळ उत्सव नाही, तर या संमेलनांमधून वैचारिक प्रबोधन करण्याची परंपरा घालून दिलेली आहे. याचा विचार नक्कीच समाजाने केला पाहिजे आणि शिवम प्रतिष्ठानला मदतीसाठी हात पुढे केला पाहिजे.

वास्तविक पाहता शिवम प्रतिष्ठान आपल्या परीने शक्य तेवढे प्रबोधनाचे काम करीत आहे. सशक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी सुरू असलेली ही मोहीम समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर सशक्त भारत निर्माण होण्यासाठी युवावर्गामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली जात आहे. या उपक्रमाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विशेषता युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते. आजच्या युवकांना दिशादर्शक असणारा शिवम प्रतिष्ठानचे रुदय युवा संमेलन अत्यंत महत्त्वाचे आहे, हे या ठिकाणी नमूद करावे लागेल. महाराष्ट्रातून या ठिकाणी येणाऱ्या युवकांना तेवढयाच ताकदीचे वक्ते व समाज प्रबोधनाची चळवळ चालविणारे मान्यवर मार्गदर्शन करीत असतात.

बाबा आमटे यांचे काम पहा, नाना पाटेकर यांचे आवाहन

अभिनेते नाना पाटेकर यांनी युवकांना केलेले आवाहन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगायच कशासाठी हे अनेकांना माहिती नाही. मला खुप काय करायचाय मात्र काय करायचाय हेच तरुणाईला माहिती नाही. अशी खंत व्यक्त करून अभिनेते नाना पाटेकर यांनी तरुणांनी काय केले पाहिजे, हे सांगताना नाना पाटेकर म्हणाले, बाबा आमटे यांनी होते नव्हते त्या सर्वांचा त्याग करुन आनंदवनच्या माध्यमातुन समाजसेवा सुरु केली. तरुणांनी जीवन का जगावं हे हेमलकसाला जावुन आमटे कुटुंबीयांकडुन शिकले पाहिजे. समाजाला आज त्याची नितांत गरज आहे वास्तविक पाहता नाना पाटेकर यांनी सांगितलेले वास्तव महाराष्ट्रातील तरुणांनी एकदा अनुभवले पाहिजे आणि बाबा आमटे यांनी उभे केलेले सामाजिक काम या ठिकाणी भेट देऊन ते पाहिले पाहिजे हे निश्चित. हेमलकसाला जाऊन एकदा बाबा आमटे त्यांचे काम पाहून असा निर्धार महाराष्ट्रातून आलेले युवकांनी केलेला आहे. घारेवाडी सारख्या छोट्या गावातून चांगला विचार घेऊन युवावर्ग गेले आहेत. हेच शिवम प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संमेलनाचे यशस्विता म्हणता येईल.

डॉ. शंतनूकुलकर्णी यांचे प्रबोधनाची चळवळ

शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेले शिवम प्रतिष्ठान आणि इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार येथे चालणारे समाजोपयोगी काम वाखाणण्याजोगेच आहे. त्याचे कौतुकही समाजातून सर्वस्तरातून होत आहे. शंतनू कुलकर्णी हे व्यवसायाने डॉक्टर आहेत.असले वैद्यकीय व्यवसाय करून अमाप संपत्ती मिळवण्यापेक्षा समाजाचे व विशेषतः युवा वर्गाचे योग्य प्रबोधन व्हावे, त्यांना योग्य मार्ग दाखवावा, या उद्देशाने शिवम प्रतिष्ठान राबवत असलेले उपक्रम समाजाच्या हिताचेच आहेत. निस्वार्थी व समाज हिताचे दृष्टिकोनातून शंतनू कुलकर्णी यांचे काम इतरांपेक्षा वरचढ आहे, असे म्हणावे लागेल. प्रबोधनाचा जागर गेले अठरा वर्ष शंतनू कुलकर्णी अविरतपणे घालत आहेत हे विशेष.

विजय वाटेगावकर यांचा घारेवाडीचा ऋणानुबंध


घारेवाडीचे आराध्य दैवत म्हणजे "धुळोबा" डोंगरावर असणारे धुळोबा देवाचे आम्ही चौघांनी मिळून दर्शन घेतले. धुळोबा देव हा डोंगरांमध्ये होता अलीकडेच इथे नवीन बांधकाम करण्यात आले आहे. विजय वाटेगावकर लहानपणी धुळोबा देवाच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी डोंगरावर केवळ देवाचे स्थानच होते. अलीकडे झालेला बदल पाहून विजय वाटेगावकर भारावलेले होते. धुळोबा देवाच्या दर्शन, घारेवाडी आणि विजय वाटेगावकर यांचा ऋणानुबंध कसा आहे, तो त्यांनी आवर्जून थोडक्यात सांगितला. वाटेगावकर कुटुंबीयांचा आणि घारे कुटुंबांचा असणारा घरोबा, ऋणानुबंधही विजय वाटेगावकर यांनी मनामध्ये जपून ठेवला आहे.

श्रीश पेंढारकर यांचा वृक्षाबाबत अभ्यास


श्रीश पेंढारकर यांचा झाडांबाबत अभ्यास आहे. हे मला या ठिकाणी जाणवले, कारण घारेवाडीच्या डोंगरांमध्ये असणारी चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हे त्यांनी अनेक झाडांकडे निर्देश करून सांगितले. ज्या ठिकाणी चंदनाची झाडे असतात तिथे मुबलकता, प्रसन्नता, सकारात्मक वातावरण असते असे पेंढारकर यांनी आवर्जून सांगितले. मुळातच घारेवाडीच्या डोंगरात चंदनाची झाडे आहेत. शिवम प्रतिष्ठानने विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून हिरवाई वाढावी, यासाठी केलेला प्रयत्न अतिशय चांगला आहे.


गोरख तावरे
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.